व्यवस्थेचा मृत्यू

Homeसंपादकीय

व्यवस्थेचा मृत्यू

प्रत्येक यंत्रणेत एक व्यवस्था असते.

राजकीय कटूता संपणार का ?
फसव्या जाहिराती आणि ग्राहक
अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस  

प्रत्येक यंत्रणेत एक व्यवस्था असते. ही व्यवस्थाच यंत्रणा सुरळीत करीत असते; परंतु व्यवस्था किती सडक्या झाल्या आहेत, त्या कशा मृत्यूपंथावर चालल्या आहेत, याची उदाहरणं अपवादात्मक नाहीत, तर ती जास्त आहेत आणि हाच खरंतर काळजीचा विषय आहे. 

उदाहरण पहिलं. अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात दोन जणांचा ऑक्सिजचं सिलेंडर न लावल्यानं मृत्यू झाला. व्यवस्थेचं साचेबद्ध उत्तर. असं काही झालेलं नाही. झालं असल्यास चौकशी करू. निर्ढावलेली आणि संवेदना हरवलेली यंत्रणा दुसरं काय सांगणार म्हणा. उदाहरण दुसरं. नालासोपारा परिसरात ऑक्सिजन न मिळाल्यानं तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला. नैसर्गिक मृत्यू आला असता, तर कुणाला त्याचं फारसं दुःख झालं नसतं; परंतु व्यवस्थेच्या गलथानपणामुळं मृत्यू झाला. ज्यांच जातं, त्यालाच कळतं. दुसर्‍यांना त्याचं काय, अशी स्थिती आहे. तिथंही मिळालेलं उत्तर नगरसारखंच होतं. तिथं असं सांगण्यात आलं, की ऑक्सिजन न मिळाल्यानं नव्हे, तर संबंधित रुग्णांची प्रकृतीच अतिशय खराब झाली आणि त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्रातील या घटनांवर विरोधी पक्षांनी आवाज उठविला. ते योग्यच आहे, म्हणा; परंतु महाराष्ट्रातील विरोधक मध्य प्रदेशात सत्तेवर आहेत आणि तेथील भाजप नेत्याच्या नातेवाइकाचा मृत्यू वॉर्डबॉयनं रुग्णाचा ऑक्सिजन काढल्यानं झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतं. त्यावर रुग्णालय प्रशासनानं मात्र दोन वेगवेगळी उत्तर दिली आणि त्यापैकी कोणतं खरं मानायचं, हा प्रश्‍नच आहे. डॉक्टर देव नाही, हे खरं आहे. रुग्ण गेल्यानंतर संतापाच्या भरात रुग्णालयांची मोडतोड करणं हे चुकीचंच आहे; परंतु व्यवस्थेचा मृत्यू रुग्णांच्या जीवावर येत असेल, तर त्यावर काय करायचं, हे कुणीच सांगत नाही, हे ही तितकंच खरं. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित कोरोना रूग्णाचं ऑक्सिजन मशीन वॉर्ड बॉयनं ाढून टाकलं. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं रुग्ण पलगांवरच तडफडून मेला. त्याच्या तोंडाला ऑक्सिजन लावलेलं होतं; परंतु मशीनच काढून नेल्यानं त्याची तडफड सुरू झाली. तो आणखी जोरात ऑक्सिजन मास्क दाबायला लागला; परंतु त्याला कुठं माहीत होत, की त्याचं मशीनच काढून नेलं. ऑक्सिजन न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाला खरंतर हा मृत्यू नसून खून आहे, असं समजायला हवं. 

जिल्हा रुग्णालयाची व्यवस्था किती गतीमान आहे, याचा प्रत्यय तिथं आला. नऊ तास त्या रुग्णाकडं कुणीही फिरकलं नाही. मुलगा आला तेव्हा त्यानं वडीलांना अतिदक्षता कक्षात नेण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. ही संपूर्ण घटना कोविड वॉर्डमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्यामुळं तरी वॉर्डबॉयचा प्रताप उघड्यावर आला. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. के. बी. वर्मा म्हणाले, की, रुग्णाची ऑक्सिजन काढली गेली नाही. त्याची प्रकृती खराब होती, म्हणून तो वाचू शकला नाही. नालासोपारा कुठं आणि शिवपुरी जिल्हा कुठं. दोन्ही सरकारी, निमसरकारी यंत्रणा. सारख्याच निर्ढावलेल्या. उत्तरंही सारखीच. अधीक्षकांच्या उत्तराशी शिवपुरीचं कुटुंब जसं सहमत नाही, तसंच नालासोपार्‍यातील सात कुटुंबही सहमत नव्हती. शिवपुरी जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली, तेव्हा त्याला प्रशासन अगोदर दादच देईना. जेव्हा या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, तेव्हा त्यात वॉर्डबॉय संबंधित रुग्णाचं ऑक्सिजनचं मशीन काढताना स्पष्ट दिसतो. त्यावरही जिल्हा रुग्णालयानं कडी केली. संबंधितावर कारवाई करण्याऐवजी अधिष्ठात्यांनी असा युक्तिवाद केला, की रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता नाही, म्हणून परिचारिकेच्या सांगण्यावरून वॉर्डबॉयनं दुसर्‍या रुग्णासाठी ऑक्सिजन मशीन काढलं. संबंधित रुग्णाला ऑक्सिजनची गरज नाही, असं सांगण्याचा परिचारिकेला अधिकार आहे का, ती डॉक्टर आहे का, असे प्रश्‍न उपस्थित होतात. रुग्णालय व्यवस्थापनाच्या या दोन भिन्न युक्तिवादांमुळे प्रकरण केवळ संशयास्पदच झालं नाही तर जबाबदार्‍या कशा ठरवल्या जातात आणि त्या कशा टाळल्या जातात, हे स्पष्ट होतं. खरंतर संबंधित परिचारिका आणि वॉर्डबॉय तसंच या वॉर्डाची जबाबदारी असणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अक्षय निगम यांनी एक पथक नियुक्त केलं; परंतु त्यामुळं गेलेला जीव परत येणार नाही, हेच खरं. शिवाय फुटेजमध्ये छेडछाड होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. दोषींवर ठपका ठेवून केवळ चालणार नाही, तर त्यांच्यावर कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. लोकांच्या प्राणांची किंमत किड्यामुंग्यासारखी करणार्‍यांना त्यांची किंमत कळायलाच हवी. कोरोनाबाधितांजवळ नातेवाइकांना थांबता येत नाही. त्याचा गैरफायदा व्यवस्था घेते. सुरेंद्र शर्मा यांचा मुलगा घरी गेला. त्यानंतर वॉर्डबॉय पोर्टेबल ऑक्सिजन काढून घेतला. त्यानंतर शर्मा यांची प्रकृती खालावली. फुटेज पाहिल्यावर दिसतं, की असह्य वेदना होत असताना सुरेंद्र शर्मा गुडघ्यात डोकं घालून बसले आहेत. कधीकधी डोक्यावर मारून घेत आहेत. ना डॉक्टर आले, ना इतर कुठलाही स्टाफ. सकाळी आठ वाजता वॉर्डात आलेला मुलगा दीपक शर्मा यांनी वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितलं. वडिलांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली; परंतु कुणीही उपचारांसाठी मदत केली नाही. गंभीरपणे घेतलं नाही. सकाळी ड्युटी डॉक्टरांशी बोलूनही उपयोग झाला नाही. एका शिक्षकाचा असा मृत्यू झाला, हा व्यवस्थेचा पराभव आहे. शिक्षक सुरेंद्र शर्मा हे भाजपा राज्य कार्यकारिणीचे सदस्य धैर्यवर्धन शर्मा यांचे मामा होते. धैर्यवर्धन यांच्या मामांची ही अवस्था, तर सामान्यांचं काय होत असेल, याचं उत्तर मध्य प्रदेश सरकार देणार नाही. 

COMMENTS