भारतीय जनता पक्ष जातीय दंगली भडकावून त्याचं कसं भांडवल करतो आणि त्यावर मतांचं धु्रवीकरण करतो, हे वेगळं सांगायला नको.
भारतीय जनता पक्ष जातीय दंगली भडकावून त्याचं कसं भांडवल करतो आणि त्यावर मतांचं धु्रवीकरण करतो, हे वेगळं सांगायला नको. समाज माध्यमांतील व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं प्रसारित करून एखादा पक्ष, एखादा समूह कसा त्याला जबाबदार आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजप करीत असतो. त्याचा हा प्रयत्न बर्याचदा अंगलट येतो, तरीही भाजप त्यातून धडा घेत नाही.
भारतीय जनता पक्षाची मीडिया विंग किती प्रभावी आहे आणि त्यांचा आयटी सेल कशा चुकीच्या बातम्या पेरतो, हे वेगळं सांगायला नको. खोटया व्हिडिओचा आधार घेऊन समाजांत गैरसमज पसरवून त्याचा राजकारणासाठी कसा वापर केला जातो, हे वारंवार सिद्ध झालं आहे. भाजपच्या जल्पकांच्या फौजा इतरांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी जशा तत्पर असतात, तशाच त्या बनावट व्हिडिओ बनवण्यासाठीही कार्यरत असतात. बिगर भाजपशासित राज्यांत खोटयानाट्याचा आधार घेऊन गैरसमज निर्माण करण्यात या फौजा आघाडीवर असतात. अशा राज्यांची कोंडी करण्यासाठी या जल्पकांच्या फौजा कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचा अनुभव महाराष्ट्रानं घेतला आहे. जगभरात सर्वाधिक काळ चाललेली आणि दोन समाजात दुभंग करून, मतांचं ध्रुवीकरण करण्यास जबाबदार असलेली मुझफ्फरनगरची दंगल अजून विस्मृतीत गेलेली नाही. बलुचिस्तानमधील व्हिडिओ टाकून, त्याद्वारे भारतात हिंदूवर कसा अत्याचार केला जातो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदूना मुस्लिमांविरोधात भडकावण्यात आलं. या प्रकरणी भाजपच्या आमदारांवर गुन्हे दाखल झाले. उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आल्यानंतर दंगल, बलात्कारासह सर्व गंभीर गुन्हे मागं घेण्यात आले. गंभीर गुन्हे मागं घेऊन सरकार आरोपींना पाठिशी घालत असेल, तर त्याचा समाजात काय संदेश जातो, याचा विचार केला गेला नाही. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या अगोदरपासून तिथं हिंसाचार सुरू आहे. भाजप, तृणमूल काँग्रेस परस्परांवर दंगलीचे, खुनाचे आरोप करीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जसे मारले गेले, तसेच तृणमूल काँग्रेसचेही. त्यामुळं त्यात कुणा एकाला दोषी धरता येत नाही किंवा कुणा एकावर खापर फोडता येत नाही. हिंसाचार चुकीचा आहे, त्याचं समर्थनही करता येत नाही. आता हिंसाचाराची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारनं पाठविलेल्या पथकावरही हल्ला झाला. भाजपचं कार्यालय जाळलं गेलं. त्याचा तपास व्हायलाच हवा. संबंधितांना शिक्षाही व्हायला हवी; परंतु या घटनांबाबत तसंच काही चुकीचे व्हिडिओ टाकून दंगली आणखी भडकावण्याचा प्रयत्न भाजपचा कक्ष करीत असेल, तर तो ही गैर आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचा 50 वर्षांहून अधिक दीर्घ इतिहास आहे. तृणमूल काँग्रेसनं 292 पैकी 213 जागा जिंकून राज्यातील सत्ता कायम राखल्याच्या बातम्या येऊ लागल्या, त्यापाठोपाठ राज्याच्या विविध भागांतून हिंसाचाराच्या बातम्याही येऊ लागल्या. निवडणुकीच्या काळात पोलिस यंत्रणा सरकारच्या हाती नव्हती, तर ती निवडणूक आयोगाच्या हातात होती. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शपथ घेतली आहे. त्यांनी पोलिस अधिकार्यांच्या आपल्याला हव्या त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या आहेत. त्याचा परिणाम आता दिसायला हवा.
निवडणुकांचे निकाल आल्यापासून सुरू झालेल्या राजकीय हिंसाचारात किमान 14 जणांचा मृत्यू झाला आहे. आपले सहा कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा भारतीय जनता पक्षानं केला आहे, तर आपले चार कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा तृणमूल काँग्रेसनं केला आहे. यातच भाजप नेते, आयटी विभाग आणि भाजपला पाठिंबा देणार्यांनी ’सोशल मीडिया’वर बनावट फोटो व व्हिडिओ शेअर करून एक वेगळीच गोष्ट पसरवण्यास सुरुवात केली आहे आणि या हिंसाचाराला धार्मिक रंग दिला आहे. उत्तर कोलकातामधील भाजप कार्यकर्ते अभिजित सरकार यांची तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हत्या केली. उत्तर 24 परगण्यात भाजप कार्यकर्त्याचा बचाव करताना त्याची आई, शोवारानी मंडल यांचा मृत्यू झाला. उत्तम घोष नावाच्या भाजप कार्यकर्त्याचीही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हत्या केली. नव्यानं स्थापन झालेल्या ’इंडियन सेक्युलर फ्रंट’नंही त्यांचा कार्यकर्ता हसनूर जमान मारला गेल्याचा दावा केला आहे. सीपीआय (एम) च्या महिला कार्यकर्तीची मुर्शिदाबादमध्ये हत्या झाली. बीरभूममधील 54 वर्षीय पंचायत सदस्य व तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीनिवास घोष यांचा भाजपच्या पाठीराख्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. हुगळीतील तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते देबू प्रामाणिक यांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. सीपीआय (एम) च्या उत्तर दिनाजपूर कार्यालयाला आग लावण्यात आली. पश्चिम मिदनापूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पूर्व बर्धमान जिल्ह्यात झालेल्या चकमकींमध्ये चार जण मारले गेले. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केल्याच्या, पक्ष कार्यालयांत नासधूस केल्याच्या अनेक बातम्या आहेत, तर भाजप कार्यकर्त्यांनी गलसी, नबग्राम आणि बर्धमान येथे आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ले केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते करत आहेत. या सगळ्या घटना राजकीय हिंसाचाराच्या असूनही भाजप त्याला धार्मिक रंग देत आहे.
तारकेश्वरमध्ये पराभव पत्करावा लागलेले भाजपचे माजी राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांनी ट्वीट करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पश्चिम बंगालमध्ये सुरक्षादलं पाठवण्याचं आवाहन केलं. बीरभूम जिल्ह्यात हजारो हिंदू कुटुंबं शेतांमध्ये लपली आहेत. स्त्रियांवर अत्याचाराच्या बातम्या आहेत, असं ट्वीट दासगुप्ता यांनी केलं आहे. बिष्णूपूरचे भाजप खासदार व युवा मोर्चाचे अध्यक्ष सौमित्र खान यांनी ट्वीट करून, नानूरमधील (बीरभूम जिल्हा) भाजप कार्यकर्तीवर जमावानं बलात्कार केल्याचा आरोप केला. नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं; पण ते वेगळ्या स्वरूपात, ग्राफिक इमेजेससह, प्रसृत होत होतं. ’इंडिया टुडे’ समूहाचे कार्यकारी संपादक दीप हलदर यांनीही खान यांचं ट्वीट पडताळणी न करता प्रसृत केलं; मात्र बीरभूमवरील सामूहिक बलात्काराची बातमी खोटी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आपण हे ट्वीट डिलीट केल्याचंही त्यांनी नंतर ’सोशल मीडिया’वर सांगितलं. सामूहिक बलात्काराची बातमी खोटी असल्याचं बीरभूमचे पोलिस अधीक्षक नागेंद्रनाथ त्रिपाठी यांनीही स्पष्ट केलं. भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी ट्वीटरवर थेट समुदायाची नावं घेत हा हिंसाचार धार्मिक आहे असा आरोप केला आहे. दिल्लीतील भाजप खासदार परवेश सिंग, विश्व हिंदू परिषदेनंही इशारा दिला आहे. हिंदू समाजाला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे आणि ते त्याचा उपयोग करतील’ असा हा इशारा आहे. जमाव पोलिसांवर हल्ला करत आहे असा ओडिशातील जुना व्हिडिओ पश्चिम बंगालमधील निवडणुकोत्तर हिंसाचाराचा पुरावा म्हणून शेअर केला जात आहे. आज तक वाहिनीचे पत्रकार कमलेश सिंग यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आणि नंतर डिलीट केला. ’सोशल मीडिया’वर आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या अभियान गीतावर काही लोक तलवारी घेऊन नाचत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय महिरा मोर्चाच्या प्रमुख प्रीती गांधी यांनी या व्हिडिओ शेअर केला व त्याला 83 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. पश्चिम बंगाल गुप्तचर खात्यानं आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलद्वारे हा व्हिडिओ बनावट असल्याचं सांगितलं आहे. 2019 सालातील विद्यासागर कॉलेजमधील हिंसाचाराचे फोटो पश्चिम बंगालमधील निवडणुकोत्तर हिंसाचाराचे फोटो म्हणून शेअर करण्यात आले. या फोटोंवरून बंगालमधील ‘हिंदूं’ची स्थिती समजते, असं एका ट्विटर यूजरनं ट्वीट केलं आहे. ‘द हिंदू बीट्स’ या फेसबुक पेजवर ढाक्यातीलफोटो शेअर करण्यात आले व हे पश्चिम बंगालमधील ताजे फोटो आहेत असा दावा करण्यात आला. इन्स्टाग्रामवरील ‘युवादोप’ आणि ‘तत्व इंडिया’ या दोन 50,000हून अधिक फॉलोअर्स असलेल्या खात्यांवरही बनावट बातम्या व ‘पश्चिम बंगालमध्ये जातिसंहार’, ‘महिलांवर सामूहिक बलात्कार’, ‘बंगाल हिंसाचाराचं ममतांनी निवडणुकीपूर्वीच केलं होतं नियोजन’ अशा प्रक्षोभक पोस्ट्स होत्या. यावरून दंगलीत तेल ओतण्याचं काम कोण करतं, हे वेगळं सांगायला नको.
COMMENTS