केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करावी, असे विनंतीवजा पत्र शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
मुंबई : केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करावी, असे विनंतीवजा पत्र शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. युतीच्या नेत्यांमधील संबंध, जिव्हाळा तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे! पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत.
आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही सरनाईक म्हणाले आहेत. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबीयांवर सुद्धा सतत आघात होत आहे, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथाही सरनाईक यांनी मांडली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेना पक्ष फोडला जातोय!
सरनाईक यांनी पुढे म्हटले आहे की, याबरोबरच महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसेना पक्ष फोडला जात आहे. त्यामुळे भाजपशी युती करावी जेणे करून केंद्रीय सुरक्षा यंत्रणाचा ससेमिरा टाळता येईल.
COMMENTS