Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवभोजनच्या वर्धापनदिनानिमित्त इस्लामपूरात मोफत चिकन व मसुरा थाळी

येथील शिवभोजन केंद्रात पहिल्या वर्धापनदिनानिमित्त मोफत चिकन अन् आख्या मसुराची मेजवानी देण्यात आली.

नाकृउबा समितीच्या उत्पन्नात भरघोस वाढ
शिवसेनेशी युतीची शक्यता आता मावळली- मुनगंटीवार
जलयुक्त शिवारातून शेतकर्‍यांचे सक्षमीकरण

दीडशे जणांनी घेतला लाभ

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील शिवभोजन केंद्रात पहिल्या वर्धापनदिनानिमित्त मोफत चिकन अन् आख्या मसुराची मेजवानी  देण्यात आली. दीडशे जणांनी शाकाहारी व मांसाहारी थाळीवर ताव मारला.

इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या शेजारी असणार्‍या हॉटेल पंगत येथे महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन केंद्राचा मंगळवारी पहिला वर्धापनदिन होता. सकाळी येथे नागरिकांच्या उपस्थितीत अभयसिंह आनंदराव पवार या दोन वर्षीय चिमुकल्यांच्या हस्ते वाढदिवस व वर्धापनदिनानिमित्त केक कापण्यात आला. त्यानंतर मांसाहारी नागरिकांनी चिकन व तर शाकाहारी नागरिकांनी इस्लामपूरच्या प्रसिध्द आख्या मसुरचा आस्वाद घेतला. केंद्र संचालिका अलका शिंदे आणि रणजित शिंदे यांनी स्वागत केले. 

गेले वर्षभर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाच रुपयांत शिवभोजन थाळी गरीब गरजू नागरिकांची भूक भागवत आहे. आज वर्धापनदिनाच्या निमित्ताने केंद्राच्या आवारात मंडप घालण्यात आला होता. सर्व कामगारांनी नवनवे कपडे परिधान केले होते. येणार्‍या प्रत्येक गरजू भुकेल्या व्यक्तीचे आदराने स्वागत केले गेले अन् मोफत थाळी देण्यात आली. 

सध्या गरिबांच्या घरी चूल पेटणे मुश्कील झाले आहे. मटण-चिकनचे वाढीव दर खिशाला परवडणारे नाहीत. त्यामुळे गरिबांच्या ताटात चिकन देण्यात आले. चिकन खाऊन नागरिक तृप्त झाले. भरपेट जेवल्यानंतरचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. जे नागरिक शाकाहारी होते त्यांना पोट भर मसुर देण्यात आला.

कोरोनाच्या परिस्थिती पुन्हा गंभीर होत आहे. पुन्हा लॉकडाऊन होईल अशी परिस्थिती आहे. अनेकांची एकवेळ खाणे अन् जगण्याची धडपड सुरू आहे. गेल्या वर्षभरात  शिवभोजन केंद्रावर तब्बल 52 हजारांहून अधिक थाळीचे वितरण झाले आहे. मंगळवारी वर्धापनदिन असल्याने केंद्र संचालिका अलका शिंदे यांनी आपल्या सहकारी सुलाबाई साळुंखे, अनिता शिंदे व घरातील महिलांच्या मदतीने चिकनचा बेत आखला. रोजच्या दीडशे गरजू नागरिकांनी मसुरा व चिकनचा आस्वाद घेता आला. 

अत्यंत गरजूंना पाच रुपयांची शिवभोजन थाळी जगण्याचा हातभार आहे. यापूर्वीही दिवाळी, दसर्‍यासह वेगवेगळ्या सणासुदीला गोड-धोड जेवण दिले गेले आहे. महाशिवरात्रीला फराळाची थाळी होती. शिवभोजन केंद्रात गरिबांच्या चेहर्‍यावर दररोज आनंद न्याहाळता येत असल्याची प्रतिक्रिया संचालिका अलका शिंदे यांनी दिली. उमेश पवार, सागर मलगुंडे, सीमा कदम, ऋषिकेश शिंदे, संजय गायकवाड, रामचंद्र चव्हाण, सोमनाथ माने, किर्तीकुमार पाटील उपस्थित होते. रणजित शिंदे यांनी संयोजन केले. हणमंत हिंदुराव कदम यांनी आभार मानले.

COMMENTS