शिवसेनेने केला गृहिणीचा सन्मान, तर राष्ट्रवादीने दिला ज्येष्ठत्वाला गौरव ; शेंडगे व भोसले यांच्यावर आता नगरच्या विकासाची जबाबदारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेने केला गृहिणीचा सन्मान, तर राष्ट्रवादीने दिला ज्येष्ठत्वाला गौरव ; शेंडगे व भोसले यांच्यावर आता नगरच्या विकासाची जबाबदारी

श्रीराम जोशी/अहमदनगर- सर्वसामान्य कुटुंबातील रोहिणीताई संजय शेंडगे यांना नगर शहराचे प्रथम नागरिक म्हणजेच नगर मनपाचे महापौर करून शिवसेनेने एका गृहिणील

ट्रक धडकेत निवडणूक प्रशिक्षणार्थी शिक्षक जखमी
लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर यांना पुरस्कार प्रदान 
जेऊर कुंभारी स्मशानभूमीस 80 हजार रुपयांची शवदानी

श्रीराम जोशी/अहमदनगर- सर्वसामान्य कुटुंबातील रोहिणीताई संजय शेंडगे यांना नगर शहराचे प्रथम नागरिक म्हणजेच नगर मनपाचे महापौर करून शिवसेनेने एका गृहिणीला आगळावेगळा सन्मान दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने अभ्यासू व वृक्षप्रेमी नगरसेवक गणेश भोसले यांना उपमहापौर करून त्यांच्या ज्येष्ठत्वाचा तसेच त्यांना असलेल्या मागील 25 वर्षांपासूनच्या नगरपालिका-महापालिका कामकाजाच्या अनुभवाचा गौरव केला आहे. शेंडगे व भोसले यांची बुधवारी अधिकृतपणे नगरचे महापौर-उपमहापौर म्हणून निवड झाली असल्याने आता येत्या अडीच वर्षांच्या काळात नगरच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. 

शिवसेनेने शेंडगे यांच्या रुपाने चौथे महापौरपद मिळवले आहे. चारही महापौर सामान्य कुटुंबातील आहेत. तळागाळातील निष्ठावान कार्यकर्त्यांना अशा पदांच्या माध्यमातून लौकिक देण्याची सेनेची परंपरा यंदाही कायम राहिली. नगरची महापालिका 2003मध्ये स्थापन झाली. त्या वेळेला शिवसेनेचा प्रथम महापौर झाला. आता मागील 18 वर्षांमध्ये चौथ्यांदा शिवसेनेला महापौरपद मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता महापालिकेमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी झाल्यामुळे शिवसेनेला महापौरपद व राष्ट्रवादीला उपमहापौरपद यानिमित्ताने मिळाले. महापालिका 2003 साली स्थापन झाल्यानंतर प्रथम महापौर होण्याचा मान शिवसेनेचे भगवान फुलसौंदर यांना मिळाला. त्यानंतर शिवसेनेच्या शीला शिंदे या 2012मध्ये, तर शिवसेनेच्या सुरेखा कदम या 2016 मध्ये महापौर झाल्या. आता शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या सेनेच्या चौथ्या महापौर बिनविरोध झाल्या आहेत.

राष्ट्रवादीला दुसर्‍यांदा मान

महापालिकेत राष्ट्रवादीला दुसर्‍यांदा उपमहापौरपदी काम करण्याची संधी गणेश भोसले यांच्या रुपाने मिळाली आहे. महापालिकेचे महापौरपद राष्ट्रवादीने तीनवेळा मिळवले आहे. त्यात दोनवेळा शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप व एकदा अभिषेक कळमकर होते तर उपमहापौरपद राष्ट्रवादीला याआधी 2006मध्ये दीपक सूळ यांच्या रुपाने मिळाले होते. त्यावेळी काँग्रेसचे संदीप कोतकर महापौर होते. त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी भोसले यांच्या माध्यमातून उपमहापौर करण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे व आता शिवसेनेच्या शेंडगे महापौर आहेत.

प्रश्‍नांचे आव्हान

नगर महापालिकेची मागील 11 वर्षांपासून रखडलेली फेज-2 पाणी योजना पूर्ण करण्याचे आव्हान शेंडगे व भोसले यांच्यासमोर आहे. याशिवाय अमृत पाणी योजना व अमृत भुयारी गटार योजना तसेच सौर उर्जा प्रकल्प मार्गी लावण्याचेही काम करावे लागणार आहे. मात्र, सर्वात आधी मध्य नगर शहरातील खड्डेमय झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे काम तातडीने सुरू करावे लागणार आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानात नगर शहराचा लौकिक चांगला असल्याने तो कायम ठेवताना अधिकाधिक चांगले नामांकन शहराला देशभरात मिळवून देण्याचेही काम अपेक्षित आहे.

गृहिणीपासून महापौरपदापर्यंत

दोनवेळा महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेविका असलेल्या व आता सेनेच्या गटनेत्या असलेल्या रोहिणीताई शेंडगे या उत्तम गृहिणी आहेत. साहित्य वाचनाचा छंद व पनीरच्या सहायाने शाकाहारी उत्तम खाद्यपदार्थ स्वतःच्या हाताने तयार करून कुटुंबियांना व पाहुण्यांना खिलवण्याची आवडही त्यांना आहे. त्यांचे माहेर पुण्याचे असून, शिक्षण बी. कॉम. झाले आहे. 1996मध्ये नगरचे शिवसैनिक संजय शेंडगे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या दाम्पत्याला बीएचएमएस शिक्षण घेतलेली मुलगी डॉ. रिकिता व बीबीए शिक्षण घेतलेला मुलगा अनिकेत अशी दोन मुले आहेत. रोहिणीताईंना माहेरी वा सासरी कोणताही राजकीय वारसा नाही. शेंडगे परिवार हा मूळचा नगरचाच आहे. शेती व हॉटेल व्यवसाय हे उपजीविकेचे साधन आहे. नेवासे तालुक्यातील दत्तदेवस्थानमुळे प्रसिद्ध असलेल्या देवगडला शेती असून, सासरे छगनराव शेंडगे ती पाहतात. रोहिणीताई 2003मध्ये पहिल्यांदा नगरसेविका झाल्या. त्यानंतर 2008 व 2013 या दोन निवडणुकांत पती संजय शेंडगे यांच्या नगरसेवक निवडणूक विजयात त्यांनी हरीहरेश्‍वर महिला मंडळाच्या व बचत गटाच्या माध्यमातून मोलाचा वाटा उचलला. 2018मध्ये त्या पुन्हा नालेगावातील प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेच्या नगरसेविका झाल्या व नंतर लगेच शिवसेना नगरसेवकांच्या गटनेत्याही झाल्या. यंदाचे महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने शिवसेनेने त्यांनाच महापौरपदाची उमेदवारी दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांची स्थानिक नगरच्या स्तरावरील मैत्रीही रोहिणीताईंच्या रुपाने पहिल्यांदा अस्तित्वात आली आहे. विशेष म्हणजे रोहिणीताईंच्या सासूबाई रंजनाताई शेंडगे या मनपाच्या आरोग्य विभागात नोकरीला होत्या. ज्या संस्थेत त्यांनी नोकरी केली, त्याच संस्थेच्या महापौरपदी त्यांची सून आता विराजमान झाली आहे.

रौप्य महोत्सवी अनुभव

नगर मनपाचे नवे उपमहापौर गणेश भोसले यांना तब्बल 25 वर्षांचा रौप्य महोत्सवी राजकीय व प्रशासकीय अनुभव आहे. नगरपालिका व महापालिका कायद्यांचा त्यांचा अभ्यास असल्याने मनपाच्या महासभेत भोसलेंच्या प्रश्‍नांवर विभाग प्रमुखांचे निरुत्तर होणे नेहमीचे असते. पण यानिमित्ताने प्रशासनाच्या चुका व त्रुटी दाख़वून कारभार सुधारण्याची संधी देण्याचा त्यांचा हेतू असतो. भोसले हे मूळचे राहणारे नगरचेच. बुरुडगाव परिसरातील प्रसिद्ध भोसले आखाड्यातील पहिलवान. राजकारणात त्यांची सुरुवात शिवसैनिक म्हणून झाली. शिवसेनेचे शहर प्रमुखपदही त्यांनी भूषवले आहे. 1996मध्ये तत्कालीन नगरपालिकेत ते पहिल्यांदा नगरसेवक झाले व लगेच उपनगराध्यक्षपदही त्यांना मिळाले. त्यावेळी भाजपचे अ‍ॅड. अभय आगरकर नगराध्यक्ष होते. त्यानंतर 2003मध्ये नगरला महापालिका झाल्यापासून भोसले नगरसेवक आहेत. मात्र, या काळात त्यांचा राजकीय प्रवास तीनवेळा बदलला. शिवसेनेकडून 2003मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. पण अवघ्या तीन वर्षात म्हणजे 2006मध्ये त्यांनी सेना सोडली व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यानंतर 2008 व 2013 असे दोनवेळा त्यांनी मनसेचे नगरसेवक म्हणून काम केल्यावर या पक्षालाही रामराम ठोकला व राष्ट्रवादीत प्रवेश केला. अडीच वर्षांपूर्वी म्हणजे 2018मध्ये झालेल्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे नगरसेवक झाले. मनपात स्थायी समितीचे सभापतीपद त्यांनी याआधी 2015 ते 2016 या काळात मनसेचे नगरसेवक असताना भूषवले आहे व त्यानंतर पाच वर्षांनी त्यांना उपमहापौरपदाच्या रुपाने स्वतंत्र दालन मिळाले आहे. नगरचे एकमेव वृक्षप्रेमी नगरसेवक म्हणून भोसले प्रसिद्ध आहेत. बुरुडगाव रोडवरील आपला 14 क्रमांकाचा प्रभाग त्यांनी हरित केला असून, आता उपमहापौरपदाच्या माध्यमातून नगर शहर हरित करण्याचा संकल्प त्यांचा आहे. स्वतःचा प्रभाग त्यांनी एक आदर्श प्रभाग केला आहे. आता आदर्श नगर शहर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

COMMENTS