सरनाईकांचा बोलविता धनी

Homeसंपादकीय

सरनाईकांचा बोलविता धनी

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवीदिल्लीत घेतलेल्या भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलतात, की काय अशी शंका घेतली जात होती; परंतु मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिवी केलेल्या भाषणात भारतीय जनता पक्षाला टीकेचे लक्ष्य केले.

सीमावादाला कर्नाटकी फोडणी
वस्त्रहरण
असह्य फोडणी

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवीदिल्लीत घेतलेल्या भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलतात, की काय अशी शंका घेतली जात होती; परंतु मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिवी केलेल्या भाषणात भारतीय जनता पक्षाला टीकेचे लक्ष्य केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असे चित्र तयार झाले. 

     एकीकडे काँग्रेसने स्वबळाच सूर लावलेला आहे. त्याला ठाकरे यांनी उत्तर दिल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सूर काहीसा मवाळ झाला आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने थेट काँग्रेसवर टीका करून शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे जाहीर केले. त्यामुळे राज्यात नवी युती आकाराला येण्याची शक्यता असताना मुख्यमंत्री कार्यालयातून आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र लिक करण्यात आले. खरेतर दहा जूनला सरनाईक यांनी पत्र दिले होते. शिवसेनेचा वर्धापनदिन होईपर्यंत ते पत्र का गोपनीय ठेवण्यात आले आणि आता ते का लिक करण्यात आले, हा प्रश्‍न उरतोच. आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते बेपत्ता आहेत. त्यांच्या फार्म हाऊससह अन्य ठिकाणी शोध घेऊनही ते सापडत नाहीत. किरीट सोमय्या आणि निरंजन डावखरे यांनी त्यांच्या शोधासाठी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. सोमय्या यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरच त्यांना लपवून ठेवल्याचा आरोप केला. या पार्श्‍वभूमीवर त्यांचे पत्र लिक करून काय साधले, असे प्रश्‍न विचारले जात असले, तरी राजकारण हे बुद्धीबळातील सोंगट्यासारखे असते. उद्धव यांना त्यातून अनेक हेतू साध्य करायचे आहेत. सरनाईक यांच्या पत्राचा बोलविता धनी ईडी असून, भारतीय जनता पक्षानेच त्यांच्याकडून हे पत्र लिहून घेतले असावे, असा एक अंदाज आहे. ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जात असलेले सरनाईक हे एकमेव नेते नाहीत, तर त्यांच्यानंतर अनिल परब आणि रवींद्र वायकर यांचा क्रमांक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख यांचीही सीबीआय चौकशी सुरू आहे. एका आरोपातून सुटले, की दुसर्‍या आरोपात अडकविले जाते, हा सरनाईक यांचा आरोप खरा असला, तरी ते चौकशीपासून का दूर जात आहेत, असा प्रश्‍न पडतो. चौकशीच्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी सरनाईक यांनी हा लेटरबाँब फोडला असावा, अशी शक्यता आहे. या लेटरबाँबचा धमाका झाला नाही. राजकीय धुरळा जरूर उडणार आहे; परंतु सरकारला या लेटरबाँबचा धक्का बसणार नाही. देवेंद्र फडणवीस, खासदार संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या प्रतिक्रिया पाहता राजकीय धुरळा खाली बसून सरकारची वाटचाल पुढे सुरू राहण्याची शक्यताच जास्त आहे.

    शिवसेना वर्धापन दिनाच्या भाषणातील मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी आणि सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची केलेली विनवणी यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चांनी उचल खाल्ली आहे; परंतु या भूकंपाचे धक्के कमी रिश्टर क्षमतेचे आहेत. पत्रात सरनाईक यांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगाने शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा मुद्दा मांडला; परंतु गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या कोणालाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला फोडलेले नाही, तरीही सरनाईक यांनी हा दोन्ही काँग्रेसमुळे शिवसेनेचे नुकसान होते असे जे मांडले, त्याला फारसा आधार नाही. उलट, आकडेवारी पाहिली, तर भाजपने जेवढे शिवसेना व काँग्रेसचे नुकसान केले, तेवढे राष्ट्रवादी काँग्रेसचे केलेले नाही. शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नेतृत्वाकडून शिवसेना आमदारांशी संपर्क साधून ‘डॅमेज कंट्रोल’चे काम सुरू झाले आहे, तर दुसरीकडे काँग्रेसची स्वबळाची भाषा आणि महाविकास आघाडीतील कुरबुरी अशाच सुरू राहिल्यास शिवसेना वेगळा विचार करू शकते, असा इशाराही या पत्राच्या माध्यमातून दिला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून बाहेर आले असून त्यातील तपशीलाची पूर्वकल्पना शिवसेना नेत्यांना होती. आतापर्यंत काँग्रेसचे आमदार आमची कामे होत नसल्याची तक्रार करीत होते. आता शिवसेनेचे आमदारही तक्रार करायला लागले आहेत का, हा प्रश्‍न पडतो. शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडे व्यथा मांडण्याऐवजी त्यांनी सरनाईक यांच्याकडे का कामे होत नसल्याची व्यथा मांडली. युती तोडल्याने माझ्यासारख्या नेत्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो, हे पत्रात नमूद करून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर सरनाईकांनी दोषारोपण केले आहे. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा हा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्वकल्पना देऊन झाला असून त्यांची या पत्राला पूर्णत: मान्यता असल्याचे समजते. हा केवळ योगायोग नसून हे ‘सिलेक्टीव्ह लीक’ असल्याचे मानले जाते आहे. सरनाईक यांच्या मुलाचे लग्न भाजप नेते माजी मंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या मुलीशी झाले आहे. त्यामुळे भाजपशी सलगी वाढवण्याचा सल्ला त्यांच्याकडून येणे महत्वाचे मानले जाईल, अशी अटकळ आहे. ‘पुन्हा परत जाऊ’ या अशी हाक देतानाच, भाजप विरोधकांना त्रास देते, चौकशी मागे लावते, हेही स्पष्ट लिहिण्यात आले आहे. वायकर आणि परब यांच्यासंबंधीची कागदपत्रे जाहीर करणार्‍या भाजप नेते किरीट सोमैया यांनी, अटक समोर दिसत असल्याने सरनाईकांनी ही विधाने केले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागून दिल्लीला जाणे, मतभेद विसरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वत: अभिष्टचिंतन करणे या दोन दरी सांधण्याच्या घटनांनंतर लगेचच हे पत्र जाहीर चर्चेला आणणे हा स्वत: ठाकरे यांनीच उभा केलेला चकवा तर नव्हे, असा प्रश्‍न केला जातो आहे. पंतप्रधानांशी झालेल्या गुफ्तगूमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विचलित झाले आहेत. आज सरनाईकांच्या पत्रात महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेनेला त्रास देत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. शिवसेना नेते या पत्राच्या बाहेर येण्याने बुचकळ्यात पडले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून पत्र बाहेर पडण्याची ठाकरेंच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. 

COMMENTS