नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या जंबो विस्तारानंतर झालेला फेरबदल कुणाच्या पथ्यावर पडला? कुणाचे पंख छाटली गेली? सरकारच्या कार्यक्षमतेवर
नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या जंबो विस्तारानंतर झालेला फेरबदल कुणाच्या पथ्यावर पडला? कुणाचे पंख छाटली गेली? सरकारच्या कार्यक्षमतेवर कसा आणि किती परिणाम होईल? या फेरबदलामागे सत्ताधारी पक्षाची कुठली रणनिती असेल? यासंदर्भात अनेक तर्क वितर्क व्यक्त होत आहेत.तथापी या विस्तारीत फेरबदलाने विशेषतः महाराष्ट्रात भाजपाच्या पारंपारीक रणनितीची प्रचिती देऊन वेगळी खेळी खेळली असल्याच्या मुद्याकडे फार थोड्या मंडळींचे लक्ष गेले आहे.या फेरबदलाने महाराष्ट्राच्या पदरात पडलेले दान आणि त्यातून साधलेले राजकारण यावर शतप्रतिशत देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा राहिल्याचेही स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या बाल्लेकिल्यांवर झालेले आक्रमण आणि भाजपात विकसीत झालेल्या बहुजनांच्या बलस्थानांवर प्रहार ही फडणवीस नीतीची परिणीती या फेरबदलातून स्पष्टपणे जाणवत आहे.
कुठल्याही क्षेत्रावर निरंकूश वर्चस्व प्रस्थापीत करायचे असेल तर अंकूश ठेवू शकणारे स्थान हेरून त्यांचा काटा काढावा लागतो.ही रणनिती वापरताना संबंधीत क्षेत्राचा विकास हा मुद्दा गौण ठरून त्या क्षेत्रावर निरंकूश वर्चस्व प्रस्थापीत ठेवणे एव्हढाच हेतू तपासून पाहीला जातो.राजकारणात ही नितीमत्ता अलिकडच्या काळात वेगाने विकसीत झाली असून त्याचे प्रवर्तक म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहीले जाते.भारतीय जनता पक्षाने या रणनितीवर दोन खासदारांवरून राक्षसी बहुमतापर्यंत मजल मारली आहे.बहुमतात असलेल्या भाजपाकडून सरकार म्हणून देशाचा कारभार किती यशस्वीपणे हाताळला गेला हा मुद्दा त्यांच्या सत्तेवरील निरंकूश वर्चस्वासमोर गौण ठरला आहे.आज उद्याचे धोरण न ठरवता दुरदुष्टी बाळगून दिर्घकालीन धोरण आणि त्या दिशेने नियोजन करतांना भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन जेष्ठ अधिकारी नेतृत्वाने प्रत्येक प्रांतात अंकूशधारी घटकांना नियंत्रीत करण्यासाठी खास यंत्रणा विकसीत केली आहे.महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या या यंत्रणेचे सुत्रधार किंवा कप्तान आहेत.हे कालच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारीत फेरबदलाने अधोरेखीत केले आहे.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सामान्य बहुजन जनतेत स्थिर स्थावर करण्यासाठी ज्या ज्या नेतेमंडळींनी हयात खार्ची घातली त्या नेतेमंडळींना तर काही ठिकाणी त्यांच्या पश्च्यात त्यांच्या वारसदारांना राजकारणातून खड्यासारखे बाहेर काढण्याचे काम गेल्या काही वर्षात पध्दतशीर नियोजन करून सुरू आहे.कालच्या विस्तारीत फेरबदलात ते प्रकर्षाने जाणवले.या मंत्रीमंडळ विस्तारात हिना गावीत,प्रितम मुंडे या नावांची वर्णी लागेल असे खात्रीशीरपणे बोलले जात होते.प्रत्यक्षात मात्र ही दोन्ही नावे बाजूला पडून ऐनवेळी भारती पवार आणि औरंगाबदचे भागवत कराड यांना स्थान दिले गेले.हा निव्वळ योगायोग मानता येणार नाही.बहुजन समाजातील नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही तसेच जिथे जिथे शिवसेना भक्कम आहे तिथे तिथे मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व देऊन भाजपाला शासकीय प्रशासकीय ताकद द्यायचा विचार या नावांची निवड करतांना केला असण्याची शक्यता अधिक प्रबळ आहे.यामागे फडणवीस नितीने मोलाचे योगदान खर्ची घातले आहे.हिना गावीत यांचा भाजपातील कारकिर्दीचा विचार करता भारती पवार यांना जेष्ठ आहेत.तरीही त्यांना डावलून पवार यांना संधी दिली गेली.नंदूरबारमध्ये शिवसेना म्हणावी तितकी भक्कम नाही.शिवाय गावीत यांनी अनेक समाजघटकांशी वितूष्ट निर्माण केले आहे.सरकार आणि पक्षाचे विविध कार्यक्रमांचा प्रचार प्रसार करण्यातही त्यांनी विशेष स्वारस्य दाखवले नाही.याउलट भारती पवार यांनी लोकसभा निवडणूकीच्या दोन दिवस आधी राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली म्हणून ऐनवेळी भाजपाचे कमळ हाती घेऊन विजय संपादन केला.गेली दोन वर्ष खासदार म्हणून मतदार संघ पिंजून काढीत शेतकरी प्रश्नांवर प्रचंड काम केले.सोबत पक्षाची ध्येयधोरणे आणि सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात दिलेल योगदान ही त्यांची जमेची बाजू ठरली. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला दिंडोरी लोकसभा मतदार संघ बांधता यावा तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रीन बेल्टवर पकड मजबूत रहावी या हेतूने भाराती पवार यांना मंत्रीमंडळात स्थान दिले गेले.यात जाणकारांना कुठलीही शंका नाही.
प्रितम मुंडे यांना डावलण्यात यापेक्षा मोठी खेळी खेळली गेली आहे.कै.गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाला तळागाळापर्यंत नेले. शेठजी भटजींचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या या पक्षाला झोपडीच्या दारापर्यंत नेऊन बहुजनांचा चेहरा दिला.त्यांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या पंकजा मुंडे यांना मात्र जाणीवपुर्वक प्रवाहाच्या बाहेर ठेवण्याचे कारस्थान सुरू आहे.जनतेच्या मनातला मुख्यमंत्री म्हणणाऱ्या पंकजांना निवडणूकीत पराभूत करण्यापासून विरोधकांना ताकद देण्यापर्यंत डावपेच यशस्वीपणे राबविण्यात आले.पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतले जाण्याची चर्चा सुरू असतानाच रमेश कराड या नावाचा विचार झाला.केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देण्यासंदर्भातही हीच चाल खेळली गेली.गोपीनाथरावांची कन्या म्हणून प्रितम मुंडे यांच्या नावाला केंद्रीय नेतृत्वाने संमती देणे अपेक्षीत असतांना ऐनवेळी पहिल्यांदाच राज्यसभेवर गेलेले औरंगाबादचे डाॕ.भागवत कराड यांच्या नावाचा विचार झाला.इथेही पंकजा मुंडे यांना संधी नाकारून भागवत कराड यांना राज्यभेवर पाठवले गेले होते हे विसरता येणार नाही. मुंडे गटाच्या वर्चस्वाचे खच्चीकरण करीत असतानाच औरंगाबादमध्ये असलेले शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी कराड यांना संधी दिली गेली आहे.तुम्ही म्हणजे समाज नव्हे असा संदेशही मुंडे यांना दिला गेला असावा.
तिसरे महत्वाचे नाव म्हणजे नारायण राणे.नारायण राणे यांना मंत्रीमंडळात मानाचे पान देण्यामागे अनेक कारणे आहेत.शिवसेनेचे कट्टर प्रतिस्पर्धी हा मुख्य मुद्दा आहेच.त्यापलिकडेही पक्षांतर्गत खेळी देखील आहे.भाजपात प्रवेश करून अवघे अडीच वर्ष झाले तरीही मंत्रीमंडळात समावेश होण्यात पुन्हा फडणवीस यांची भुमिका निर्णायक ठरली.खरे तर तीन चार वर्षापुर्वीच राणे भाजपवासी होऊ शकले असते,तथापी तेंव्हा त्यांची भाजप प्रवेशाची वाट चुकली होती.नितीन गडकरी यांच्या मार्फत होणारा राणेंचा प्रवेश फडणवीस यांनी रोखला होता.त्यानंतर मात्र फडणवीस यांच्या खांद्यावर बसून राणे भाजपवासी झाले आणि मंत्रीही.सोबतच संजय धोत्रे यांचे मंत्रीमंडळातून बाहेर जाणे गडकरी फडणवीस यांच्या दरम्यान पक्षांतर्गत शितयुध्दाचा परिणाम आहे.धोत्रे यांची गडकरी यांचेशी असलेली जवळीक फडणवीस यांच्यासाठी खटकणारी बाब होती.त्यातून हा वचपा काढला गेला. फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या वावड्या रोखून केंद्राला हवा असलेला माजी मुख्यमंत्री राणेंच्या रूपात दिला.या घडामोडीवरून केंद्रांच्या दरबारात फडणवीसांची ताकद कशी आहे.हे दाखवून देतांना महाराष्ट्र भाजपाला फडणवीस हाच पर्याय असल्याचा संदेशही दिला गेला. राणे हे फटकळ आहेत,शिवसेना आणि ठाकरे कुटूंबाला पाण्यात पाहतात,बिनबोभाट वक्तव्य करून इभ्रत चव्हाट्यावर मांडतात.असा नेता राणेंचा अपवाद वगळता भाजपात अन्य कुणीही नाही.एकला चलो रे भुमिकेत राणेंचा चांगला वापर होऊ शकतो.शिवसेनेला शह देणे या माध्यमातून सहज सोपे होऊ शकते.कुणावरही तोंडसूख घेण्याचे धाडस या नेतृत्वात आहे.मराठा चेहरा असल्यानेआरक्षणाच्या वादविवादातही पक्षाच्या पध्दतीने वापर करता येईल.सध्या खा.संभाजी राजे भोसले भाजपापासून फटकून वागत आहेत.त्यांना शह देण्यासाठी राणेंचा पर्याय वापरता येऊ शकतो.संभाजी राजेंवरही ते तोंडसुख शकतात.या जमाबाजूचा विचार करून फडणवीस यांनी राणेंचा पत्ता खेळला आहे. एकूणच आदीवासी चेहरा हिना गावीत यांना भारती पवार,पंकजा मुंडे यांना डाॕ.भागवत कराड तर छञपती संभाजी राजे भोसले यांना पर्याय उभा करण्याची ही खेळी सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न दिसत असली तरी बहुजनांच्या बलस्थानांचे खच्चीकरण करण्याचा हा डाव स्पष्टपणे दिसत आहे.
COMMENTS