मुंबईत 27 तारखेपर्यंत पूर्वीचेच निर्बंध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत 27 तारखेपर्यंत पूर्वीचेच निर्बंध

’ब्रेक द चेन’ अंतर्गत मुंबई महापालिका प्रशासनाकडून नव्याने आदेश जारी करण्यात आले असून मुंबई महापालिका क्षेत्रात 27 जूनपर्यंत लेव्हल 3 नुसार निर्बंध कायम राहणार आहेत.

मुलींवर अत्याचाराच्या घटना घडू नये म्हणून पालकांने पण सतर्क राहिला पाहिजे – चित्रा वाघ 
पूजा खेडकरच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी  
खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण होण्यास सुरुवात : सुधांशू पांडे

मुंबई/प्रतिनिधी: ’ब्रेक द चेन’ अंतर्गत मुंबई महापालिका प्रशासनाकडून नव्याने आदेश जारी करण्यात आले असून मुंबई महापालिका क्षेत्रात 27 जूनपर्यंत लेव्हल 3 नुसार निर्बंध कायम राहणार आहेत. ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता आणि कोविड पॉझिटिव्हिटी रेटनुसार मुंबई सध्या लेव्हल एकमध्ये असली तरी लोकसंख्या, लोकलमध्ये होणारी गर्दी आणि तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन निर्बंधांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या कोविड पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर या आधारावर लेव्हल निश्‍चित करण्यात येत आहेत. दर आठवड्याला याबाबतच्या स्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार जिल्हा किंवा महापालिका क्षेत्रासाठी लेव्हल निश्‍चित करून निर्बंध कडक किंवा शिथील करण्यात येत आहेत. मुंबईत सध्या कोविड पॉझिटिव्हिटी रेट 3.79 टक्के इतका आहे तर ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर 23.56 टक्के इतका आहे. हे प्रमाण पाहता मुंबई सध्या लेव्हल 3 मधून लेवल 1 मध्ये दाखल झाली आहे. मात्र मुंबईची एकंदर स्थिती व संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेने निर्बंधांबाबत ’आस्ते कदम’ पुढे जाण्याचे धोरण कायम ठेवले आहे. मुंबई शहराची भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, मुंबई महानगर प्रदेशातून लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास करून मोठ्या संख्येने मुंबई शहरात येणारे प्रवासी आणि ’टास्क फोर्स’ व कोविड 19 बाबत तज्ज्ञांनी वर्तवलेली तिसर्‍या लाटेची शक्यता या बाबी लक्षात घेत मुंबईत लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात येत आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुंबईत लेव्हल 3 चे निर्बंध कायम राहणार असल्याने लोकल सेवा तूर्त सामान्यांसाठी बंदच राहणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच लोकल प्रवासाची मुभा असून इतर प्रवाशांना लोकलची दारे बंद करण्यात आलेली आहेत. मुंबईतील कोविड स्थिती सुधारल्याने लोकल सर्वांसाठी खुली होण्याची आशा होती; मात्र आता 27 जूनपर्यंत तरी लोकलवरील निर्बंध कायम राहणार आहेत, हे महापालिकेच्या ताज्या आदेशाने स्पष्ट झाले आहे.

COMMENTS