स्वत:च्या फायद्यासाठी अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करुन आपली
मुंबई : स्वत:च्या फायद्यासाठी अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी करुन जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास दिल्या प्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
अलिबाग कोर्लई येथील संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध समाजमाध्यमांद्वारे केला होता. यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा तसेच या दोघांमधील आर्थिक हितसंबंध काय आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. परंतु त्यांचे या सर्व निराधार आरोपात काहीच तथ्य नसल्याचे विविध प्रसामाध्यमांनीच पुढे उघडकीस आणल्याने सोमय्या या प्रकरणी तोंडघशी पडले.
त्यानंतर महाकाली गुंफा येथील जमिनप्रकरणी वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवांकडून २५ कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत विविध समाजमाध्यमांद्वारे केला. हे आरोप करतानाही त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नाहीत. किरीट सोमय्या हे सातत्याने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी लोकप्रतिनिधीची आपली जनमानसातील प्रतिमा, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास देत असल्याने, वायकर यांनी सोमय्या यांना या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास सिव्हील व क्रिमिनल कायदेशी कारवाई करण्याचा इशारा सोमय्या यांना नोटीसीद्वारे दिला होता. एवढेच नव्हे या दोन्ही प्रकरणी वायकर यांनी मुंबई पोलिस आयुक्त तसेच एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यास पत्र देऊन बेताल व बिनबुडाचे वक्तव्य करुन जनमानसातिल लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करणार्या किरीट सोमय्या यांना लगाम घालण्याची उचित ती कारवाई करण्याची विनंतीही या अगोदर केली आहे. अखेर आमदार रविंद्र वायकर यांनी स्वत:च्या फायद्यासाठी नाहक बदनामी करणार्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रुपये १०० कोटींचा अबुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर लवकरच याप्रश्नी ते क्रिमीनल दावाही दाखल करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.
COMMENTS