मोदींसमोरचे कौतुक ठरले फोल…ठाकरेंने आणले वास्तवात ;अहमदनगर जिल्ह्याची कोरोनाने केली ससेहोलपट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदींसमोरचे कौतुक ठरले फोल…ठाकरेंने आणले वास्तवात ;अहमदनगर जिल्ह्याची कोरोनाने केली ससेहोलपट

अहमदनगर/प्रतिनिधी : आदर्शगाव हिवरे बाजार गावातील कोरोना मुक्तीचा धडा जिल्हाभरात गिरवत असून, त्याचा चांगला फायदा जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यात

काजलगुरुंच्या जीवनपट चित्रपटाद्वारे उलगडणार l LokNews24
ओबिसी समाजाचे राजकिय आरक्षण सरकारने अबाधित ठेवावे
Haripur – संगमेश्वर देवस्थानची श्रावण सोमवार यात्रा यावर्षी रद्द | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : आदर्शगाव हिवरे बाजार गावातील कोरोना मुक्तीचा धडा जिल्हाभरात गिरवत असून, त्याचा चांगला फायदा जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यात झाला असल्याचे सांगत स्वतःची पाठ जिल्हा प्रशासनाने अडीच महिन्यांपूर्वी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर थोपटून घेतली होती. पण आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला वास्तवात आणले आहे व जाहीरपणे बोलताना नगर जिल्ह्यातील कोरोना स्थिती चिंताजनक असल्याचे भाष्य केल्याने जिल्हा प्रशासनाला आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.
राज्यातील 25 च्यावर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने तेथील लॉकडाऊन शिथील केले जात आहे. पण दुर्दैवाने नगरसह काही जिल्ह्यांतून कोरोना स्थिती आटोक्यात नसल्याने लॉकडाऊन कायम आहे व या जिल्ह्यांतील ज्या तालुक्यांतून कोरोना वाढत आहे, त्या तालुक्यांतील काही गावेही कन्टेन्मेंट झोन झाली आहेत. नगर शहरासह कोपरगाव, राहाता, अकोले अशी मोजकी शहरे सोडली तर बाकी जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वंकष आढाव्यात जिल्ह्याची एकूण कोरोना स्थिती सुखावह नाही. परिणामी, मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी केलेल्या लाईव्ह संवादात नगर जिल्ह्यातील स्थितीचा आवर्जून उल्लेख केला. एकप्रकारे त्यांनी जिल्ह्याच्या प्रशासनाला सूचक इशाराच दिल्याचे मानले जात आहे.

ते कौतुक ठरले फोल
मागील 20 मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी देशातील 11 राज्यांतील साठ जिल्हाधिकार्‍यांची ऑनलाईन आढावा बैठक घेतली होती. खरेतर देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती बिकट आहे, तेथील समस्या जाणून घेण्यासाठीची ही बैठक होती. त्यामध्ये अहमदनगरचाही समावेश होता. वाढत्या कोरोनाची दखल थेट पंतप्रधानांना घ्यायला लागली, ही एकप्रकारची जिल्ह्याची नामुष्कीच होती. पण प्रत्यक्ष बैठकीत वेगळेच घडले. जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून ग्रामविकास मोहिमेत आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या आदर्शगाव हिवरे बाजारने स्वयंस्फूर्तीने साध्य केलेल्या कोरोना मुक्तीची ढाल केली व या गावाने राबवलेल्या कोरोना मुक्ती पॅटर्नची माहिती देत हाच पॅटर्न जिल्हाभर राबवला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे हिवरे बाजारची कोरोना यशोगाथा व त्यावर सुरू असलेल्या जिल्ह्याच्या वाटचालीचे कौतुक झाले. त्यातही जिल्हा प्रशासनाने या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात राबवून झालेल्या फायद्याचे गोडवे दिल्लीदरबारी गायल्याने त्याचीही चर्चा रंगली व चक्क ही बैठक संपताच स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना फोन करून त्यांचे कौतुक केले होते. पण त्यावेळीही व नंतर आतापर्यंतच्या अडीच महिन्यांच्या काळातही जिल्ह्याचा कोरोना रेट समाधानकारकरित्या खाली आलेलाच नाही. जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर हे दोन तालुके तर हॉट स्पॉट झाले आहेत. संगमनेरला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदार संघात कोरोना रोखण्यात अपयश येत असून दुसरीकडे कोविड सेंटरमधील अनेकविध उपक्रमांतून सोेशल मिडियात चर्चेत असलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातच कोविड आटोक्यात येत नसल्याचे वास्तव आहे. याशिवाय कर्जत-जामखेड, पाथर्डी, नेवासा, शेवगाव परिसरातही कोरोना रुग्ण संख्या कमी-जास्त होताना दिसते आहे. त्यामुळेच जिल्ह्याचे एकूण चित्र समाधानकारक नसल्यानेच मुख्यमंत्री ठाकरेंनी जाहीर उल्लेख करून जिल्हा प्रशासनाला सूचक इशारा दिला आहे. परिणामी, जिल्ह्यावरील कोरोना निर्बंध अधिक कडक होण्याची टांगती तलवार दिसू लागली आहे.

सवलतींची शक्यता धुसर
अहमदनगरसह पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या जिल्ह्यांमध्ये आजही काळजी घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे लाईव्ह संवादात म्हणाले असल्याने अन्य जिल्ह्यांना नव्याने काही सवलती मिळाल्या तरी त्या या जिल्ह्यांमध्ये लागू होण्याची शक्यता धुसर आहे. नगर जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटीव्हिटी रेट साडेपाच ते सहा टक्के आहे. तर आतापर्यंतचा दीड वर्षांतील पॉझिटीव्हिटी रेट तेरा ते चौदा टक्के आहे. दैनंदिन रुग्ण संख्या 700 ते 800 च्यादरम्यान आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही आता साडेपाच ते सहा हजारांपर्यंत गेली आहे.

ऑनलाईन मार्गदर्शन दुर्लक्षित
पंतप्रधान मोदींसमोर हिवरे बाजार पॅटर्नचा गवगवा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हिवरे बाजारमध्ये करोनामुक्तीचा प्रयोग यशस्वी करणारे उपसरपंच व आदर्श गाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांचे ऑनलाइन मार्गदर्शन जिल्ह्यातील अन्य गावांसाठी वारंवार आयोजित केले. हिवरे बाजारचा पॅटर्न राबविण्यासाठी अन्य गावांनी आणि प्रशासनानेही पुढाकार घ्यावा, असा त्यामागचा हेतू होता. पण प्रत्यक्षात काही गावे सोडता अन्य गावांतून याला प्रतिसाद मिळाला नाही. हिवरे बाजार पॅटर्नमुळे राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा मिळेल, असा दावा त्यावेळी केला गेला, पण सध्याचे जिल्ह्याचे चित्र उलटे झाले आहे. गावपुढार्‍यांचे दुर्लक्ष, प्रमुख लोकप्रतिनिधींचे राजकीय कार्यक्रम, जिल्ह्यातील मंत्र्यांच्या गावा-गावांतील बैठका, त्यातील गर्दी व यामुळे ग्रामस्थांकडून मोडले जाऊ लागलेले नियम, दणक्यात होणारे विवाह-साखरपुडा-वाढदिवस कार्यक्रम, यात्रा-जत्रांचा उत्सवही जोरात सुरू असल्याने ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे.

COMMENTS