दुकाने उघडल्यावर पोलिसांनी खटले भरल्यास कोणतीही जबाबदारी घेणार नसल्याचे व्यापारी महासंघाने सोमवारी सकाळी स्पष्ट केले.
पुणे : दुकाने उघडल्यावर पोलिसांनी खटले भरल्यास कोणतीही जबाबदारी घेणार नसल्याचे व्यापारी महासंघाने सोमवारी सकाळी स्पष्ट केले. यामुळे दुकाने उघडण्यासंदर्भात व्यापाऱ्यांमध्ये दुमत असल्याचे दिसले.याही परिस्थितीत शहरात काही ठिकाणी दुकाने उघडी ठेऊन विक्री सुरु होती.
यामध्ये वाईन शॉप, होजिअरी, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर आदींचीही दुकाने उघडी होती. व्यापारी महासंघाने दुकाने उघडण्याचा निर्णय रविवारी रात्री मागे घेतला. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकार व महापालिकेने 30 एप्रिल पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. व्यापारी महासंघाने निर्णयला विरोध करत सोमवारी दुकाने कोणत्याही परिस्थितीत उघडण्याचे जाहीर केले होते. मात्र पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला व्यापारी महासंघाशी चर्चा करण्याचा आदेश दिला. त्यानूसार विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांची सोमवारी पहाटे उशीरापर्यंत बैठक सुरु होती. सोमवारी व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करू असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले होते. तसेच पालकमंत्री अजित पवारही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. दरम्यान व्यापारी महासंघाने मुख्यमंत्र्यांनी निर्णय कळवल्यानंतर महासंघ आपला निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
COMMENTS