वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सुविधांचे नियोजन करा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सुविधांचे नियोजन करा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करा.

श्रीरामपुरात पोलिस ठाण्यातच अधिकार्‍याला धक्काबुक्की व मारहाण
उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान – आमदार थोरात
गट शिक्षणाधिकार्‍यांना काढल्या जाणार नोटीसा ; शाळाबाह्य मुलांची माहितीच पाठवली नाही

अहमदनगर:  कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करा. तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकरात लवकर चाचण्या होणे आणि त्यांच्यावर उपचार सुरु करणे अतिशय महत्वाचे आहे. याशिवाय, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन बेडस् आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देऊन रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन येत्या महिना अखेरीस होणारी संभाव्य रुग्णसंख्या विचारात घेऊन नियोजन करावे, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केल्या.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त श्री. गमे आणि राज्याचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मु्ख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उदय किसवे, डॉ. अजित थोरबोले, जयश्री माळी, जयश्री आव्हाड, रोहिणी नर्‍हे, उज्ज्वला गाडेकर, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदीची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी श्री. गमे यांनी जिल्ह्यात दैनंदिनरित्या होणारे चाचण्यांचे प्रमाण, बाधितांचे प्रमाण, बाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करणे (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), प्रतिबंधीत क्षेत्रात (कन्टेन्टमेंट झोन) केल्या जाणार्‍या उपाययोजना, जिल्ह्यात असणारी मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता, औषधसाठा, जिल्ह्यात सध्या असणारी बेडसची उपलब्धता, ऑक्सीजन बेडस आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता आदींची माहिती घेतली.

जिल्ह्याच्या काही भागात विशेषता महानगरपालिका,  संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणी रुग्ण संख्या वाढीचा वेग जास्त असल्याचे दिसत आहे. याशिवाय, ज्याठिकाणी सध्या रुग्णवाढीचा वेग कमी दिसत असला तरी आगामी काळात तो वाढणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे, असे सांगून श्री. गमे यांनी राज्य शासनाने संसर्गाची साखळी  तोडण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, अशा सूचना केल्या.  रुग्णवाढीचा वेग जास्त असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करुन बाधित व्यक्तींना तात्काळ उपचार उपलब्ध करुन देणे, त्यांना इतरांपासून अलग करणे आणि संसर्गाची साखळी तुटेल यापद्धतीने आता कार्यवाही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्‍या नागरिकांची संख्या जास्त दिसत आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी गावपातळीवर नेमलेल्या पथकाने प्रभावी काम करावे.  बाधित रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्ती शोधून त्यांची चाचणी केली जावी. त्यादृष्टीने यापुढे गतिमान कार्यवाही अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

सध्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रुग्णवाढीचा वेग अहमदनगर जिल्हयात जास्त दिसत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहून त्यावर उपाययोजना आवश्यक आहे. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन वाढवल्या गेल्या पाहिजेत. अधिकाधिक प्रमाणात कोविड केअर सेंटर कार्यान्वित करुन बाधित व्यक्तींना तेथे उपचारासाठी दाखल करणे अपेक्षित आहे. त्या सेंटरमध्ये आवश्यक सुविधा, मनुष्यबळ गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने त्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, साखर कारखाने, विविध उद्योग, मोठ्या संस्था, बॅंका, पतसंस्था आदींचे त्यासाठी सहकार्य घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याची सूचना त्यांनी केली. चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी अतिरिक्त एक्स्ट्रॅक्टर घेऊन ती वाढवावी. जिल्ह्यात सध्या तीन हजार दैनंदिन स्वरुपात चाचण्या होत आहेत. ही संख्या किमान पाच हजारापेक्षा अधिक होणे अपेक्षित आहे. याचबरोबच, ज्या क्षेत्रात बाधित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, तेथे रॅपिड अॅण्टीजेन चाचण्या वाढवावयाची गरज असल्याचे ते म्हणाले.  जिल्ह्यातील एकूण ऑक्सीडन बेडसची संख्या वाढवावी. जिल्ह्यातील औषधसाठा पुरेशा प्रमाणात असेल, याची खातरजमा करावी. कन्टेन्टमेंट झोन जाहीर केल्यानंतर तेथे कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी डॉ. सुधाकर शिंदे यांनीही चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चाचण्या वाढवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी खासगी लॅबशी समन्वय साधून आणि करार करुन त्यांच्या सेवा घ्या. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काही दिवस हे अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे नागरिकांनीही त्यांना काही लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करुन घेणे. आजार अंगावर न काढणे आणि कुटुंबातील इतर सदस्य बाधित होणार नाहीत, यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.  खासगी रुग्णालयात विनाकारण ऑक्सीजन अथवा व्हेंटीलेटर बेडस् रुग्णांनी अडवल्या गेल्या नाहीत ना हे तपासण्याची सूचना त्यांनी केली. उपचार आवश्यक असलेल्या व्यक्तींना ते मिळण्याची गरज आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाला गरज नसेल तर ‘स्टेप डाऊन’ याप्रमाणे त्याला कोविड केअर सेंटर अथवा इतरत्र शिफ्ट करुन दुसर्‍या रुग्णाला ते बेडस उपलब्ध करुन दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोविड संदर्भातील सर्व माहिती पोर्टलवर वेळेवर अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, जिल्ह्यातील सीसीसी सेंटर, तेथील बेडस उपलब्धता आणि संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सध्या ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे ते म्हणाले. बेडस उपलब्धता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना चाचण्या आदींसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमून समन्वय साधून काम वेगाने करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

COMMENTS