मी वेगळी काय भूमिका घेतली, ते सांगावे…;’ छत्रपती संभाजीराजेंचे चंद्रकांत पाटलांना आव्हान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी वेगळी काय भूमिका घेतली, ते सांगावे…;’ छत्रपती संभाजीराजेंचे चंद्रकांत पाटलांना आव्हान

मी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केलेले नाही. फक्त मूक आंदोलन करणार तसेच समाज व लोक बोलले असल्याने आता लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षण विषयावर बोलावे, एवढेच बोललो आहे.

आ. थोरातांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची घेतली भेट
राज्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे ! :आमदार थोरात यांचे श्री गणेशाला साकडे
स्थानिकांच्या सहभागातून रयतचा विकास वाढवा ः चंद्रकांत दळवी

अहमदनगर/प्रतिनिधी-मी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केलेले नाही. फक्त मूक आंदोलन करणार तसेच समाज व लोक बोलले असल्याने आता लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षण विषयावर बोलावे, एवढेच बोललो आहे. यापेक्षा काय वेगळी भूमिका मी घेतली, हे सांगावे, असे आव्हान छत्रपती संभाजीमहाराज यांनी शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले. येत्या 16 रोजी कोल्हापुरात मूक आंदोलन करणार आहे, मोर्चा काढणार नाही, असेही त्यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले. 

    छत्रपती संभाजी महाराज शनिवारी कर्जत तालुक्यातील कोपर्डीला आले होते व तेथून औरंगाबाद रस्त्यावरील कायगाव टोका येथे जात असताना काहीकाळ नगर महापालिकेजवळ थांबले होते. येथे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार व अन्य पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. चंद्रकांत पाटील यांनी महाराजांनी एक भूमिका घेण्याचे वक्तव्य केले आहे. त्याबाबत विचारले असता संभाजी महाराजांनी कोणाचेही नाव घेतले नाही. पण ते म्हणाले, मी कोणतीही वेगळी भूमिका घेतलेली नाही. रायगडावरून बोलतानाही मी मोर्चा जाहीर केला नव्हता. तर भूमिका जाहीर करणार असे बोललो होतो. त्यानंतर तशी भूमिका कोल्हापूरला जाहीर केली. मोर्चा नव्हे तर मूक आंदोलन करणार असेच तेथे बोललो होतो व त्यानंतर लोकप्रतिनिधींनी या विषयावर बोलावे, असे आवाहन केले होते. यापेक्षा कोणतीही वेगळी भूमिका मी घेतलेली नाही, आक्षेप घेणारांनी सांगावे, मी वेगळी कोणती भूमिका घेतली?, असे आव्हान त्यांनी दिले.

    मराठा आरक्षणासाठी आता दोनच मार्ग शिल्लक आहेत. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटीशन राज्य सरकारनेच दाखल केले पाहिजे व दुसरे म्हणजे मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करून त्याचा अहवाल राज्यपालांद्वारे राष्ट्रपतींकडे पाठवणे व राष्ट्रपतींनी केंद्रीय मागास आयोगाकडे पाठवून त्यांच्याकडून राज्य मागास आयोगाकडे पुन्हा आल्यानंतर त्यांच्या शिफारशीनुसार संसदेत हा विषय मांडणे, असा एक मार्ग आहे. या सर्व प्रक्रियेसाठी एक ते सव्वा वर्षाचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे या काळात राज्य सरकारने मी केलेल्या पाच मागण्या मंजूर करण्यासाठी त्यांच्यावर समाजाचा दबाव आणणे गरजेचे आहे, असे सांगून संभाजीराजे म्हणाले, यासाठी येत्या 16 रोजी मूक आंदोलन करणार आहे तसेच आतापर्यंत समाज बोलला आहे, आम्ही बोललो आहोत, नगरसेवक व लोक बोलले आहेत. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार-खासदारांनी यावर बोलले पाहिजे. मी मांडलेल्या 5 मागण्या मंजूर करण्यासाठी 36 जिल्ह्यांचा दौरा मी करणार आहे. पण तो होऊ नये व त्याआधीच निर्णय व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. पण तसे झाले नाही तर मुंबईत विधानभवनावर लाँग मार्च काढण्याचा निर्णय मी घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मेटेंच्या विषयाला धुडकावले

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, संभाजी महाराजांनी त्या विषयाकडे दुर्लक्ष केले. तो विषय सोडा हो, दुसरे अनेक विषय आहेत, असे म्हणून मेटेंविषयी बोलण्यास त्यांनी अप्रत्यक्षपणे नकार दिला.

COMMENTS