देवळाली प्रवरा/प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेली जागर एफ
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेली जागर एफ.आर.पी.चा व आरधाना शक्तिपिठाची या यात्रे निमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी हे राज्यभर फिरत आहेत. या निमित्त ते काल सायंकाळपासून राहुरी दौऱ्यावर आहेत. या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील वीज टंचाईला केंद्रचे धोरण कारणीभूत असुन भाजपातील नेते काही साधू-संत नाहीत. एखाद्याने पक्ष सोडला आणि भाजपात गेला. तर तो शुद्ध झाला. संत झाला. असं काही आहे का? असे सांगत परखड टीका केली.
टाकळीमिया ( ता. राहुरी ) येथे शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, अमर कदम, रणजित बागल, प्रकाश देठे, सतीश पवार उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, “केंद्राच्या नियोजन शून्य, बेजबाबदार कारभारामुळे विजेच्या भारनियमनाचे संकट संपूर्ण देशासमोर उभे ठाकले आहे. शेतीला किमान आठ तास वीज मिळाली पाहिजे. राज्यात शेतीचे भारनियमन सहन करणार नाही. आयकर विभागाने मागील पाच वर्षात टाकलेल्या छाप्यांमध्ये काय सापडले? याची श्वेतपत्रिका काढावी.” नाहीतर यापूर्वी झाला नाही, असा धमाका करू असे शेट्टी यांनी केंद्र सरकारला आवाहन केले.
शेट्टी पुढे म्हणाले, “केंद्र सरकारने आवश्यक असणारा कोळसा आधीच साठवून ठेवला असता; तर देशासमोर भारनियमनाचं संकट आलं नसतं. हा सरळ सरळ केंद्र सरकारचा बेजबाबदारपणा आहे. आता या भारनियमनाचा बोजा शेतकऱ्यांवर पडू देणार नाही. ऑक्टोबर हीट चालू आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. खरीप पिके अतिवृष्टी, महापूराने गेली. किमान रब्बी पिके तरी हाताला लागली पाहिजेत.”
“पाऊस, अतिवृष्टीने का होईना विहिरींना पाणी चांगलं आलंय. रब्बी ज्वारी, गहू, भाजीपाला करायचा आहे. त्याला जर वीज मिळाली नाही. तर याही पिकांची वाट लागेल. त्यामुळे शेतीचे भारनियमन सहन करणार नाही. साखर कारखाने लवकरच सुरू होतील. त्या साखर कारखान्यांची सह-वीज निर्मिती प्रकल्पांची वीज वापरा. काहीही करा. शेतकऱ्यांना किमान आठ तास वीज द्या. त्यात, भारनियमन सहन करणार नाही.” असा इशारा शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला.
शेट्टी पुढे म्हणाले, “आयकर खात्याचे छापे पडतात. पण त्या छाप्यात काय सापडलं? हे कधीच कुणाला समजत नाही. केंद्र सरकारला माझे आवाहन आहे. मागील पाच वर्षात ज्या-ज्या ठिकाणी छापे टाकले. त्यात काळा व गोरा पैसा किती सापडला. याची एकदा श्वेतपत्रिका काढा. नाहीतर सर्वसामान्य माणसाला वाटायला लागले आहे की, हे छापे राजकीय दृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठीच होतात. यातून काहीच निष्पन्न होत नाही.”
“आमचा भ्रष्टाचाराला ठाम विरोध आहे. भाजपातील नेते काही साधू-संत नाहीत. त्यांच्या नेत्यांच्या घरावर आयकर खात्याचे छापे का पडत नाहीत? असा खडा सवाल उपस्थित करुन, एखाद्याने पक्ष सोडला आणि भाजपात गेला. तर तो शुद्ध झाला. संत झाला. असं काही आहे का? जर या व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास परत करायचा असेल. तो डळमळीत करायचा नसेल. तर आयकर खात्यात धाडी नंतर काय सापडले? हे जाहीर केले पाहिजे.” अशी मागणी शेट्टी यांनी केली.
COMMENTS