राजेंद्र गांधींनी दिले सुवेंद्र गांधींना आव्हान… नगर अर्बन बँकेची रणधुमाळी झाली सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजेंद्र गांधींनी दिले सुवेंद्र गांधींना आव्हान… नगर अर्बन बँकेची रणधुमाळी झाली सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी -नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांचे चिरंजीव व नगर मनपाचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांना

Akole : कळसुबाई शिखरावर देवी भक्तांचा जनसाग | LokNews24
आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृतसंघाकडून रामनवमी महोत्सवाचे आयोजन
कोपरगावात मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन

अहमदनगर/प्रतिनिधी -नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांचे चिरंजीव व नगर मनपाचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांना नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले आहे. सुवेंद्र गांधी यांचे नाव न घेता बालिश व्यक्ती अशी संभावना करीत त्यांच्यामुळे नगर अर्बन बँकेला 5 लाखाचा दंड झाला आहे तसेच बँकेला व माजी खा. दिलीप गांधींनाही रिझर्व्ह बँकेची माफी मागावी लागली आहे. पण तीही फेटाळून बँकेला आर्थिक दंड झाला आहे व त्याची सर्व कागदपत्रे आपल्याकडे असून श्रीरामपुरात सुवेंद्र गांधी यांनी समोरासमोर चर्चेस यावे, असे आव्हानही राजेंद्र गांधींनी दिले आहे. त्यामुळे आता सुवेंद्र गांधी हे आव्हान स्वीकारतात की नाही, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. यासंदर्भात माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सोशल मिडियातून भाष्य केले असून, त्यात त्यांनी सुवेंद्र गांधी यांचे कोठेही थेट नाव घेतलेले नाही. पण सूचक शब्दातून ते तेच असल्याचे मात्र स्पष्ट केले आहे. त्यामुळे बँकींग वर्तुळात ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. त्यामुळेच राजेंद्र गांधी यांनी दिलेले आव्हान सुवेंद्र गांधी स्वीकारतात की नाही, याचे कुतूहल वाढले आहे.

या पोस्टमध्ये राजेंद्र गांधी यांनी म्हटले आहे की, नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बँकींगची ए-बी-सी-डी माहीत नसलेली एक बालीश व्यक्ती सध्या गावोगाव फिरून एकच कॅसेट वाजवत फिरत आहे की, बँकेतील विरोधक खोटे आरोप करतात. पण, नगर अर्बन बँकेच्या शतकोत्तर गौरवशाली परंपरेला सर्वात प्रथम काळीमा कधी लागला हे त्यांना माहीत आहे का?, असा सवाल करून माजी संचालक गांधींनी म्हटले आहे की, नगर अर्बन बँकेत आपले वडील चेअरमन आहेत याचा गैरफायदा घेत एका बालीश व्यक्तीने स्वतःचे कोटक महिंद्रा बँकेतील कर्जाचा मासिक हप्ता 2 लाख 69 हजार व असे अनेक मासिक हप्ते नगर अर्बन बँकेच्या सस्पेंस खात्यामधून भरले. अगदी स्वतःचे टेलीफोन बील, लाईटबील बँकेच्या सस्पेंस खात्यामधून भरले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तपासणीमध्ये ही गंभीर बाब उघड झाली व रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली व या बालीश चेअरमन पुत्राच्या घोटाळ्याबद्दल नगर अर्बन बँकेला आर्थिक दंड का करू नये, याचा खुलासा मागविला, असा दावा त्यांनी केला.

(स्व.) रावबहाद्दूर चितळेंनी 1910 मध्ये स्थापन केलेल्या व (स्व.) भाऊसाहेब फिरोदिया, (स्व.) मोतीभाऊ फिरोदिया, (स्व.) डॉ. श्रीकृष्ण निसळ, (स्व.) नवनीतभाई बार्शीकर, (स्व.) झुंबरलालजी सारडा, (स्व.) सुवालालजी गुंदेचा यांनी गौरवशाली कारभार करून वाढविलेल्या या वैभवशाली बँकेला रिझर्व्ह बँकेकडून अशी गंभीर नोटीस 100 वर्षात प्रथमच आली. पुत्राच्या या गंभीर घोटाळ्याबद्दल बँकेचे चेअरमनसोबतच जिल्ह्याचे खासदार असलेल्या मोठ्या व्यक्तीला रिझर्व्ह बँकेची लेखी माफी मागावी लागली. परंतु भारतीय रिझर्व्ह बँक ही कायदे व नियमांवर चालत असल्यामुळे खासदारपदावर असलेल्या व्यक्तीचे खासदार पदाचे लेटरहेडवर लिहून पाठविलेली माफी मान्य झाली नाही व नगर अर्बन बँकेचे 100 वर्षाच्या इतिहासात प्रथमच बँकेला 5 लाखाचा दंड झाला व नगर अर्बन बँकेचे नाव रिझर्व्ह बँकेकडून दंड होण्याच्या काळ्या यादीत गेले. पुत्र प्रेमासाठी वडीलांना खासदार पदाचे लेटरहेड वापरून रिझर्व्ह बँकेची माफी मागावी लागली, हा खासदारपदाबरोबरच जिल्ह्याचा देखील अवमान होता, असा दावा करून माजी संचालक गांधी म्हणाले, आणि आता हेच पुत्र सांगत आहेत की विरोधक खोटे आरोप करत आहेत म्हणून. पण, रिझव्हर्र् बँकेने दंड केल्यानंतरही या घोटाळेबाज पुत्राचे कारनामे थांबले नाहीत. बँकेच्या कर्जदारांकडून 50 लाख, 25 लाख अशा मोठ्या मोठ्या रक्कमा याच पुत्राने घेतल्याचा घोटाळा रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत उघड झाला. व भारतीय रिझर्व्ह बँकेने दि. 23/05/2018 रोजी बँकींग रेग्युलेशन अ‍ॅक्टचे कलम 35 अन्वये चौकशी करीत कारणे दाखवा नोटीस बजावली. नगर अर्बन बँकेला पुन्हा लेखी माफी मागावी लागली, परंतु रिझर्व्ह बँकेने परत एकदा ही माफी धुडकावून लावत नगर अर्बन बँकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. बँकेवर प्रशासक नेमण्याची कारवाई करताना रिझर्व्ह बँकेने याच दि. 23/05/2018चे कारणे दाखवा नोटिसीचा उल्लेख केला आहे व प्रशासक का नेमला याच्या अनेक कारणांपैकी चेअरमनच्या मुलाने बँकेच्या कर्जदारांकडून लाखो रुपये घेतल्याचे कारण देखील नमूद केलेले आहे, असा दावाही गांधी यांनी केला.

हा तर बेशरमपणा
बँकेवर प्रशासक यांच्या घोटाळेबाजीमुळे आला आणि परत हेच उलट्या बोंबा मारतात की, बँकेवर प्रशासक विरोधकांनी आणला. किती हा बेशरमपणा व खोटारडेपणा. नगर अर्बन बँकेसारख्या गौरवशाली बँकेवर प्रशासक नेमण्याची नामुष्की आल्याची बाब बँकेवर मनापासून प्रेम करणार्‍या अनेक सभासदांना खूप वेदना देणारी ठरली व प्रशासक का नेमला गेला याबद्दलची माहिती माहितीचा अधिकार 2005 अन्वये मागविली असता ही गोष्ट उघड झाली, असे स्पष्ट करून, ही सर्व कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत, असा दावा माजी संचालक गांधी यांनी केला. श्रीरामपूर येथे पत्रकारांशी बोलताना या बालीश व्यक्तीने जी मुक्ताफळे उधळली, ती पाहता माझे त्या बालीश व्यक्तीला आव्हान आहे की, श्रीरामपुरातील कुठल्याही चौकात त्यांनी माझ्यासमोर यावे व कोण खोटे बोलत आहे आणि बँकेवर प्रशासक कोणामुळे आला याबद्दल दूध का दूध आणि पानी का पानी करतो, तसेच या बालीश व्यक्तीचे श्रीरामपुरातील जे कोणी कार्यकर्ते आहेत, त्यांनाही विनंती आहे की, त्यांनी श्रीरामपुरात कुठल्याही चौकात अशी जाहीर पत्रकार परिषद ठेवावी व त्यात मला आणि त्यांच्या नेत्याला आमंत्रित करावे. सस्पेंस खात्याच्या घोटाळ्याची व बँकेवर प्रशासक का आला याची माहितीच्या अधिकारात मिळालेली सर्व कागदपत्रे मी घेवून येतो, असे आव्हानही गांधी यांनी दिले आहे.

पहिल्या दिवशी 11 अर्ज
नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी मंगळवारपासून (26 ऑक्टोबर) खर्‍या अर्थाने सुरू झाली. पहिल्या दिवशी 24जणांनी 104 उमेदवारी अर्ज नेले. त्यापैकी 11जणांनी उमेदवारी दाखल केली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सांगितले. नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सत्ताधारी (स्व.) दिलीप गांधीप्रणित सहकार पॅनेलच्या सहा उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पहिल्याच दिवशी शहर मतदारसंघातून सर्वसाधारण गटातून बँकेचे माजी संचालक अनिल कोठारी व राजेंद्र अग्रवाल यांच्यासह ईश्‍वर बोरा, राहुल जामगावकर, संपत बोरा, तसेच माजी संचालक दीपक गांधी यांच्या पत्नी संगीता गांधी यांनी महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सहकार पॅनेलने सरोज गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतदारांच्या भेटी घेत प्रचार सुरू केला आहे. यावेळी नगरसेवक राहुल कांबळे, मनोज कोतकर, माजी संचालक दीपक गांधी, शैलेश मुनोत, आदेश कोठारी, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, अमित मुथा, वसंत बोरा, अजय चितळे, रोशन गांधी, मल्हारी दराडे आदी उपस्थित होते. रिंगणात उतरलेले अन्य उमेदवार असे-दीपक गांधी, आदेश कोठारी, सूर्यभान गर्जे व स्मिता पोखरणा.

COMMENTS