शिवसैनिक हे सेनेचे अंतिम अस्त्र !

Homeताज्या बातम्यादेश

शिवसैनिक हे सेनेचे अंतिम अस्त्र !

महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः सत्ताकारणात निर्माण झालेल्या महानाट्याला तिसरा दिवस उजाडला असला तरी कायदा आणि तांत्रिक कसोट्यांतून पार व्हायचे आहे.

नगर मनपाचा कर्मचारी खेळणार… ’कोण होणार करोडपती’
प्रियकराने प्रेयसीसह स्वतःला घेतले पेटवून
‘मशाल’ चिन्हासाठी समता पार्टीची सर्वोच्च न्यायालयात धाव

महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः सत्ताकारणात निर्माण झालेल्या महानाट्याला तिसरा दिवस उजाडला असला तरी कायदा आणि तांत्रिक कसोट्यांतून पार व्हायचे आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ४५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. अर्थात, या ४५ आमदारांत शिवसेनेचे किती असतील, या बाबीला फार महत्त्व आहे. शिवसेनेचे सभागृहात असणाऱ्या मुळ संख्याबळाच्या दोन तृतीयांश आमदारांचा कोरम त्यांच्याकडे पूर्ण असल्याशिवाय त्यांची पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून मुक्ती होणार नाही. त्याचवेळी, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार राज्यात सत्ताकारणात घटनात्मक पेच उभे राहिल्यास त्यांची सोडवणूक ही विधीमंडळ सभागृहात व्हायला हवी. या दोन बाबी पाहता बंड यशस्वी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे किमान ३७ आमदार सोबत घ्यावे लागतील. यात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या आमदारांची गणना करून चालणार नाही. दुसरी बाब म्हणजे फ्लोअर टेस्ट हा सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या घटनात्मक पेचप्रसंगात सांगितलेला उपाय. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असणाऱ्या आमदारांची संख्या पाहता विरोधी पक्षांकडून सरकारवर अविश्वासाचा ठराव आणला जाईल. सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी दिलेल्या या संधीचा उपयोग करण्यासाठी बंडखोर आमदारांनाही मतदानात सहभागी व्हावे लागेल. शिवसेनेचे आमदार प्रत्यक्ष सभागृहात आल्यानंतर ते उध्दव ठाकरेंचा सामना कसा करतील, ही या कसोटी तंत्रातील निर्णायक बाब असेल. काल आपल्या फेसबुक लाइव्ह मधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हीच साद सेनेच्या आमदारांना घातली आहे. खरेतर, शिवसेनेच्या आमदारांची बंडखोरी ही उध्दव ठाकरे यांच्या विरोधात नसून शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या सोबत असलेल्या अनैसर्गिक युती विरोधात आहे. अर्थात, सध्याला एकनाथ शिंदे यांच्या बरोबर काॅंग्रेसचेही आमदार असल्याने आता हे बंड नेमके कसे आहे, याचे बरेचसे आकलन अजून व्हायचे आहे. तूर्तास, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार टिकविण्यासाठी प्रयत्नरत आहे. तर, विरोधीपक्ष नव्या बंडखोर गटाला सोबत घेऊन सरकार स्थापण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार टिकविण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी, सकृतदर्शनी सरकार धोक्यात आल्याचे दिसते. तरीही, राजकारण आणि त्यायोगे सत्ताकारणात घटनात्मक पेचप्रसंग हाताळताना अनेक धक्कादायक बाबी घडून येतात, असा आजवरचा अनुभव राहीलेला आहे. आमदारांची बंडखोरी ही एक बाब असली तरी, सरकार पक्षाचा अविश्वास ठराव बहुमताने पारित होईपर्यंत जर-तर च्या बाबीला फार महत्त्व नसते. शिवसेना पूर्वी इतकी जहाल राहीली नसली तरी शिवसेनेचा इतिहास पाहता शिवसैनिकांची एक अघोषित दहशत शिवसेनेच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिंधींवर कायम राहिली आहे. त्यामुळे, थेट शिवसैनिकांच्या मानसिकतेला या परिस्थितीत आवाहन करणे, हा सेनेचा हुकूमी एक्का असतो. याच दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात ते शिवसैनिकांना आवाहन करताहेत की, ” यापुढे शिवसेनेचा एक जरी लोकप्रतिनिधी पक्ष सोडून गेला,तर, त्याला कायद्याची परवा न करता भररस्त्यात तुडवा”, याचाच अर्थ बंडखोरी च्या विरोधात शिवसैनिकाचा वापर करणे हे शिवसेनेचे परंपरागत अस्त्र राहिले आहे. हेच अस्त्र आता उध्दव ठाकरे यांनी सोबर पध्दतीने वापरले आहे. त्यांनी शिवसैनिकांना थेट आक्रमक आव्हान न करता शांतपणे वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडून ते मातोश्रीवर आले. यादरम्यान निर्माण झालेले वातावरण फारच भावनिक होते; आणि याचा थेट परिणाम सामान्य शिवसैनिकांच्या मनावर झाला आहे. खासकरून महिलांचा भावनिक आक्रोश या परिस्थितीला आणखी गंभीर बनवून गेला. एकंदरीत, दोन्ही बाजूंचे वातावरण रस्सीखेच करणारे असून, कायदा आणि घटना यांच्या कसोट्या पार केल्याशिवाय दोन्ही बांजूंपैकी कोणालाही सत्तेत स्थिरावता येणार नाही, हे मात्र खरे.

COMMENTS