महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णांच्या नातेवाइकांना बेड, रुग्णवाहिका, औषधे आणि ऑक्सिजन मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
मुंबई /प्रतिनिधी: महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णांच्या नातेवाइकांना बेड, रुग्णवाहिका, औषधे आणि ऑक्सिजन मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. यासाठी नेमकी कोणाला आणि कुठे विचारपूस करावी हेदेखील लवकर समजत नाही. नागरिकांना उद्भवणार्या या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे.
मनसेने मुलुंड येधील नागरिकांसाठी 24 तास सेवा देणारी मनसे कोविड वॉर रूम उभारली आहे. मुलुंडच्या केशव पाडामध्ये ही वॉररूम उभारण्यात आली आहे. या वॉररूमचे मोबाईल नंबर समाजमाध्यमे आणि फ्लेक्स बोर्डद्वारे नागरिकांमध्ये पोहचविण्यात आले आहेत. या वॉररूममधून रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजनची व्यवस्था करून देणे, औषधे कुठे मिळतील याची माहिती देणे, गृह विलगीकरणामध्ये असलेल्या कुटुंबाना मोफत जेवणाची व्यवस्था करुन देणे, अशा विविध सोयी करून देण्यात येत आहेत. सध्या महापालिका, शासन चांगले काम करत आहे; मात्र रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे, की सगळ्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मदत करणे गरजेचे आहे, म्हणून आम्ही आता मुलुंडमधून ही वॉररूम सुरू केली असून मुंबईत बर्याच ठिकाणी असे कक्ष उभारणार असल्याचे मनसेचे नेते शिरीष सावंत म्हणाले.
COMMENTS