कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने वैद्यकीय सुविधांच्या तयारीचा आढावा सुरू केला आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने वैद्यकीय सुविधांच्या तयारीचा आढावा सुरू केला आहे. जिल्ह्यातील ज्या हॉस्पिटलची क्षमता पन्नास बेडस् पेक्षा जास्त आहे, त्यांनी त्यांचे स्वतःचे ऑक्सिजन प्रकल्प उभारले पाहिजे तसेच, जम्बो सिलिंडर, ड्युरासेल यांचीही उपलब्धता करुन घेतली पाहिजे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
सध्या जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सर्व ग्रामीण रुग्णालय येथे उभारले जात असून, ते काम आता तातडीने पूर्ण केले होण्यादृष्टीने संबंधित सर्वांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून 18 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व तालुकास्तरीय यंत्रणा आणि महापालिका यांनी त्यादृष्टीने आरोग्यविषयक सुविधांचे बळकटीकरण करावे तसेच सध्या निर्बंध शिथिल कऱण्यात आलेले असले तरी कोविड सुसंगत वर्तणूक करीत नसलेल्या आस्थापना आणि व्यक्तींवर कडक कारवाई करा, असे निर्देश डॉ. भोसले यांनी दिले आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांशी नुकताच दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, जयश्री आव्हाड, उज्ज्वला गाडेकर, रोहिणी नर्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी अधिकारी जिल्हास्तरावरुन तर तालुकास्तरावरुन उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कोरोनाची पहिली लाट जवळपास वर्षभर चालली. मात्र, त्यानंतर दुसर्या लाटेत अवघ्या अडीच महिन्यात जवळपास दोन लाख रुग्णांची भर पडली. सध्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. या लाटेत सध्यापेक्षा दुप्पट वेग रुग्णवाढीचा असेल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणांसह सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे. जिल्ह्यातील ऑक्सिजनची उपलब्धता, रुग्णशय्या (बेडस्) उपलब्धता, औषधे उपलब्धता याबाबतची तयारी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांची असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही, यासाठी लक्षणे जाणवणार्या रुग्णांना तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले तर सुरुवातीच्या टप्प्यातच रुग्ण बरा होऊ शकेल आणि डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि जिल्हा कोविड रुग्णालयावरील ताण कमी होऊ शकेल. ऑक्सिजनची गरजही तेवढ्या प्रमाणात कमी होईल, असे डॉ. भोसले यांनी सुचवले.
दानशुरांनी मदत करावी
कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठे उद्योजक, व्यापारी, संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था यांनीही ऑक्सिजन कॉन्स्न्ट्रेटर खरेदी करुन ते आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहनही डॉ. भोसले यांनी केले आहे.
COMMENTS