शिरवळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण

Homeमहाराष्ट्रसातारा

शिरवळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण

शिवकालीन शिरवळमध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभारल्याने शिवप्रेमींमध्ये आनंद

भारतात 24 तासात 3,14,835 नवे कोरोना रुग्ण
कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या
बहिण माझी लाडकी योजनेत अजित पवार गटाची गोची

शिवकालीन शिरवळमध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभारल्याने शिवप्रेमींमध्ये आनंद

लोणंद / वार्ताहर : हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा हा शिरवळ, ता. खंडाळा

येथे केदारेश्‍वर मंदिराच्या सभोवती मोठ्या दिमाखात बसविण्यात आला. दि. 31 मार्च रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शिरवळ हे शिवकालीन गाव असून या शिरवळमध्ये शिवछत्रपतींचा पुतळा असावा ही असंख्य शिवभक्तांची इच्छा होती. हा पुतळा उभारण्यात आल्याने शिवभक्तांची इच्छा पूर्ण झाली असून शिवछत्रपतींचा पुतळा उभारल्याने शिवप्रेमींमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.

त्यामुळे शिवरायांचा हा पुतळा प्रेरणादायी ठरणार आहे. हा पुतळा उभारण्यासाठी केदारेश्‍वर तरुण मंडळाच्या सर्व अबालवृध्द कार्यकर्त्यांचे अपार कष्ट असून या कष्टातूनच हे कार्य पार पाडण्यात आले आहे. 31 मार्च रोजी राज्यात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होत असताना शिरवळमध्ये ही याच दिनी हा शिवछत्रपतींचा पुतळा अनावरण सोहळा संपन्न होत असताना राजधानी रायगड येथून शिवज्योत तसेच गडावरील माती ही आणण्यात आली.

पुतळा अनावरण कार्यक्रम होण्यापूर्वी सकाळ पासून विविध विधी करण्यात आले होते. सकाळी ग्रामदैवत अंबिकामाता, केदारेश्‍वर व गणरायाला अभिषेक करण्यात आला. शिवछत्रपतींच्या अश्‍वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच होमहवन आदी कार्यक्रम होत असताना दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण हे अगदी दिमाखात करण्यात आले. शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा हा फुलांच्या सजावटीत तसेच विद्युत रोषणाईने तसेच पुतळा परिसर अगदी सुशोभित करण्यात आला. पुतळा अनावरण प्रसंगी जय भवानी जय शिवाजी असा जयघोष ही शिवप्रेमींकडून करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याने शिवप्रेमींमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. शिरवळच्या राजाचे दर्शन घेऊन केदारेश्‍वरचे दर्शन घेण्यास मार्गस्थ होण्याआधी दृष्टीक्षेपात पडणारा हा जाणत्या राजाचा अश्‍वारुढ पुतळा शिरवळ व पंचक्रोशीतील भावी असंख्य पिढ्यांना नवचैतन्याचे नवनिर्मितीचे बळ अविरतपणे देत राहिल, असे केदारेश्‍वर तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम गुंजवटे यांनी म्हटले आहे.

COMMENTS