राहात्यातील दुहेरी खुनाचे गुढ उकलले  ; दाम्पत्याला संपवणारे तिघे जेरबंद, दोघांचा शोध सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहात्यातील दुहेरी खुनाचे गुढ उकलले ; दाम्पत्याला संपवणारे तिघे जेरबंद, दोघांचा शोध सुरू

राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दाम्पत्याच्या निर्घृण खुनाचे गुढ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उकलले आहे.

तारेचा शॉक लागून बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू
सोनईत सलग चौथ्या दिवशीही पाऊस
श्रीगोंदे बाजाराची दयनीय अवस्था

अहमदनगर/प्रतिनिधी- राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दाम्पत्याच्या निर्घृण खुनाचे गुढ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उकलले आहे. या दाम्पत्याच्या डोक्यात फावडे मारून त्यांचा खून करणार्‍या तिघांना पोलिसांनी पकडले असून, फरार असलेल्या अन्य दोघांचा शोध सुरू केला आहे. शेतावरील वस्तीतील घरात झोपलेल्या दाम्पत्याच्या डोक्यात फावडे मारून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दिनांक 25 राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथे घडली.

या दुहेरी हत्याकांडातील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई कोपरगाव तालुक्यात केली. याबाबतची माहिती अशी की शशिकांत चांगले व सिंधुबाई चांगले हे त्यांच्या शेतातील वस्तीवर राहावयास होते. दि. 25 रोजीचे रात्री ते घरामध्ये झोपले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी डोक्यामध्ये फावड्याने मारुन त्यांची हत्या केली. या घटनेबाबत राहाता पोलिस ठाण्यात शेतीवादाच्या कारणावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ही हत्या केल्याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करुन गुन्ह्याच्या तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.

सापळा लावून आरोपी पकडले

शेतीच्या वादाच्या कारणाव्यक्तिरिक्त हा गुन्हा इतर कोणत्या कारणामुळे घडला आहे काय, या बाजूने देखील पोलिसांनी तपास सुरु केला. यासाठी वेगवेगळी तपास पथके तयार केली. त्यानंतर गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून माहिती मिळाली की, हा गुन्हा बेंद्रया भोसले (रा. पढेगाव, ता. कोपरगाव) याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केला. ही माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरुन आरोपीच्या वास्तव्याबाबत गोपनीय माहिती घेतली व सापळा लावून आणि पाठलाग करुन बेंद्रया उर्फ देवेन्द्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले (वय 28, रा. पढेगांव, ता. कोपरगाव) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास विश्‍वसात घेवून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्‍वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार दिलीप भोसले, आवेल भोसले, मायकल चव्हाण व डोंगर्‍या चव्हाण अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. या माहितीवरून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अन्य आरोपींच्या ठावठिकाणाबाबत माहिती घेवून दिलीप भोसले (वय 19, रा. जवळके, ता. कोपरगाव), आवेल भोसले (वय 20, राहणार जवळके कोपरगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे अन्य साथीदार मायकल चव्हाण व डोंगर्‍या चव्हाण (दोघे राहणार लक्ष्मीनगर, कोपरगाव) यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. पकडलेल्या तिन्ही आरोपींना राहाता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भोसले याच्याविरुद्ध पारनेर, बेलवंडी, कोपरगाव या पोलिस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, फसवणूक घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या खून प्रकरणी तीन आरोपींना पकडण्याची कारवाई पोलिस निरीक्षक कटके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस उप निरीक्षक गणेश इंगळे, पोलिस हवालदार दत्तात्रय हिंगडे, विश्‍वास बेरड, पोलिस नाईक सुनील चव्हाण, सुरेश माळी, संदीप पवार, शंकर चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल संतोष लोढे, विशाल दळवी, सचिन आडबल, दिनेश मोरे, दीपक शिंदे, संदीप चव्हाण, सागर ससाणे, रोहित येमूल, रविन्द्र घुंगासे, रणजित जाधव, माने, प्रकाश वाघ, संदीप दरंदले, आकाश काळे, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, रोहिदास नवगिरे, मच्छिन्द्र बर्डे, चालक पोलिस हवालदार अर्जून बढे, संभाजी कोतकर, बबन बेरड यांनी केली आहे.

COMMENTS