राजकारणातील पुस्तकः शरद पवार

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकारणातील पुस्तकः शरद पवार

आजच्या काळातील राजकारणात सुरू असलेला हैदोस पाहील्यानंतर शरद पवार यांच्यात असलेल्या गुणांची कदर करावी लागते.वाचाळ विर राजकारण्यांनी शरद पवार यांच्याकड

आमदार होण्याच्या आधी माझं पाथर्डीशी नातं – आमदार निलेश लंके
अनुराधाताई पौडवाल यांना शिंगणापूर व बेलापूर भेटीचे निमंत्रण
कॉपीप्रकार थांबले नाहीत, तर राज्याचे वाटोळे

आजच्या काळातील राजकारणात सुरू असलेला हैदोस पाहील्यानंतर शरद पवार यांच्यात असलेल्या गुणांची कदर करावी लागते.वाचाळ विर राजकारण्यांनी शरद पवार यांच्याकडे खरे तर शिकवणी लावूनच राजकारणात यावे,राजकीय क्षेत्रात टिकायचे,वाढायचे  तर शरद पवारांसारखे वागावे बोलावे लागते.भावनांना स्तब्ध करून निर्णय घ्यावे लागतात. गल्लीबोळातील राजकारण करणारे टग्यांसारखे वागणारे   पावसाळी छत्र्या असतात. काही काळाने त्यांचे नामोनिशाण राहत नाही. राजकारणात शरद पवारांसारखे राजमार्गाने जायला हवे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आदींनी शरद पवार नावाचे हे पुस्तक वाचायला हवे.


 काल परवा एक केंद्रीय मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली आवाज काढायला निघाला आणि राजकारणातील नितीमत्तेची उतरंड कशी ढासळते याविषयी गप्पाष्टके रंगू लागली,खरे तर महाराष्ट्राच्या वैचारीक श्रीमंतीत झालेले राजकीय संस्कार एव्हढे लेचेपेचे कधीच नव्हते.कंबरेखाली वार करतांनाही मर्यादा भंग होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याची शिकवण या महाराष्ट्राने मातीने कायम दिली आहे,या संस्कार क्षम मातीच्या गुणांचा महिमा गातांना हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण आणि प्र.के.अत्रे यांच्यात झालेल्या जुगलबंदी आणि अत्रेंनी व्यक्त केलेला पश्चाताप कधीच विसरता येणार नाही.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण  यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रल्हाद केशव अत्रे हे नेहमीच त्यांच्यावर तुटून पडायचे.आपल्या खास अत्रे शैलीत यशवंतरावांचे वाभाडे काढायचे,तितक्याच मिश्कीलपणे ते परतवून लावतांना यशवंतराव चव्हाण यांनी अत्रेंविषयी कधीच शत्रूत्वाचा भाव जपला नाही,उभयंतांमध्ये तात्विक मतभेद जेव्हढे टोकाचे तेव्हढीच मैत्रीही घट्ट.अशाच एका प्रसंगात अत्रे यांनी यशवंतरावांना निपुत्रीक असा शब्द वापरला.या वाराने यशवंतरावांना काय वेदना झाल्या असतील? मात्र या निपुत्रीकत्वाविषयीचे वास्तव जेंव्हा अत्रे यांना समजले तेंव्हा मात्र यशवंतरावांसोबत  सौभाग्यवती चव्हाण यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाल्याची कबूली अत्रे यांनीच दिली आहे.आजच्या राजकारणात एव्हढी साधनशुचिता कुठे दिसते.एकमेव शरद पवार यांचा अपवाद वगळला तर राजकारणात नितीमत्तेचा दुष्काळ पहायला मिळतो याचा अर्थ शरद पवार राजकारणातील हरिश्चंद्र आहेत असे मुळीच नाही,पवारांनी राजकीय विरोधकांचे राजकारण देशोधडीला लावले ,प्रतिस्पर्ध्यांचे राजकीय फड मुळापासून उखडून काढले.मात्र तोंडात साखर डोक्यावर  बर्फ ठेवूनच.एखाद्या विषयी मनात कितीही शत्रूत्वाची भावना असली तरी शब्दांतून मैत्री जागवून नेमक्या परिस्थितीत भूमिका स्वीकारणारे शरद पवार म्हणूनच राजकारणात विशिष्ट उंचीवर पोहचलेत.बेफाट वक्तव्य, बिभित्स वागणं आणि बेलगाम जगणं हे गुण शरद पवारांच्या अवती भोवती देखील फिरकत नाहीत, अशा या अवगुणांमुळे राजकारणातील अनेकांनी  कधी न कधी आपले तोंड फोडून घेतले आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळात राजकारण्यांच्या बाबतीत जे घडू नये ते घडू लागले आहे.कुणाच्या पापाची  सीडी उघड होते, कुणाची जीभ घसरते, कुणी लाच घेताना पकडला जातो, कुणी स्वत: गुंडासारखा दुसऱ्यांना मारतो, कुणी भर सभेत शिव्या घालून स्वत:ची संस्कृती दाखवतो. अशा राजकारण्यांचे कर्तृत्त्व तर नसतेच, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदरही राहत नाही. महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या या गटारीत एकच ‘सुसंस्कृत चेहरा’ राहिला आहे, तो म्हणजे शरद पवारांचा आहे. शरद पवार हे शंभर टक्के राजकारणी आहेत. त्यांच्या प्रत्येक शत्रुला त्यांनी संपविले किंवा लाचार केले.  जनतेला अपेक्षित सुसंस्कृत वागणे मात्र  त्यांनी  सोडले नाही. यामुळेच ते राजकारणात प्रदीर्घकाळ उच्च स्थानावर राहिले आणि त्यांचा हा गुण आताच्या कोणत्याच पक्षातील राजकारण्यात नसल्याने हे सर्व नेते वीस-पंचवीस वर्षांचे बुडबुडे ठरणार आहेत.शरद पवारांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी जाहीरपणे कधीही कुणाला टोकाचे दुखविले नाही, त्यांच्या मनात एखाद्याबद्दल शत्रुत्व असले तरी त्या व्यक्तीशी बोलताना ओठावर मैत्रीचेच शब्द आले. शरद पवारांनी कधीही काळ्या दगडावर पांढरी रेघ अशी न बदलणारी भूमिका घेतली नाही. ध्येय गाठण्यासाठी ज्या स्थितीत जशी भूमिका घेणे आवश्‍यक आहे तशी घेत राहिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी शत्रुवर उघड वार कधीही केला नाही. अपशब्द बोलणे, शत्रुच्या कुटुंबाबद्दल वक्तव्य करणे, शत्रुला काळे फासणे, दगडफेक करणे, अटक करणे असा प्रकार त्यांच्याकडून झाला नाही. याचा अर्थ ते शत्रुला माफ करतात असेही नाही. शत्रू ताकदवान नसतो तेव्हा अनुल्लेखाने त्याला संपवतात. शत्रू ताकदवान असतो तेव्हा त्याची आर्थिक रसद कापून ते शत्रुला गलितगात्र करतात. प्रतिस्पर्ध्यावर  टीका करताना शरद पवारांचा कधीही तोल जात नाही. त्यांनी कधीही टोक गाठले नाही. 
ते कायम एक पायरी खाली थांबतात. परिस्थितीनुसार जे त्यावेळी योग्य असते तेच करतात.  अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन नाचणाऱ्या राजकारण्यांचे काही काळाने  नामोनिशाणही उरत नाही. राजकारणात शरद पवारांसारखे  राजकारण करणारे कायम स्मरणात राहतात.आजच्या पिढीतील राजकारण्यांंनी खरेतर शरद पवार नावाचे हे पुस्तक वाचून अभ्यासायला हवे. अन्यथा नैतिक राजकारणाचा कपाळमोक्ष ठरलेला!

COMMENTS