अहमदनगर/प्रतिनिधी : मंदिर उघडण्याचे आंदोलन करताना भाजपने पंढरपूर येथील पांडुरंग मंदिरासमोरील नामदेव पायरीचा अवमान केल्याचा निषेध नगरच्या शिंपी समाजबा
अहमदनगर/प्रतिनिधी : मंदिर उघडण्याचे आंदोलन करताना भाजपने पंढरपूर येथील पांडुरंग मंदिरासमोरील नामदेव पायरीचा अवमान केल्याचा निषेध नगरच्या शिंपी समाजबांधवांनी केला असून, संबंधितांवर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.m अहमदनगर शिंपी समाजाचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांनी याबाबत सांगितले की, पंढरपूरला झालेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे. महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली असून संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो.पण याच पवित्र भूमीत नुकतेच भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याच्या नावाखाली पंढरपूर येथील विट्ठल मंदिराचे प्रवेशद्वार येथे असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पायरीवर (जी नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते व जिचे एक अनन्यसाधारण महत्त्व व पावित्र्य आहे त्या ठिकाणी) चप्पल व बूट घालून हैदोस घातला. तेव्हा ही विकृती अत्यंत संतापजनक,दुःखदायक व निंदनीय असून यामुळे संत नामदेव महाराज ज्या शिंपी समाजाचे आराध्य दैवत आहे, त्या समाजाने व वारकरी समाजाने या विकृतीचा जाहीर निषेध केला असून ताबडतोब याप्रकरणी भाजपने माफी मागण्याची मागणी व त्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी आहे, असे मांढरे म्हणाले.
खरेतर संत नामदेव महाराज यांचे यंदाचे वर्ष 751 वे जन्मशताब्दी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे केले जात असतानाच मंदिर उघडण्याच्या नावाखाली भाजप कार्यकर्त्यांनी केलेली ही विकृती कितपत योग्य आहे?, असा सवाल करून मांढरे म्हणाले, देवळात गेल्यावर आपण न चुकता पादत्राणे बाहेर काढतो, मग ती अक्कल एखाद्या पवित्र ठिकाणी गेल्यावर आपल्याकडे का नको? एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत नामदेव महाराजांचे नाव हे आघाडी सरकारने महापुरुषांच्या यादीत समाविष्ट केले नाही व ते समाविष्ट व्हावे म्हणून आवाज उठवितात तर दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते त्याच नामदेव महाराजांच्या पायरीची विटंबना करतात हा किती विरोधाभास आहे व यातून नेमका कोणता संदेश भाजप देऊ इच्छिते, असा सवाल करून ते म्हणाले, झालेला हा प्रकार खरेच खूप वाईट असून ज्या महाराष्ट्राला आपण संतांची भूमी म्हणून ओळखतो व अनेकवेळा संतांचे दाखले व गोडवे गातो, तेथील जनता अशा राजकारणी व त्यांच्या कार्यकर्त्यांना कदापी माफ करणार नाही. असे प्रकार जर कोणत्याही राजकीय पक्षाकडून घडत असतील तर ते योग्य नसून नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वेळीच समज द्यायला हवी व नेत्यांनीही याचे चिंतन करायला हवे,असे मतही त्यांनी व्यक्त केले. झालेल्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील, त्यांना लवकरात लवकर अटक करून कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा, अहमदनगर जिल्ह्यात शिंपी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मांढरे यांच्यासह भिंगार शिंपी समाजाचे अध्यक्ष व नामदेव समाजोन्नती परिषदचे नगर जिल्हाउपाध्यक्ष शैलेश धोकटे, पदाधिकारी सतीश वाधवणे, ज्ञानेश्वर कविटकर, दिलीप गिते, शरद गिते, सुरेश चुटके, दिलीप काकडे, संतोष माळवदे, कैलास गुजर, दीपक देठ,दीपक बकरे यांनी दिला आहे.
COMMENTS