मरूभूमीत काँग्रेस आणि भाजपचा लढा पक्षश्रेष्ठींशी

Homeसंपादकीय

मरूभूमीत काँग्रेस आणि भाजपचा लढा पक्षश्रेष्ठींशी

राजस्थानमध्ये सत्तांतर झाल्यानंतरच्या अडीच वर्षातील पहिलं वर्षे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांच्या दृष्टीनं बरं गेलं; परंतु गेल्या काही महिन्यांत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत अंतर्कलह प्रचंड प्रमाणात वाढला आहेत.

भाजपला बोध
लसीच्या डोसवरून केंद्र पुन्हा तोंडघशी
सीमाप्रश्‍नाचा लढा !

राजस्थानमध्ये सत्तांतर झाल्यानंतरच्या अडीच वर्षातील पहिलं वर्षे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांच्या दृष्टीनं बरं गेलं; परंतु गेल्या काही महिन्यांत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत अंतर्कलह प्रचंड प्रमाणात वाढला आहेत. दोन्ही पक्षांतील दोन गट परस्परांविरोधात लढत असताना त्यांची लढाई पक्षश्रेष्ठींच्याही विरोधात लढत आहेत.

गेल्या 136 वर्षांपूर्वीची काँग्रेस आणि गेल्या चार दशकांतील भाजप या दोन्ही पक्षांची अवस्था आता सारखीच झाली आहे. दोन्हीकडंही गटबाजी आणि परस्परांचे पाय ओढणं हेच सुरू आहे. काँग्रेस श्रेष्ठींना राज्यस्तरीय नेत्यांत झुंज लावून गंमत पाहण्यात रस असतो. तरुण असलेला भाजप आता प्रौढत्वाकडं वाटचाल करीत असताना त्याही पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांना आता आपल्याच नेत्यांतील झुंज पाहणं गमतीचं वाटायला लागलं आहे. पूर्वी गटबाजी असली, तरी किमान तुटेपर्यंत ताणायचं नाही, असं दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडून पाहिलं जायचं. झुंजणार्‍या दोन्ही गटांना समोरासमोर बसवून, चार पावलं मागं, दोन पावलं पुढं असं करीत तडजोड घडवून समेट घडवून आणला जायचा. आता तुटेपर्यंत ताणलं, तरी वरिष्ठ लक्ष घालीत नाहीत. पक्षश्रेष्ठी नाराजांना भेटत नाहीत. त्यामुळं काँग्रेस सोडून अन्य पक्षांत गेलेले कितीतरी नेते मुख्यमंत्री झाले. काँग्रेसची सत्ता गेली. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या राज्यात सत्ता असली, तरी तिथंही गटबाजी आहे. भाजप स्वतःला इतरांपेक्षा वेगळा पक्ष समजायचा; परंतु पक्ष वाढवण्याच्या नादात इतरांना सामावून घेताना भाजप कधी वेगळेपण गमावून बसला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही. एका राजकीय पक्षातील गटबाजी दुसर्‍या राजकीय पक्षाच्या पथ्थ्यावर पडत असते. या गटबाजीचा फायदा त्याचा स्पर्धक घ्यायचा; परंतु दोन्ही प्रमुख विरोधक असलेल्या राजकीय पक्षांना गटबाजी आणि बंडखोरीनं ग्रासलं आहे. विरोधकांशी लढण्याऐवजी त्यांचा सारा वेळ स्वकीयांविरोधात लढण्यात आणि त्यांचंच खच्चीकरण करण्यात जात आहे. याचं उत्तम उदाहरण राजस्थानचं आहे. सत्तेसाठी दोन किंवा अनेक पक्ष परस्परांत लढत असतात; परंतु सत्ता गेल्यानंतर पुन्हा सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी परस्परांचे पाय ओढण्याच्या काँग्रेसच्या वृत्तीनं देशात सध्या काँग्रेसची अशी अवस्था झाली आहे. भाजपतही आता अशी वृत्ती शिरली आहे. तिचा प्रत्यय राजस्थानमध्ये येतो आहे. एकाच राज्यांत एकाचवेळी दोन राजकीय पक्षांत संघर्ष होण्याऐवजी आणि दोन्ही पक्षांनी परस्परांशी लढण्याऐवजी स्वकीयांशीच लढत आहेत, हे आगळंवेगळं चित्र गेल्या दीड वर्षापासून राजस्थानात दिसत आहे. इतर राज्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झालं; परंतु भुसभुशीत जमीन असूनही भाजपला राजस्थानात काही करता आलं नाही. त्याचं कारण भाजपतच उद्भवलेला अंतर्कलह हेच आहे. राजस्थानच्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात जनमाणसांत स्थान असलेल्या नेत्यांचंच आता पक्षश्रेष्ठींबरोबर भांडण आहे. दोन्ही ठिकाणचे पक्षश्रेष्ठी मात्र हुजर्‍यांना आणि दरबारी राजकारण करणार्‍यांना महत्त्व देत आहेत. त्यामुळं तिथल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आता पक्षश्रेष्ठींशीा झगडावं लागतं आहे. काँग्रेसमधील पेच गेल्या वर्षभरातही निवळलेला नाही. देशपातळीवर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात पत्र लिहिणार्‍यांनी जी 23 गट स्थापन झाला होता. आता राजस्थानातही त्याच आधारावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जी 19 गट स्थापन केला आहे. बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले आमदार तसंच अपक्षांना हाताशी धरून त्यांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. काँग्रेसला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देऊन पायलट गटाला सरकार तसंच संघटनेत काही मिळू नये, यासाठी गेहलोत गट कामाला लागला आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट सहा दिवस थांबूनही त्यांना पक्षश्रेष्ठींनी भेट दिली नाही, यामागंही कदाचित हेच दबावाचं राजकारण कारणीभूत असावं, असं मानायला जागा आहे. गेल्या वर्षी पेच मिटविताना पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात आणि पक्षसंघटनेत स्थान द्यायचं कबूल करूनही ते दिलं गेलं नाही. पक्षश्रेष्ठींनी सांगूनही गेहलोत ऐकायला तयार नाहीत. उलट, पायलट यांना उपरं ठरविण्याचा प्रयत्न गेहलोत गट करीत आहे. पक्षश्रेष्ठी समेट घडविण्याचा प्रयत्न करीत असताना गेहलोत गटल मात्र पायलट गटानं पक्ष सोडावा, असं वातावरण तयार करीत आहे. दुसरीकडं भाजपतही काही आलबेल आहे, अशी स्थिती नाही. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्यातून विस्तव जात नाही. आता तर शिंदे यांचा फोटो भाजपच्या होर्डिंगवरून गायब झाला आहे. भाजपतील अंतर्गत लढाईही आता सार्वजनिक झाली आहे. वसुंधरा राजे स्वत: शांत आहेत; पण त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. पक्षापुढं ही डोकेदुखी वाढली आहे. वसुंधरा राजे यांचं छायाचित्र होर्डिंग्जवरून काढण्याचं पुनिया यांनी समर्थन केलं. नेते येत जात असतात. भूतकाळ बदलत असतो. छायाचित्र कुणाचं ठेवायचं, कुणाचं काढायचं, याचा निर्णय एक समिती घेत असते, असं सांगून वसुंधरा राजे यांच्याविषयीची मळमळ त्यांच्या तोंडातून बाहेर पडली. त्यामुळं वसुंधरा राजे समर्थक उघडपणे मैदानात उतरले. त्यांच्या समर्थकांनी जिल्हा पातळीवर आपली टीम स्थापन केली. त्याचं नेतृत्व माजी मंत्री व आमदार करीत आहेत. जिल्हास्तरावर युवक-युवतींना जोडण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. वसुंधरा राजे म्हणजे भाजप आणि गेहलोत म्हणजे काँग्रेस असं चित्र राजस्थानमध्ये तयार झालं आहे. पक्षापेक्षा व्यक्ती मोठी झाली, की असं होतं. कोरोना कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘वसुंधरा रसोई’ च्या माध्यमातून गरजू लोकांना अन्न व औषधांचं वितरण करण्यात आलं. तिथं कुठंही भाजपचा उल्लेख केला नाही. भाजपचं निवडणूक चिन्हही दिसलं नाही. तिथं वसुंधरा राजे एके वसुंधरा राजे असाच सारा माहोल होता. ’वसुंधरा रसोई’ च्या माध्यमातून समर्थकांनी माजी मुख्यमंत्र्यांचा चेहरा आणि नाव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. यासह वसुंधरा समर्थक मंच आणि वसुंधरा फॅन्स क्लब नावाचे गट तयार करून लोक जिल्हास्तरापर्यंत जोडले जात आहेत. वसुंधरा राजे आणि त्यांच्या समर्थकांना बाजूला सारण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं केला जात आहे, त्यामुळं अस्तित्व गमावण्याच्या चिंतेमुळं वसुंधरा राजे समर्थकांनी त्यांची सक्रियता वाढविली आहे. पुनिया यांना वसुंधरा राजे समर्थकांच्या कारवाया पक्षविरोधी वाटतात. राजस्थानमधील निवडणुकीला अजून अडीच वर्षे असली, तरी निवडणूक कुणाच्या नावावर लढवायची, यावरून भाजपमध्ये रणकंदन माजलं आहे. पक्षापेक्षा व्यक्तीमाहात्म्य तिथं वाढलं आहे. पक्षाकडं मुख्यमंत्रिपदासाठी 15 नेते असल्याचं विरोधी गट म्हणतो. वसुंधरा राजे यांनाच भावी मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून घोषित करावं, यासाठी वसुंधरा समर्थक ज्या प्रकारे लॉबिंग करीत आहेत. त्यामुळं पुनिया त्रस्त आहेत. भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाचा निर्णय संसदीय मंडळ घेतं, असं विरोधी गट सांगतो. विरोधी पक्ष नेते गुलाबचंद कटारिया हे ही शिंदे विरोधक समजले जातात. त्यांनीही वसुंधरा राजे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यात सख्य आहे. ते परस्परांना सांभाळून घेतात, असं भाजप आणि काँग्रेसमधील नेत्यांना माहीत आहे. कटारिया यांनी थेट त्यावर भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वसुंधरा समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा चेहरा लवकरच जाहीर व्हावा, असा संदेश इंटरनेट माध्यमांसह विविध माध्यमातून पक्षश्रेष्ठींना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षश्रेष्ठींवर दबाव आणायचा हा प्रयत्न आहे. राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंग यांच्या भेटीनंतर आता भाजपमध्यं वसुंधरा राजे गटातील नेत्यांविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. वसुंधरा राजे गटाचे माजी मंत्री रोहिताश शर्मा यांना नोटीस बजावण्यात आली असून 15 दिवसांत उत्तर मागितलं आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस भजनलाल शर्मा यांनी ही नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारविरोधात वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे.

COMMENTS