महाराष्ट्रावर एकामागून एक संकटे येत आहेत. नैसर्गिक संकटांसोबत मानवी संकटेही कमी नाहीत. कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था संकटात आहे. त्यातच गेल्या वर्षभरात निसर्ग चक्रीवादळासह अतिवृष्टीने आपली पाठ सोडलेली नाही.
महाराष्ट्रावर एकामागून एक संकटे येत आहेत. नैसर्गिक संकटांसोबत मानवी संकटेही कमी नाहीत. कोरोनामुळे राज्याची अर्थव्यवस्था संकटात आहे. त्यातच गेल्या वर्षभरात निसर्ग चक्रीवादळासह अतिवृष्टीने आपली पाठ सोडलेली नाही. हवामान बदलाच्या गंभीर परिणामांचे चटके आता बसायला लागले आहेत. प्रगत तंज्ञत्रानाने नैसर्गिक संकटांची सूचना अगोदर मिळत असल्याने जीवितहानी कमी करण्यात यश येत असले, तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे.
चार-सहा महिन्यांच्या पिकांना जास्त गुंतवणूक करावी लागत नाही;परंतु वादळाचा फटका सातत्याने ज्या भागाला बसतो, त्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नगदी पिकांचे आणि फळबागांचे प्रमाण जास्त आहे. फळबागा एका दिवसात उभ्या राहत नाहीत. त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. प्राणपणाने बागा जपाव्या लागतात. कष्ट करावे लागतात. जेव्हा बागा हातातोंडाशी येतात, तेव्हा वादळामुळे त्या मोडून पडतात. आताही तौक्ते चक्रीवादळाने तसेच केले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील सुमारे दहा हजार नागरिकांना हलविण्यात आले आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम चालू होते. निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव लक्षात घेऊन कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वादळाची पूर्वसूचना लक्षात घेऊन महावितरणच्या कर्मचार्यांना सज्ज राहायला सांगितले होते; परंतु तौक्ते चक्रीवादळाचा वेगच इतका होता, की झाडे, घरे कोसळली. वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुुरवठा खंडीत झाला. गेल्या 24 तासांहून अधिक काळ तीन जिल्ह्यांतील वीजपुरवठा करण्यात यश आलेले नाही. वार्याचा वेग ताशी ऐंशी ते शंभर किलोमीटर होता. त्यामुळे त्यापुढे फळबागा टिकू शकल्या नाहीत. झाडे उन्मळून पडली. हजारो घरे उद्ध्वस्त झाली. झाडे गाड्यांवर कोसळून त्यांची स्थिती अतिशय वाईट झाली. कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यात चक्रीवादळाने अनेकांचे बळी घेतले. मुंबईपासून नगरपर्यंतच्या तीनशे किलोमीटर परिसरात घोंघो करीत वाहणार्या वार्याने जणू धडकीच भरवली होती. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडीत झाला. अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेने सरकत असलेले तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मुंबईच्या समांतर समुद्रातून हे चक्रीवादळ पुढे जाणार असून, त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्याच्या किनारपट्टी भागात दिसतो आहे. तौक्ते चक्रीवादळ मुंबईला धडकणार नसले, तरी समुद्रातून गुजरातकडे सरकणार्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वार्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मुंबई, ठाणे जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे. दरम्यान, चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतर त्याचा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात वादळी पाऊस झाला.
कोकणाबरोबरच पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला. पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळून घराची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यात दोन अंगणवाड्यांसह तब्बल 70 घरांची पडझड झाली आहे. सातारा जिल्ह्यात कोयना परिसर आणि इतर भागात झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांमध्ये शनिवारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा फटका बसला. रविवारी सकाळी चक्रीवादळ अतितीव्र होऊन त्याचा वेगही वाढला. समुद्रामध्ये सध्या ताशी सुमारे 170 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. गोव्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असताना या भागात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. पुढे ते दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ सरकले. त्यामुळे या भागात सोसाटयाच्या वार्यासह जोरदार पाऊस सुरू झाला होता. बहुतांश भागांत विजेचे खांब कोसळले, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. पश्चिम घाट परिसरात सर्वदूर वादळी वारा आणि जोरदार पाऊस झाला. या कालावधीत साधारण 70 ते 90 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मच्छीमारांनीही समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभाग आणि महापालिकेने केले आहे. पूर्वसूचना देऊनही लोक ऐकत नाहीत आणि प्रशासनाची भंबेरी उडवितात, असा अनुभव या वादळातही आला. वादळामुळे मच्छीमारीसाठी जाऊ नये, अशा सूचना दोन दिवस अगोदर देऊनही शेकडो मच्छीमार नौका घेऊन समुद्रात उतरले. वादळ जसजसे मुंबई आणि कोकणच्या दिशेने यायला लागले, तसतसे मच्छीमारांना सुखरूप किनार्यावर आणण्याची सोय करावी लागली. बोटी नांगरून ठेवाव्या लागल्या. चक्रीवादळामुळे निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना बचावकार्यासाठी सज्ज राहाण्याच्या सूचना आयुक्तालयाने दिल्या. महापालिकेचा आपत्कालिन विभाग, अग्निशमन दल, रुग्णालयांशी समन्वय ठेवावा, अशाही सूचना आयुक्तालयाने पोलिसांना दिल्या आहेत. पाणी साचल्यास, वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्यास रुग्णवाहिका, प्राणवायू वाहून नेणारी आणि आरोग्य सेवकांची वाहने खोळंबू नयेत, याची काळजी घ्यावी. कोरोना रुग्णांसाठी ज्या ठिकाणी प्राणवायू पुरवठा यंत्रणा कायान्वित आहे तेथील सुरक्षा आढावा घ्यावा, असेही पोलिस ठाण्यांना कळविण्यात आले. महावितरण, टाटा, अदानी, रिलायन्सच्या कर्मचार्यांना सज्ज राहून वीजपुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) बंदरातील जहाजांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सर्व जहाजांना बंदरात प्रवेश बंद केला आहे. वादळामुळे कोणतीही हानी पोहचू नये, यासाठी टर्मिनल्सना त्यांची कार्गो हँडलिंगची साधने आणि इतर उपकरणे सुरक्षित ठेवावीत. टर्मिनलवरील क्रेन टाय-डाऊन करून सुरक्षित ठेवण्यात याव्यात, अशा सूचना बंदर प्रशासनाने यंत्रणांना दिल्या आहेत. जेएनपीटी ते मुंबई दरम्यानची प्रवासी बोट सेवा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
COMMENTS