भाजपच्या हाती धतुरा…शिवसेना-राष्ट्रवादी झाले एकत्र ; नगर महापौर निवडणूक एकत़र्फी होणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या हाती धतुरा…शिवसेना-राष्ट्रवादी झाले एकत्र ; नगर महापौर निवडणूक एकत़र्फी होणार

नगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत किंगमेकरची भूमिका निभावण्याचा दावा करणार्‍या भाजपच्या हाती धतुरा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पारनेर शिवसेनेशी जवळीक ; खा. डॉ. विखेंना भोवणार? ; भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार दाखल
तनपुरे कारखाना बंद पाडणार्‍यांची चौकशी करा – विखे समर्थकांची मागणी
नेवासा तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढणार : ना. शंकरराव गडाख

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत किंगमेकरची भूमिका निभावण्याचा दावा करणार्‍या भाजपच्या हाती धतुरा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंगळवारी शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांसह मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे महापौर निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काँग्रेसही महापौरपदासाठी इच्छुक असल्याने आता त्यांच्या भूमिकेची उत्सुकता व्यक्त होत आहे. 

    नगरचे यावेळचे महापौरपद अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक मुंबई येथे झाली असून या बैठकीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे येऊन ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिली आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीला संपर्कप्रमुख कोरगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगताप, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते.

या बैठकीत दोन्ही प्रमुख पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांची महापौरपदाची उमेदवारी आता पक्की मानली जात आहे. राष्ट्रवादीकडेही रुपाली पारगे या उमेदवार आहेत. पण राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. परिणामी, शेंडगे यांनाच राष्ट्रवादी साथ देणार असल्याचे दिसू लागले आहे. महापालिकेमध्ये शिवसेनेचे 23 व राष्ट्रवादी काँग्रेसचे 19 नगरसेवक आहेत. दोन्ही मिळून ही संख्या 42 होते. 67 नगरसेवकांच्या सभागृहात बहुमतासाठी 34जणांची आवश्यकता असते. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे काय करणार?

काँग्रेसकडेही शीला चव्हाण या उमेदवार आहेत. पण त्यांचे नगरसेवक अवघे 5 आहेत. त्यांना बहुमतासाठी आणखी 29 नगरसेवक हवे आहेत. पण महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने आता त्यांच्यासमवेत जाण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय राहिलेला नाही. मात्र, या बदल्यात उपमहापौरपद पदरात पाडून घेण्यात काँग्रेसला यश येते की, राष्ट्रवादी ते पद पटकावते, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

चौकट

भाजपच्या आशा धुळीस

मनपात भाजपचे 15 नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक स्तरावर एकमेकांना विरोध आहे. शिवाय या तिन्ही पक्षांकडे स्वबळावर मनपात सत्ता आणण्याची ताकद नाही. अशा स्थितीत त्यांच्यात बेबनाव होऊन भाजपला महत्त्व येईल, असे बोलले जात होते. भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी तर महापौर निवडणुकीत भाजप किंगमेकर असेल, असा दावाही केला आहे. पण स्थानिक स्तरावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांपैकी प्रमुख दोन पक्षांनी एकमेकांशी जुळवून घेतल्याचे आता जवळपास स्पष्ट होऊ लागल्याने किंगमेकर होण्याच्या भाजपच्या आशा धुळीस मिळण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS