सहमती एक्सप्रेससमोर प्रश्नांचे आव्हान,शहराचे राजकारण होणार नीरस?श्रीराम जोशी/अहमदनगर : राज्यातील कोणत्याही महापालिकेत वा कोणत्याही स्थानिक स्वराज्य
सहमती एक्सप्रेससमोर प्रश्नांचे आव्हान,शहराचे राजकारण होणार नीरस?
श्रीराम जोशी/अहमदनगर : राज्यातील कोणत्याही महापालिकेत वा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल, अशी आगळीवेगळी राजकीय स्थिती नगरच्या महापालिकेत सध्या झाली आहे. मनपातील सर्वपक्षीय सर्व 67 नगरसेवक एकाच म्हणजे सत्तेच्या बाजूला आले आहेत. ही अभिमानाची बाब असली तरी दुसरीकडे मनपात कोणी विरोधकच शिल्लक राहिला नसल्याची विचित्र स्थितीही दिसू लागली आहे. आतापर्यंत मनपाच्या महासभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादंग झडायचे, खडाजंगी व्हायची तसेच मनपाच्या चुकीच्या कामांच्या चौकशीची पत्रे विरोधकांकडून दिली जायची. पण आता यापुढे म्हणजे पुढची किमान अडीच वर्षे तरी मनपाच्याविरोधात कोणी भाष्य करू शकणार नाही, मनपाची महासभाही खेळीमेळीत व सुसंवादात पार पडेल, असे दिसू लागले आहे. याउपरही, कोणी राजकीय व्यक्तींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तसेच सत्ताधार्यांऐवजी मनपा प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला तरी तो सत्ताधार्यांनाच विरोध मानला जाणार आहे व सारे काही एक असताना असा होणारा विरोध मग वैयक्तिक द्वेषातील ठरणार आहे. दरम्यान, मनपातील सहमती एक्सप्रेसमोर आता शहराचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचे आव्हान आहे.
महापालिकेच्या राजकारणात सध्याची स्थिती अभूतपूर्व झाली आहे. मनपात शिवसेनेचे सर्वाधिक 23, राष्ट्रवादीचे 19, भाजपचे 15, काँग्रेसचे 5, बहुजन समाज पक्षाचे 4, समाजवादी पक्षाचा 1 असे 67 नगरसेवक आहेत. यातील भाजपच्या 15 व काँग्रेसमधील 1 अशा 16जणांना सोडून बाकीच्या 51जणांनी एकत्र येऊन नगरच्या नव्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची निवड केली आहे. मनपातील सध्याच्या राजकीय स्थितीनुसार महापौर-उपमहापौर निवडीच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी आता मनपामध्येही अस्तित्वात आली आहे व त्यामुळे भाजप आपसुकच विरोधक झाला आहे. पण यंदाचे महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील नगरसेविकेसाठी राखीव असल्याने व या प्रवर्गातील नगरसेविका भाजपकडे नसल्याने निवडणूक रिंगणात उतरण्याचा त्यांचा प्रश्नच नव्हता. पण उपमहापौरपद हे खुले असताना व तेथे लढण्याची संधी असतानाही भाजपने या पदासाठीही उमेदवार दिला नाही, यामागचे गौडबंगाल चर्चेचे झाले आहे. अर्थात, मनपातील याआधीची सत्ता भाजप व राष्ट्रवादीच्या सहमतीची होती. त्यामुळे त्या सहमतीची परतफेड राष्ट्रवादीच्या उपमहापौरपदाला विरोध करून करणे भाजपला शक्य नव्हते व परवडणारेही नव्हते. परिणामी, त्यांनी राष्ट्रवादीशी असलेल्या मैत्रीला जागत त्यांचाही उपमहापौर बिनविरोध होण्यास मदत केली व आता पुढच्या मनपाच्या वाटचालीतही भाजपचा विरोध क्षीण असणार आहे. त्यांची पक्षीय विरोधक सेना सत्तेवर असली तरी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी असल्याने सेनेला विरोध म्हणजे राष्ट्रवादीला विरोध ठरणार आहे. त्यामुळे मनपाच्या राजकारणात भाजपचा विरोधही जवळपास संपल्यात जमा आहे. काँग्रेसचा विचार केला तर त्यांच्या इच्छुक उमेदवार शीला चव्हाण यांनी कोरे अर्ज नेऊनही त्यांना महापौर वा उपमहापौरपदी उमेदवारीची संधी मिळाली नसल्याने तात्कालिक नाराजीतून त्यांनी महापौर-उपमहापौर निवडीस अनुपस्थिती लावणे साहजिक आहे. पण आता मनपात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने व त्यात काँग्रेसही घटकपक्ष असल्याने प्रभागाच्या विकासात निधी उपलब्धता त्यांनाही गरजेची राहणार आहे. परिणामी, त्यांचाही विरोध लवकरच मावळेल व त्याही उत्साहाने मनपातील सत्तेत सहभागी होतील, असे बोलले जात आहे. मनपाच्या नव्याने महिला व बालकल्याण समिती तसेच सभागृह नेतेपदी नव्या नियुक्त्या आता होणार आहेत. यापैकी कोठेही त्यांची वर्णी लागू शकते व तशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
भाजप नगरसेवकांची अडचण
मनपात शिवसेनेच्या महापौर विराजमान झाल्या आहेत व राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर राज्यात शिवसेनेने भाजपशी संबंध तोडून राष्ट्रवादी व काँग्रेस समवेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप यांच्यात उभा दावा सगळीकडेच आहे. पण नगरला याच्या उलट चित्र आहे. राष्ट्रवादीने याआधीची अडीच वर्षेे साथ दिल्याने भाजपचा पहिला महापौर नगरला होऊ शकला व आता राष्ट्रवादी स्थानिक शिवसेनेसमवेत गेल्याने भाजपच्या नगरसेवकांची अडचण झाली आहे. तशात मागील आठवड्यात भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी मनपातील भाजपच्या अडीच वर्षाच्या सत्ताकाळात केलेल्या विकास कामांचे प्रेझेंटेशन जोरात केले व या कार्यक्रमात खा. विखेंनी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्याशी असलेल्या मैत्रीची जाहीर कबुली दिली तसेच त्यांच्या सहकार्यामुळेच भाजपची मनपात सत्ता आली व आम्हाला त्या माध्यमातून विकास करता आला, असेही आवर्जून स्पष्ट केले. तसेच या कार्यक्रमात एक विस्मयजनक घटनाही घडली. भाजपचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रसिद्ध मन की बात कार्यक्रमवर स्क्रीनवर सुरू असताना व तो होईपर्यंत थांबण्याची आणि नंतर भाषण करण्याची तयारी आ. जगताप यांची होती. पण खा. विखेंनी मन की बातचा आवाज म्युट (बंद) करायला लावला व आ. जगतापांना भाषण करण्यास भाग पाडले. त्यामुळे पंतप्रधानांपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार मोठे आहेत का, अशी कुजबूज भाजप कार्यकर्त्यांमध्ये सभागृहात होती. पण भाजपच्या नगरसेवकांना त्याचे फारसे सोयरसुतक नव्हते. कारण, राष्ट्रवादीमुळे मनपाती सत्ता मिळाली आहे व त्यातही पक्षाचे नेते खा. विखे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी असलेल्या मैत्रीची जाहीर कबुलीही दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उपमहापौराच्या विरोधात निवडणुकीत कसे उतरायचे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर होता. मनपा राजकारणात खेळ करायचा तर भाजप उपमहापौरपद मिळवू शकले असते. ते पद राखीव नव्हते. पण त्यांचा खासदारच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या कौतुकात मग्न असताना व या आमदाराच्या भाषणासाठी आपल्यास पंतप्रधानाची मन की बातही म्युट करण्याचे धाडस त्याने केले असल्याने बाकी भाजपच्या नगरसेवकांनी खेळ करण्याचा विचारही मनात आणणे पाप ठरले असते. परिणामी, भोसलेही बिनविरोध उपमहापौर झाले. भाजपने त्यांच्याविरोधात अर्जही न भरता व अनुपस्थित राहात एकप्रकारे मनपातील महाविकास आघाडीच्या सत्तेला मूक संमती व साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनपात आता सर्व 67 नगरसेवक एकाच म्हणजे सत्तेच्या बाजूला आले असून, त्यांच्याविरोधात सभागृहात कोणीही विरोधक राहिलेला नाही. सहमती एक्सप्रेसचे हे चित्र नगरच्या विकासाला तारक ठरेल की मारक, हे येत्या अडीच वर्षांच्या कारभारातून स्पष्ट होणार आहे.
होणारा विरोध राहणार संशयात
महाविकास आघाडीची सत्ता मनपात आल्यानंतर शहर काँग्रेसने मागील भाजप-राष्ट्रवादीच्या काळातील 24 मुद्दे प्रलंबित असल्याचा दावा करून या कारभाराची श्वेतपत्रिका नुकतीच प्रकाशित केली आहे व आता येत्या मंगळवारी खड्डे दुरुस्तीसाठी मनपावर आसूड मोर्चाही नियोजित केला आहे. पण मनपात आता काँग्रेसही सत्ताधारी झाली असल्याने शहर काँग्रेस संघटनेचा होणारा विरोध संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. स्वतःच्या नगरसेवकांकडून शहरातील विकास कामे करवून घेण्याची गरज असताना काँग्रेस संघटनेकडून मनपा प्रशासनाला धारेवर धरून एकप्रकारे मनपातील महाविकास आघाडीला विरोध करण्याचे अनाकलनीय धोरण नगरचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे की, वैचारिक भूमिका व तत्वांचे आहे की, व्यक्तिद्वेषातून आहे, यावर आता ़शहराच्या राजकारणात उलटसुलट चर्चा झडू लागल्या आहेत.
विरोधक आहेत, पण…
मनपाच्या चुकीच्या कारभाराला जोरदार विरोध नगरमध्ये आहे. तो आंदोलनातून व पत्रकबाजीतून नेहमी व्यक्तही होतो. काही राजकीय पक्ष व संस्था विविध विषयांच्या चौकशांचे पत्र आयुक्तांना नेहमी देत असतात. त्यात मनसेचे नितीन भुतारे आघाडीवर असतात. पण शहरात त्यांच्या मनसेला जनाधार नाही. शिवसेनेत नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी नगरसेवक विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, असे आ. जगताप विरोधक मानले जातात, पण आता मनपातील सेना सत्तेचे फायदे घेण्यासाठी त्यांचाही विरोध क्षीण होणार आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे, शाकीरभाई शेख, संदीप भांबरकर यांचा विरोध व्यक्तीपेक्षा व्यवस्थेतील त्रुटींना आहे व त्यात बर्यापैकी दोष प्रशासनाचा असतो, त्यामुळे या त्रुटी दाखवण्याला त्यांना यापुढेही संधी मिळेल, पण त्याचे राजकीय परिणाम होणार नाहीत. त्यामुळे नगर मनपामध्ये आता 67 विरुद्ध 0 असेच चित्र दिसणार आहे. शहराचे राजकारण मात्र यातून नीरस होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
COMMENTS