अहमदनगर/ 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामात अपहार केल्याबद्दल राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटाचे समर्थक व लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीचे
अहमदनगर/ 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामात अपहार केल्याबद्दल राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटाचे समर्थक व लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच संतोष चंद्रकांत माने, विद्यमान सरपंच रामदास बबन ठोंबरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ काशिनाथ खामकर यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सारिका रोहिदास हराळ यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या लोणी व्यंकनाथ येथील ग्रामपंचायतीत सन 2018 ते 20 या कालावधीत 14 व्या वित्त आयोगातील शासकीय निधीचा गैरवापर करत विकास कामात अनियमितता, प्रशासकीय अनियमितता व मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार प्रकरणी गावातील राजेंद्र काकडे, एस.पी. जगताप,दादा मडके, स्वप्निल लाटे यांनी केलेल्या तक्रार अर्जावरून झालेल्या चौकशी अहवालात दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी सोमवारपासून (दि. 20) तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. काकडे यांच्या उपोषण आंदोलनापुढे अखेर प्रशासन नमल्याने अपहार प्रकरणी आजी-माजी सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकार्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 2018 ते 19 दरम्यान तत्कालीन सरपंच संतोष चंद्रकांत माने व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ काशिनाथ खामकर यांनी संगनमताने 14 व्या वित्त आयोगातील निधी व वित्त आयोगाच्या आराखड्यात समाविष्ट नसलेली काही कामे इन्व्हर्टर खरेदी, कार्यालय पीओपी, स्मशानभूमी मुरुमीकरण, कार्यालय विस्तार, पेव्हर ब्लॉक, एलईडी दिवे, फर्निचर इत्यादी कामात अनियमितता व कागदोपत्री कामे दाखवून 25 लाख 56 हजार 252 रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर यांच्या जानेवारी 2020 ते आजअखेर कालावधीत पवारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत व शेंडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत या कामात प्रत्यक्ष काम न करता 1 लाख 32 हजारांची बिले काढून शासनाची फसवणूक केल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, लेखापरीक्षण अधिकारी, स्थानिक लेखा परीक्षा कार्यालय यांच्या संयुक्त चौकशीत एकूण 26 लाख 88 हजार 352 रुपयांचा अपहार व शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी सारिका रोहिदास हराळ यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात माजी सरपंच संतोष माने, विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व सध्या सेवानिवृत्त असलेले रामभाऊ खामकर यांच्यावर शासनाची फसवणूक व आर्थिक अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होण्याआधी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले व पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती यांनी ग्रामपंचायत लोणी व्यंकनाथ येथे भेट देऊन पाहणी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार माळी करत आहेत.
COMMENTS