अहमदनगर/प्रतिनिधी- महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असली तरी या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्ष मंगळवारी (6 जुलै) मनपाला
अहमदनगर/प्रतिनिधी- महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असली तरी या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्ष मंगळवारी (6 जुलै) मनपाला झटका देणार आहे. रस्त्याच्या प्रश्नावरून काँग्रेसचा मनपावर मंगळवारी आसूड मोर्चा काढण्यात येणार आहे. मनपात महाविकास आघाडीतील शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर झाला आहे. काँग्रेसचे चार नगरसेवकही या महाविकास आघाडीत समाविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा काँग्रेस संघटनेने मनपाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. रस्त्यांत पडलेले खड्डे मनपा कधी दुरुस्त करणार, असा सवाल या आंदोलनातून विचारला जाणार आहे. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडूनच हा जाब मनपाला विचारला जाणार असल्याने ते एक आगळवेगळे आश्चर्य मानले जात आहे.
मनपाला जाब विचारणार-गुंदेचा
नगर शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. शहर खड्ड्यांमध्ये हरवून गेले आहे. पावसाळ्यामध्ये नागरिकांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. या प्रश्नावर आवाज उठवत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या त्याचबरोबर नगर शहरातील रस्त्यांच्या कामे पूर्ण करण्याच्या मागणी संदर्भामध्ये शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसच्यावतीने मंगळवारी महापालिकेवर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. नागरिकांना जीव मुठीत धरून शहरात वावरावे लागते. काँग्रेस ही नगर शहरातील सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. जिथे सामान्यांचे प्रश्न असतील, तिथे जिल्हाध्यक्ष काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ही नागरिकांच्या प्रश्नावर भूमिका घेण्यासाठी कायम पुढे असते. मंगळवारचा आसूड मोर्चा हा महापालिकेला रस्त्याच्या प्रश्नांवर जाब विचारासाठी काढला जाणार आहे, असे ते म्हणाले
महाविकास आघाडीत संघर्ष?
महापालिकेत नुकतेच सत्तांतर झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र येत अनुक्रमे महापौर व उपमहापौरपदे मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्यावतीने मागील अडीच वर्षांच्या भाजप-राष्ट्रवादीच्या सत्ता काळातील निष्क्रिय कारभाराची 24 मुद्यांची श्वेतपत्रिका नुकतीच प्रकाशित करीत अनेक प्रलंबित प्रश्नांवर मनपा प्रशासन, सत्ताधारी आणि नागरिकांचे लक्ष वेधले आहे. मनपातील सत्तांतरानंतर आता आसूड मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे नगर शहरातील महाविकास आघाडीमध्ये संघर्ष पेटल्याची चर्चा आहे. महापालिकेत भाजपसह सर्वच पक्ष एकत्र आल्याचे चित्र नागरिकांना पाहायला मिळत असताना काँग्रेसने मात्र नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काळे यांनी शहर जिल्हाध्यक्ष झाल्यापासून मनपाच्या राजकारणामध्ये काँग्रेस हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका बजावेल, असे वारंवार जाहीर केले आहे. त्यामुळे मंगळवारच्या आसूड मोर्चाची उत्सुकता वाढली आहे.
COMMENTS