संभाजीराजेंच्या मागे सामूहिक ताकद हवी ; शाहू महाराज यांचे आवाहन; मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात ’एल्गार’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीराजेंच्या मागे सामूहिक ताकद हवी ; शाहू महाराज यांचे आवाहन; मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात ’एल्गार’

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती केली पाहिजे. राज्यातील 48 खासदारांनी पंतप्रधानांकडे प्रयत्न केले पाहिजेत.

पैशाच्या वादातून केला मोठ्या भावाचा खून
अमरनाथ येथील ढगफुटीमुळे 13 ठार, 48 जखमी .
ॲड. शारदाताई लगड यांचा सावित्री-ज्योती गौरव पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर / प्रतिनिधीः मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती केली पाहिजे. राज्यातील 48 खासदारांनी पंतप्रधानांकडे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या पक्षाकडे बहुमत आहे. शिवाय त्यांनी अन्य राज्यांना यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. या माध्यमातून हा प्रश्‍न सुटू शकतो. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत. केवळ संभाजीराजे हे एकटे काही करू शकणार नाही. त्यांना सामूहिक ताकद मिळाली पाहिजे, असे मत शाहू महाराज यांनी व्यक्त केले. 

मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. या वेळी ते बोलत होते. गेल्या काही वर्षांत 58 मूक मोर्चे आणि मुंबईतील भव्य मोर्चा शांततेने पार पडले. जनतेमध्ये, समाजात नाराजी असल्याचे मी पाहत होतो. एकमुखाने विषय हाताळण्यापेक्षा एकमेकांच्या विरोधात बोलण्याचे तसेच दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते. संभाजीराजे यांनी रायगडावरुन गर्जना केल्यानंतर आम्ही त्यांना भूमिका थोडी बदलली पाहिजे, सौम्य पद्धतीने आणि सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले पाहिजे असे सांगितले. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले पाहिजे, याच दृष्टिकोनातून हे मूक आंदोलन करण्यात आले, असे ते म्हणाले. हा आवाज मुंबईपर्यंत जाईलच; पण दिल्लीपर्यंतही कसा नेता येईल याकडे आपल्या सर्वांचे लक्ष असले पाहिजे, असे आवाहन शाहू महाराजांनी या वेळी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीदरम्यान मांडण्यात आलेले मुद्दे रास्त असून योग्य विचार करू, असे आश्‍वासन दिले होते, अशी माहिती या वेळी त्यांनी दिली. राज्य सरकार आपल्यासोबत असणार आहे यात मला शंका वाटत नाही असेही त्यांनी सांगितले. सगळेच मिळेल अशी अपेक्षा करू नका असा सल्ला या वेळी त्यांनी दिला. जे शक्य आहे आणि योग्य आहे ते जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर मिळणे हा मुख्य प्रश्‍न आहे असे ते म्हणाले आहेत. आपण सध्या विरोधात निकाल लागला आहे येथून सुरुवात केली पाहिजे. हा निकाल कसा बदलता येईल, यासाठी अनेक कायदेपंडितांनी विचार केला आहे. अनेक तज्ज्ञांनी पुनर्विचार किंवा क्युरेटिव्ह याचिका आणली, तर त्यात दीर्घ काळ वाया जाऊ शकतो आणि त्याचा निकाल काय असेल हेदेखील माहिती नाही. तसेच त्यातून काही निष्पन्न होणार नाही असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, अशी माहिती शाहू महाराज यांनी दिली. केंद्राने हा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचे ठरवले, तरच हा प्रश्‍न सुटू शकतो, असेही या वेळी त्यांनी सांगितले. कायद्यात आतापर्यंत इतके बदल झाले असताना आणखी एक बदल करण्यास काय अडचण आहे? अशी विचारणा करताना मनात आणले तर सगळं होऊ शकते असे त्यांनी सांगितले. हा विषय पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी त्यांच्यासमोर विषय मांडला आहे. पंतप्रधान सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले असले, तरी अद्याप त्यांचे विचार काय आहेत हे कळालेले नाही. ते स्पष्ट झाले, तर आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यात येईल. बहुमत असल्याने त्यांच्याकडे जाऊन सोबत येण्यासाठी विनंती केली पाहिजे, असा सल्ला या वेळी त्यांनी दिला. मराठा आरक्षणावर कोल्हापुरात खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन पार पडले. या आंदोलनात समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासहित जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील मानेदेखील उपस्थित होते. या वेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली.

दिल्लीत लॉबिंगची गरज

महाराष्ट्राने एकत्र येऊन आमदार, खासदारांनी हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवणं गरजेचे आहे. तो कसा न्यायचा यावर विचार केला खासदार आणि मंत्रिमंडळाने दिल्लीत विषय पोहोचवला पाहिजे. तसेच फक्त मोदी यांच्याकडे विषय मांडून चालणार नाही. पंतप्रधान म्हणतील मी काय करू. बाकीच्यांचे मत काय माहिती नाही, असे चालणार नाही. बहुमतासाठी लॉबिंग करावे लागेल, असेही ते म्हणाले.

संभाजीराजे यांनी आंदोलनानंतर शुक्रवारी मुंबईत मराठा समन्वयकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले असताना आपणही एक पाऊल पुढे टाकू असे सांगत त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे; मात्र यावेळी त्यांनी नाशिक, रायगड. अमरावती आणि औरंगाबाद येथील मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

COMMENTS