राज्यात निर्माण झालेला रेमडेसिवीरचा तुटवडा व रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी आज दमणला धाव घेतली.
मुंबई/प्रतिनिधीः राज्यात निर्माण झालेला रेमडेसिवीरचा तुटवडा व रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी आज दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपकडून 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. कोरोना रुग्णांची हेळसांड सुरू असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचेही दिसून येत आहे, तर राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. या कंपनीशी चर्चा करण्यासाठी दरेकर व भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दमणला धाव घेतली.
ग्रुप फार्मसीचे मालक अंशू यांनी महाराष्ट्राला लागेल तितका रेमडेसिवीरचा साठा देण्याचे आश्वासन दिले असून देशभरात वाटप करण्याची परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारला अर्जही केला आहे. केंद्राकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात येईल, अशी माहिती दरेकर यांनी दिली आहे. कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता भयभीत झाली आहे. राज्य सरकारने आरोप, प्रत्यारोपाचा खेळ करण्यापेक्षा आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात वेळ घालवला असता तर आज ही वेळ आली नसती, असा आरोप करून महाराष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्य भावनेतून भाजप कोरोना रुग्णांची मदत करीत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. तसेच, ग्रुप फार्मा प्रा. लि. या कंपनीने दिलेल्या रेमडेसिवीरमुळेदेखील रुग्णांची मोठ्या प्रमाणावरील असलेली मागणी पूर्ण करता येईल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS