अहमदनगर/प्रतिनिधी : आज गावातील शाळेची खोली पडलेली असते, पण मंदिर मोठे असते. यातून जाती आणि धर्माच्या नावावर सोप्या पध्दतीने राजकारण करता येते हे दिसत
अहमदनगर/प्रतिनिधी : आज गावातील शाळेची खोली पडलेली असते, पण मंदिर मोठे असते. यातून जाती आणि धर्माच्या नावावर सोप्या पध्दतीने राजकारण करता येते हे दिसते. मात्र, असे राजकारण म्हणजे देशाच्या अखंडतेवर आणि विचारांवर हल्ला आहे. याची सुरुवात राम मंदिरासाठी विटा जमा करण्यापासून झाली होती व तेव्हापासून दूरदृष्टीने हे सर्व सुरू आहे. तर दुसरीकडे आपण ज्या संघटनेच्या जीवावर मंत्री झालो, त्याच संघटनेकडे दुर्लक्ष केल्याने पक्षावर ही वेळ आली आहे. यामुळे आता संघटना बळकटी करणासोबतच विचारांचे राजकारण करा, असा सल्ला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना दिला.
नगरमध्ये पक्षाच्या विस्तार कार्यकारिणी बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके, राजेंद्र नागवडे, करण ससाणे, उत्कर्षा रुपवते, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर, बाळासाहेब सरोदे, विनायक देशमुख, ज्ञानदेव वाफारे, लता डांगे उपस्थित होते. सध्या सर्वात सोपे राजकारण हे धर्म आणि जातीच्या माध्यमातून करता येत असल्याची टीका करून थोरात म्हणाले, आता तालुका, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे. मागील तीन वर्षात जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी चांगली कामगिरी केलेली आहे. देशाचे प्रतिबिंब जिल्ह्यात दिसत असून आज काँग्रेस पक्ष अडचणीत नसून पक्षाची विचारधारा अडचणीत आहे, असे ते म्हणाले.
आ. तांबे यांनी, पक्षाचा नव संकल्प समजून घेवून त्यानुसार कृती करण्याचे आवाहन केले. विचाराने निर्णय घेणारे कार्यकर्ते सोबत ठेवा. पक्षाचे सघटन बळकट होणे आवश्यक आहे. आज आपण रोज देशाची लोकशाही खिळखिळी होताना पाहत आहोत. आता थकलेल्यांना विश्रांती देण्याची वेळ आली असून तरुणांना संधी मिळणे आवश्यक आहे. महागाई विरोधात दररोज आंदोलने करा. सामान्य माणसाला जागे करण्याचे काम करा, असे आवाहन त्यांनी केले. आ. कानडे म्हणाले, तीन वर्षात महसूल मंत्री यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बळकट करण्याचे काम झाले. महाविकास आघाडीतील सत्तेमुळे विकास कामांसाठी निधी मिळत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सांळुके, देशमुख आणि वाफारे यांचे मनोगत झाले. यावेळी मंत्री थोरात यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष सांळुके, तालुकाध्यक्ष दीपक भोसले, शहाजीराजे भोसले, दादा पाटील वाकचौरे, अरुण नाईक,किरण पाटील, संपत म्हस्के, संभाजी रोहकले, डॉ. खडके, संभाजी माळवदे, संजय छल्लारे, नासिर शेख यांचा सन्मान झाला. उदयपूर येथील पक्षाच्या संकल्प शिबिरात 50 वर्षे वय असणार्या कार्यकर्त्यांची 50 टक्के पदे ही तरुणांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पाच वर्षापेक्षा जास्त कोणालाच एका पदावर राहता येणार नाही. काम करणार्यांना संधी देण्यात येणार असून ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात 75 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणार आहे. याच दरम्यान जिल्हा शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून महसूल मंत्री यांचा चार दिवसीय जिल्हा दौरा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर मंत्री थोरात यांनी तालुकानिहाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकांमध्ये काय स्थिती राहील याची माहिती त्यांनी तालुका पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांकडून जाणून घेतली.
त्यांचा पाया काँग्रेसच
जिल्हाचा पूर्वीचा कालखंड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून जिल्ह्यातील राजकीय व्यक्ती कोणी कोठेही असली तरी त्यांचा पाया हा काँग्रेसच आहे. जिल्ह्यातील प्रत्येकाच्या राजकीय जीवनात त्यांना जे काही मिळालेले आहे, ते काँग्रेसमुळेच मिळाले आहे, असा दावा करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसमधून भाजप वा अन्य पक्षात गेलेल्यांवर टीका केली.
COMMENTS