वापरलेले मेडिकल साहित्य  चक्क फेकले रस्त्याच्या कडेला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वापरलेले मेडिकल साहित्य चक्क फेकले रस्त्याच्या कडेला

मेडिकलचे वापरून झालेले साहित्य रस्त्याच्या कडेला फेकण्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीस आला आहे.

शहर व तालुका बंद आंदोलनास उस्फुर्त प्रतिसाद
पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा
नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम वेगात ; 85 खांब राहिले उभे, नियोजित वेळेआधीच काम पूर्ण होण्याची शक्यता

अहमदनगर/प्रतिनिधी- मेडिकलचे वापरून झालेले साहित्य रस्त्याच्या कडेला फेकण्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीस आला आहे. सध्या कोरोनाचा विषय सर्वत्र सुरू झाला असताना तारकपूर स्टँडच्या परिसरात रस्त्यावरच कोरोना उपचारासाठी वापरलेले साहित्य फेकून दिल्याची घटना रविवारी उजेडात आल्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पुढील कारवाई सुरू केली आहे. 

    शहरामध्ये जी रुग्णालय आहेत, त्यांनी औषधाचा वापर झाल्यानंतर त्याचा कचरा व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवून तो नंतर महापालिकेद्वारे संकलित केल्या जाणार्‍या बायोमेडिकल वेस्टच्या वाहनांमध्ये देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. याचे शहरामध्ये पालन होत असले तरी रविवारी मात्र धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तारकपूर बस स्थानकाच्या समोर असणार्‍या एका ठिकाणी कोरोना उपचारासाठी वापरण्यात आलेल्या औषधांचे साहित्य वापर झाल्यानंतर सर्रासपणे रस्त्याच्या कडेला टाकून देण्याचा प्रकार उजेडात आला आहे. आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करून त्यांना याची माहिती दिली. वास्तविक पाहता अशा प्रकारे वापर झालेल्या मेडिकल कचर्‍याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. पण तसे होताना दिसत नसल्याने संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भामध्ये महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा मेडिकल कचरा उचलण्यासाठी तात्काळ महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी त्याठिकाणी पाठवले आहेत. हा कचरा येथे नेमका कोणी टाकला, याचा उलगडा झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

COMMENTS