राज्यातील सत्तांतरांचे बुडबुडे !

Homeअग्रलेख

राज्यातील सत्तांतरांचे बुडबुडे !

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून नि

कोरोना आणि विद्यार्थी गळती
थेट भरतीचा घाट कशासाठी ?
हिजाब आणि जानवं


महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून, पुन्हा एकदा भाजप-शिवसेना एकत्र येणार का, अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री असा केल्यानंतर ते म्हणाले की, माजी मंत्री म्हणून उल्लेख करू नका, एक-दोन दिवसांत कळेल. चंद्रकांत दादा यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना एकत्र येतात का ? अशी चर्चा सुरू झाली. राजकीय समीकरणे काही एका दिवसांत जन्माला येत नाहीत. त्यासाठी बरेच पाणी पुलाखालून वाहू द्यावे लागते. तेव्हा कुठे नवीन राजकीय समीकरणे आकाराला येतात. चंद्रकांतदादांच्या वक्तव्यानंतर दुसर्‍याच दिवशी औरंगाबादच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर असलेल्या नेत्यांकडे वळून माझे आजी माजी सहकारी तसेच एकत्र आले तर भावी सहकारी, असे संबोधून भाषणाला सुरुवात केली. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. कारण त्यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि भागवत कराड उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याची ही नांदी तर नाही ना?, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन पावणे दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत भाजप-शिवसेनेचे संबंध जितके ताणता येईल, तितकाच फायदा राष्ट्रवादी काँगे्रसला होईल. त्यामुळे या भाजप-शिवसेनेचे संबंध ताणत असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले संबंध ठेऊन आहेत. त्यामुळे एकीकडे विखारी टीका करायची आणि दुसरीकडे भविष्यात युती होण्याचा प्रश्‍न आलाच तर अवघड ही जाता कामा नये, अशी सुप्त इच्छा शिवसेनेची लपून राहिलेली नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब देखील सत्तेत महाविकास आघाडीसोबत असले तरी, ते अनेक वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असतात. त्या भेटीवरून राजकीय चर्चां होत राहतात. नंतर या चर्चांची धूळ खाली बसली की पुन्हा नव्या समीकरणांवर चर्चा सुरु होते. पवारांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना बारामतीला एका कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमात भाजप-राष्ट्रवादीमध्ये काय चर्चा होते, हे देखील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात सीबीआय, ईडीचे मोठया प्रमाणावर छापे पडत आहेत. तसेच हे छापे फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यावंर पडत आहे. यात काँगे्रस आणि भाजप मात्र कोेसो मैल दूर आहे. तसेच तीन पक्षांचे सरकार चालवतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील मोठया प्रमाणात दमछाक होत आहे. तिन्ही पक्षांतील नाराजीचा सूर तर नित्याचाच आहे. अशा वेळी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल अशी अपेक्षा कमीच आहे. कारण शिवसेनेकडे सर्वात महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्रीपद आहे. या पदाच्या माध्यमातून शिवसेनेला राज्यात आपली ताकद वाढवता येणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता कमीच आहे. तसेच भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली तरी मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता तशी धुसरच आहे. अशा वेळी फक्त राष्ट्रवादी काँगे्रसला गॅसवर ठेवण्यासाठी सत्ताबदलाचे इशारे द्यावे लागतात. म्हणजेच राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष आपल्या वरचढ होणार नाही. अन्यथा, पवार उद्या काय निर्णय घेतील सांगता येत नाही, याची शाश्‍वती शिवसेनेला देखील आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊनच शिवसेना निर्णय घेईल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेना नेते संजय राऊत मोदी यांचे तोंडभरून कौतुक करतात. तसेच वाजपेयीनंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला स्थैर्य दिले, असा कौतुक करून, भाजपसोबत जाण्यासाठी आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष इशारा देतात. त्यामुळे सत्ताबदलाचे हे हवेतील बुडबुडे असले तरी, या आगामी काही महिन्यात तरी राज्यात तूर्तास सत्ताबदल होणे अपेक्षित नाही.

COMMENTS