नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला.
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी येत्या १५ ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव दिले नाही तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी देण्यात आला आहे. या आंदोलनात नवी मुंबई, पनवेल, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली अशी विविध ठिकाणांहून आंदोलक सहभागी झाले होते.
काय आहे पार्श्र्वभूमी
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर दि.बा. पाटील यांना मानणारा मोठा समाज आणि आगरी कोळी बांधवांचा एल्गार नवी मुंबईत पाहायला मिळाला. यावेळी स्थानिक भूमिपुत्रांकडून सिडको प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आंदोलनास सुरुवात करण्याआधी आंदोलक नेत्यांकडून दि बा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची सुरक्षा, वाहतुकीत बदल
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिडको भवनाकडे कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मुंबई, ठाणे आदी भागांतून पोहोचणार्या रस्त्यांवर सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पनवेल-शीव महामार्गावर रोड, पाली ते बेलापूर अशी वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या वाहतूक कोंडीला सर्वसामान्यांना सामोरे जावे लागले. नवी मुंबईत काही ठिकाणी यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला होता. मुंबईहून पुण्याकडे तसेच पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आला होता. वाशी टोल नाका, वाशी गाव, पाम बीच मार्ग शिळ फाटा या मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र बंद करण्यात आलेली वाहतूक दुपारनंतर पूर्ववत सुरू करण्यात आली.
दिबांचं नाव दिल्यास निश्चितच आनंद होईल : अतुल पाटील
दि.बा. पाटील यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असूनही आज त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य राजकारणात नाही. विमानतळ नामकरणाच्या पार्श्वभूमीवर दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांनी सांगितले की, विमानतळाला दिबांचं नाव लागलं तर आम्हाला निश्चितच आनंद होईल. आम्हाला अशी खात्री आहे की, त्यांचं नाव विमानतळाला लागेलच. दिबा पाटील यांच्या नावाखातर लोकं आंदोलनात उत्स्फूर्तपणे उतरत आहेत. मला हे आंदोलन पाहून १९८४ च्या आंदोलनाची आठवण झाली.
COMMENTS