रडवणे…कायमचे

Homeताज्या बातम्यासंपादकीय

रडवणे…कायमचे

कांद्याचा एक गुणधर्म आहे. तो कायम डोळ्यांत पाणी आणत असतो.

कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून फरार
मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मोटर सायकल रॅलीचे आयोजन
प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा मृत्यू

कांद्याचा एक गुणधर्म आहे. तो कायम डोळ्यांत पाणी आणत असतो. कधी शेतकर्‍यांच्या, तर कधी ग्राहकांच्या. कांदा कापताना त्याला जो कापतो, त्यालाही तो रडवितो. पिकवणार्‍यााल आणि खाणार्‍याला तो एकाच वेळी समाधान देत नाही. जेव्हा पिकवणार्‍याच्या डोळ्यांत आसू असतात, तेव्हा ग्राहकाच्या चेहर्‍यावर हसू असते आणि जेव्हा खाणारा हसत असतो, तेव्हा शेतकरी रडत असतो. बाजारात मागणी आणि पुरवठ्यावर भावाचे गणित ठरत असते. जेव्हा जास्त मागणी असते आणि पुरवठा कमी असतो, तेव्हा भाव वाढतात आणि जेव्हा पुरवठा जास्त असतो आणि मागणी कमी असते, तेव्हा भाव पडतात, हे बाजाराचे अर्थशास्त्र कांद्यालाही लागू होते. गेल्या वर्षभरात कांद्याला सरासरी चांगला भाव मिळाला. त्याचे कारण गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप आणि रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे आयात करूनही कांदा सारखा तेजीत राहिला. अगदी गेल्या महिन्यातील 21 तारखेलाही ग्राहकांना कांदा रडविणार, अशाच बातम्या येत होत्या. माध्यमांना शेतीतील बारकाव्यांची माहिती नसली, की अशा बातम्या येत असतात. त्यातही अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने बाजारपेठेत कांद्याची आवक कमी होईल, असा अंदाज होता; परंतु हा अंदाज चुकीचा ठरला असून आता बाजारांत उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. खरीपाने आणि रब्बीने दगा दिला, तरी उन्हाळी हंगामाने कांद्याला चांगलीच साथ दिली. गेल्या महिन्यांत किरकोळ बाजारात 45 ते पन्नास रुपयांहून अधिक भावाने विकला जाणारा कांदा आता किरकोळ बाजारात 25 रुपयांवर आला आहे. किरकोळ बाजारात 25 रुपये भाव असला, तरी कोल्हापूरच्या बाजारात कांद्याला ठोक भाव पाचशे रुपये क्विटंल असा भाव मिळाला, याचा अर्थ किलोला पाच रुपये भाव मिळाला. त्यातून वाहतूक खर्चही निघाला नाही. गेल्या सात वर्षांपूर्वी राष्ट्रीय बागवानी संशोधन मंडळाने कांद्याचा सरासरी उत्पादन खर्च नऊ रुपये काढला होता. आता उत्पादन खर्च वीस रुपयांवर गेला आहे. वीस रुपये किलो उत्पादन खर्च असलेला कांदा ठोक बाजारात पाच रुपये किलो भावाने विकला जात असेल, तर शेतकर्‍यांना तो रडविणार नाही, तर काय? कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. राष्ट्रीय कृषी बाजारानुसार महाराष्ट्रातील कांद्यांच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर पडले आहेत. वैजापूर येथील कांद्याचा किमान दर 750 रुपये क्विंटल होता. तेलंगणातील सदाशिवपेट मार्केटमध्ये कांद्याचा मॉडेल प्राईस 1139 रुपये होता. फरिदाबाद मार्केटमध्ये कांद्याचे दर 1500 रुपये तर राजस्थानच्या उदयपूरच्या मार्केटमध्ये 1300 रुपये इतका दर कांद्यांला मिळत आहे 

गेल्या वर्षी कांद्याच्या रोपांचे आणि बियाण्यांचे मोठे नुकसान झाले. कांद्याचे बी पूर्वी 2500 रुपये किलोने मिळायचे. आता ते पाच ते सहा हजार रुपये किलो या भावाने खरेदी करावे लागते. अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गारपीट झाली. त्यामुळे कांद्याला फटका बसला. यंदा भारतात कांद्याचे उत्पादन जास्त झाले असून त्याची निर्यात करण्यात येत आहे. असे असले, तरी कांद्याच्या निर्यातीलाही मर्यादा असतात. कितीही प्रयत्न केले, तरी तीस लाख टनांहून अधिक कांदा निर्यात करता येत नाही. खरीप आणि रब्बीचा कांदा फार काळ टिकत नाही. उन्हाळी कांदाच निर्यात होतो. 2018-19 मध्ये दोन कोटी 28 लाख कांदा उत्पादित झाला होता. 2020-21 मध्ये कांद्याचे उत्पादन दोन कोटी साठ लाख टन होण्याचा अंदाज आहे. 2018-19 मध्ये 14 लाख 31 हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. 2020-21 मध्ये यामध्ये वाढ होऊन 15 लाख 95 हजार हेक्टवर कांदा लागवड झाली. कांद्याचा देशांतर्गत खप एक कोटी साठ लाख टन आहे. तीस लाख टन कांदा निर्यात केला, तरी सत्तर लाख टन कांद्याचे काय करायचे, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यातही कोरोनामुळे हॉटेल आणि सभा, समारंभावर आलेल्या बंधनामुळेही कांद्याच्या खपात घट होईल. या सर्वांचा परिणाम अतिरिक्त कांद्यावर होईल. निर्यात अनुदान देऊन जास्त कांदा आताच निर्यात केला, तर काही प्रमाणात भाव स्थिर ठेवायला मदत होईल. कांद्याचा राखीव साठा करून फारसा फायदा होणार नाही. बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यासोबतच उन्हाळी कांद्याच्या वाढलेल्या आवकेमुळे कांद्याचे दर गेल्या दहा दिवसांत चांगलेच घसरले आहेत. अवघ्या दोन आठवड्यांत या दरात घसरण होऊन पंधरवड्यापूर्वी अडीच हजारांच्या आसपास असणारा कांदा आता 1200 रुपयांपर्यंत घसरला आहे. यातही थोड्या कमी प्रतवारीच्या कांद्याची घसरण आता हजार रुपयांच्याही खाली आली आहे. उत्पादन खर्च आणि विक्रीतून होणार्‍या नफ्याचा ताळमेळच बसत नसल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहे. या स्थितीत कांदा निर्यातीसारख्या योजनांमध्ये उत्पादकांना अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी उत्पादकांकडून पुढे येत आहे. वर्षभरात अवकाळी पावसासारख्या संकटांचा बसणारा तडाखा, सरकारची उरफाटी धोरणे आदी बाबींची झळ थेट उत्पादकांना पोहोचत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कांदा विक्री करण्याची वेळ आल्याने उत्पादक नाराज आहेत. कांद्यास प्रतिकिलो किमान तीस रुपये भाव देण्यात यावा, अशी बहुतांश कांदा उत्पादकांची भूमिका आहे.

COMMENTS