मुलांची लग्नगाठ संपवणार गडाख-घुलेंचे राजकीय वैर…; मंत्री गडाखांचा पुत्र आणि घुलेंच्या कन्येचे शुभमंगल चर्चेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलांची लग्नगाठ संपवणार गडाख-घुलेंचे राजकीय वैर…; मंत्री गडाखांचा पुत्र आणि घुलेंच्या कन्येचे शुभमंगल चर्चेत

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्याच्या पश्‍चिमेच्या पट्ट्यातील नेवासे व शेवगाव तालुक्यात वर्षांनुवर्षांपासून असलेले गडाख व घुले या दोन बड्या राजकीय घरा

 बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचे दोन करडं ठार
हिला आज खपवून टाक, हिचं खूप झालं आहे…घोडकेवाडीत विवाहितेच्या खुनाचा पती व नणंदेकडून प्रयत्न
रेखा जरे हत्याकांडाची लवकरच नियमित सुनावणी…

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्याच्या पश्‍चिमेच्या पट्ट्यातील नेवासे व शेवगाव तालुक्यात वर्षांनुवर्षांपासून असलेले गडाख व घुले या दोन बड्या राजकीय घराण्यांचे वैर आता तिसर्‍या पिढीत कायमस्वरुपी संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन व राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांची सोयरिक ठरली आहे. या विवाहामुळे गडाख-घुले परिवारात पसरलेला आनंदोत्सव भविष्यात या दोन्ही तालुक्यांतीलच नव्हे तर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर परिणाम करणारा ठरणार आहे. नेवासे-शेवगाव परिसरात गडाख व घुले या परिवारातील राजकीय संघर्ष जवळपास बहुतांश सामायिक ऊस कार्यक्षेत्र असलेल्या अनुक्रमे मुळा साखर कारखाना व ज्ञानेश्‍वर साखर कारखाना यांच्या निवडणुकींतून नेहमी दिसला आहे. अर्थात हा संघर्ष तेवढ्यापुरताच राहिला नाही तर ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा व नगर पंचायतींसह पुढे विधानसभा व लोकसभा निवडणुकांतून झिरपत राहिला व कमी-अधिक प्रमाणात एकमेकांना शह देत राहिला. आधीच्या पिढीतील यशवंतराव गडाख व मारुतराव घुले यांच्यातील संघर्ष पुढे नरेंद्र घुले-चंद्रशेखर घुले आणि शंकरराव गडाख-प्रशांत गडाख यांच्या काळातही सुरू होता. विविध छोट्या-मोेठ्या निवडणुकांतून एकमेकांना शह-काटशह सुरू होता. पण सात वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत या संघर्षाचा फायदा घेत भाजपचे बाळासाहेब मुरकुटे ही तिसरी शक्ती नेवासे-शेवगाव परिसरात उभी राहिली. मात्र, त्यानंतरही हा संघर्ष कायम होता व शंकरराव गडाखांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षाद्वारे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतून एकाचवेळी घुले व मुरकुटेंना शह दिला. पण एकूणच दोन्ही तालुक्यांतील सहकारातील सत्तास्थानांना मुरकुटेंकडून तत्कालीन भाजप सत्तेच्या माध्यमातून होत असलेला विरोध पाहून त्यातून गडाख व घुले परिवाराने बोध घेतला. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत नेवाशात शंकरराव गडाख क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडून उमेदवारी करीत असताना घुले परिवाराने त्यांच्याशी दिलजमाई करीत त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार दिला नाही व जवळपास अपक्ष उभे असलेल्या गडाखांना पाठबळ देऊन निवडून आणले. तेव्हापासून या दोन्ही परिवारात दरवळू लागलेले सलोख्याचे सूर आता सनईच्या सूरात रुपांतरीत होताना मुलांच्या लग्नगाठीच्या रुपाने कायमस्वरुपी प्रेमबंधनात अडकणार आहेत व नेवासे-शेवगाव परिसरातील मागील 25-30 वर्षांपासूनचे राजकीय वैर आता कायमस्वरुपी इतिहासजमा होणार आहे. नेवाशाचे आमदार व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव तथा युवा नेते उदयन गडाख व शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता घुले यांची सोयरिक ठरली आहे. डॉ. निवेदिता या पुण्यातील भारती विद्यापीठात रेडिओ डायग्नोसिसमध्ये एमडीच्या दुसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. तर उदयन गडाख यांनी अहमदनगर येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून ते राजकारणात सक्रिय झाले आहेत.

सोयर्‍याधायर्‍यांचे राजकारण
जिल्ह्यातील सोयर्‍याधायर्‍यांचे राजकारण नेहमी चर्चेत असते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, यशवंतराव गडाख, अप्पासाहेब राजळे, अशोक काळे, अरुण कडू अशा पारिवारिक नातेसंबंधांमध्ये आता गडाख व घुले यांच्यातील नव्या सोयरिकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जवळचे नातेवाईक होणार आहेत. चंद्रशेखर घुले आणि माजी आमदार नरेंद्र घुले हे सख्खे भाऊ आहेत. नरेंद्र घुले आणि राहुरीचे माजी खासदार प्रसाद तनपुरे हे एकमेकांचे साडू आहेत. नरेंद्र घुले आणि प्रसाद तनपुरे या दोघांच्याही पत्नी या मंत्री जयंत पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे थोरात, पाटील आणि गडाख यांचेही नातेसंबंध प्रस्थापित होणार आहेत. कोपरगावचे आमदार व शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे हे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे मोठे जावई आहेत. तर घुले यांचे दुसरे जावई हे आता उदयन गडाख होतील. चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादीत आहेत. तर गडाख हे शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचे नातेसंबंध हे आगामी विधान परिषदच नव्हे तर जिल्ह्यातील गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या निवडणुकीवर परिणाम करणार आहेत. जिल्ह्यातील राजकारण हे पूर्वी सहकार व पीक-पाण्यावर आधारित होते. नंतर ते सोयर्‍याधायर्‍यांच्या राजकारणात बदलले. नगर शहर व तालुक्यातील कर्डिले-जगताप-कोतकर या सोयर्‍याधायर्‍यांच्या राजकारणाचा प्रयोग शहर व तालुक्यात यशस्वी झाला आहे. हाच प्रयोग आता अन्य राजकीय सोयरिकींतून राहिलेल्या तालुक्यांतूनही होऊ घातला आहे. जिल्ह्यातील बहुतांश किल्लेदार राजकीय नेत्यांचे राजकीय विरोधक मानला जाणारा विखे परिवारही या सोयर्‍याधायर्‍यांच्या राजकारणापासून अलिप्त नाही. मंत्री शंकरराव गडाख यांचे सख्खे भाचे अ‍ॅड. राज देवढे हे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे सख्खे साडू आहेत. त्यामुळे विखेही याच नातेसंबंध राजकारणात आहेत.

घुलेंना होणार फायदा
घुले-गडाख नव्या सोयरिकीचा परिणाम स्थानिक राजकारणावरही होणार आहे. घुले हे नगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद मतदारसंघासाठी राष्ट्रवादीतून इच्छुक आहेत. या निवडणुकीत त्यांच्या पाठीमागे आता गडाख, तनपुरे, काळे, राजळे, थोरात अशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय ताकद उभी राहणार आहे. या सोयरिकीचा राजकीय फायदा गडाख यांनाही भविष्यात होणार आहे. गडाख यांच्या नेवासा विधानसभा मतदारसंघात घुले यांचे काही प्रभावक्षेत्र आहे. त्यामुळे गडाखांना भविष्यात निवडणूक सोपी जाणार आहे. दुसरीकडे घुले यांचे राजकीय क्षेत्र पाथर्डी-शेवगाव या मतदारसंघातही आहे. घुले यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यास पाथर्डी-शेवगाव या मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यासाठी तो दिलासा ठरेल. कारण, पाथर्डी-शेवगावच्या आगामी विधानसभा निवडणुकीत तेथील घुलेंसारखा तगडा राजकीय प्रतिस्पर्धी कमी होणार आहे. त्यामुळे घुले-गडाखांचे नवे कौटुंबिक नाते जिल्ह्यातील बड्या राजकीय घराण्यांना दिलासादायक ठरणार आहे.

COMMENTS