कोरोनाच्या जागतिक महामारीचे मळभ दूर होत असून, रुग्णांची संख्या कमी होतांना दिसून येत आहे. ही सुखद वार्ता असली तरी देखील माणसांच्या मना-मनामध्ये असलेल
कोरोनाच्या जागतिक महामारीचे मळभ दूर होत असून, रुग्णांची संख्या कमी होतांना दिसून येत आहे. ही सुखद वार्ता असली तरी देखील माणसांच्या मना-मनामध्ये असलेला अविवेक काही दूर होतांना दिसून येत नाही. माणसाच्या जीवनामध्ये अविवेक हाच त्याच्या दु:खाला कारणीभूत असतो. या अविवेकाची माणसाच्या मन:पटलावर काजळी जमा झालेली आहे, ती काजळी ‘फेडून’ तिथे विवेकाचा नंदादीप सातत्याने पेटत राहो, याच दिवाळीनिमित्त दैनिक लोकमंथनच्या वाचकांना, जाहिरातदार, विके्रत्यांसह तमाम नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा.
भारतीय व्यवस्थेतील मुख्य घटक असणारा शेतकरी. या शेतकरी आणि शेतीच्या जीवनशैलीशी निगडीत असणारे आपले सण-उत्सव आणि परंपरा. दिवाळी सण हा देखील शेतीशी निगडित सण. हिवाळयाची चाहूल लागलेली असते, शेतकर्यांचे पीक जोमात आलेले असते, धन-धान्यांची रास म्हणजेच समृद्धीचं प्रतीक, लक्ष्मीचं आगमन, आणि त्याप्रसंगी असणारी कृतज्ञता, नात्यांची घट्ट वीण जपणारा हा दिवाळीचा सण. दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच! आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे. शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरीची रात्र पूर्ण चंद्रबिंब घेऊन येते. आटवलेल्या केशरी दुधासह आपण ही रात्र जागवतो. याच रात्री देवीची पूजा केली जाते, तिला आटीव दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवसाला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात कारण शेतातून नुकत्याच हाती आणलेल्या धान्याची कणसे देवीला अर्पण केली जातात. या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ रमा एकादशी येते. आपण ज्या काळात दिवाळी साजरी करतो त्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात फक्त शेतीवर अवलंबून होता त्याकाळात शेतात पिकलेले धान्य ज्यावेळी कोठारात भरेल आणि विकले जाईल तो काळ समृद्धीचा मानला जाणे स्वाभाविक होते. त्यामुळे धान्याची मुबलकता असताना आणि शरद ऋतूचा आल्हाद असताना दोन्हीचा एकत्र आनंद घेण्यासाठी दिवाळी सणाची योजना दिसते. वसुबारसेचा आदला दिवस म्हणजे रमा एकादशी. या दिवशी अंगणात दारातल्या तुळशीपुढे पहिली पणती लावली जाते. शहरात नसले तरी ग्रामीण भागात हे चित्र दिसते. शहरात बरेचदा वसुबारसेला दिवाळी सुरु होते. दीपावली म्हणजेच दिव्यांची ओळ अर्थातच घरोघरी तेवत असणार्या पणत्या, अंगणामध्ये केलेली दिव्यांची आरास, मनामनांमध्येही उजळलेला सकारात्मकतेचा प्रकाश म्हणजेच दिवाळीचा सण.
दीपावलीला आपल्याकडे अनेक शतकांची परंपरा आहे. दिवाळी हा अत्यंत आनंद देणारा सण दीपावली म्हणून सुद्धा ओळखला जातो. या सण भारतात नव्हे तर इतर देशातसुद्धा प्रसिद्ध आहे. दिवाळीपेक्षा दिपावली हाच शब्द या सणासाठी जास्त शोभतो. दीपावली म्हणजे सणांच्या ओळी. हा सण इतर इतर सणांपेक्षा वेगळा आहे, त्याच हेच कारण होय. या सणात आकाशातले तारे पृथ्वीवर येतात, अशी कविकल्पना आहे. आश्विन महिन्यातील शेवटचे तीन दिवस आणि कार्तिक महिन्यातील पहिले दोन दिवस असा पाच दिवसांचा दिवाळीचा उत्सव असतो. शरद ऋतूच्या मध्यभागी येणार हा दीपोत्सव काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीचा उल्लेख देखील संत साहित्यातही ओघाने आलेले दिसतात. देवभक्ती आणि चांगल्या वर्तणुकीची सामान्यजनांना साथ देणार्या महाराष्ट्रातील नामवंत संतांच्या बोलांमध्ये दिवाळीचे उल्लेख जागोजागी आढळतात. संतानी दिवाळीचा संदेश देतांना नकारात्मक विचार दूर ठेऊन माणसाने नेहमीच सकारात्मक राहावे असा संदेश दिला आहे. त्यासाठी प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनातील अविवेकाचा अंधार दूर केल्यास, आपल्या जीवनात विवेकाचा दीप उजळेल. एकदा विवेकाचा दीप उजळला की सद्विचारांकडे जाणारी वाट दिसू लागेल. त्या वाटेवरून जाताना मिळणारा आनंद खंडित होणारा नसेल. म्हणूनच ती दिवाळी खर्या अर्थाने अखंडित राहणारी असेल. जीवनातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा व्हावा.
दिवाळी हा सण काही फक्त भारतातच साजरा होत नाही. हा उत्सव भारतासह नेपाळ, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, मॉरीशस, सुरीनाम, त्रिनिदाद आणि दक्षिण आफ्रिका मध्ये साजरा केला जातो. लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि फराळ, मिठाई वाटतात. दिवाळीच्या दरम्यान आपण आपली गत काळातील दुःखे विसरून जातो. मनातील किल्मिषे दूर करून, आनंदाने ही दिवाळी साजरी केली जाते. डोक्यात जे भरले गेले असते ते फटाके वाजवतो आणि सारे काही विसरून जातो. फटाक्यांप्रमाणे गत काळ देखील जळून जातो, नष्ट होतो आणि आपले मन नवीन नूतन बनते. हि दिवाळी होय. दिवाळीचा आनंद निरंतर जीवनात राहायचा असेल तर संतांच्या विचारांचा उजेड आपल्यामागे पुढे दाटला पाहिजे. त्या उजेडात केलेली वाटचाल आपला जीवनाचा प्रवास सुखकर करील. त्यामुळे जीवनात आलेली दु:ख-दैन्य पळून गेली नाहीत, तरी त्यांचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होवो, याच दिवाळीच्या तमाम वाचकांना शुभेच्छा !
COMMENTS