अहमदनगर/प्रतिनिधी- जालना येथून मजुरीच्या कामासाठी नगर तालुक्यातील कामरगाव येथे आलेल्यांच्या पालावर जाऊन कामरगावच्या काही नागरिकांनी रक्षाबंधन साजरे क
अहमदनगर/प्रतिनिधी- जालना येथून मजुरीच्या कामासाठी नगर तालुक्यातील कामरगाव येथे आलेल्यांच्या पालावर जाऊन कामरगावच्या काही नागरिकांनी रक्षाबंधन साजरे केले. या भटकंती करणार्या मजुरांच्या कुटुंबातील महिलांकडून स्वतःला राखी बांधून घेत व त्यांना बहीण मानून त्यांना भेटवस्तूही दिली. या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाने त्या कुटुंबातील महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले
कामरगाव(ता.नगर) येथील निवृत्त शिक्षक तुकाराम कातोरे व आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ यांच्या संकल्पनेतून कामरगाव येथे कामानिमित्त जालना येथून आलेल्या शेतमजुरांच्या पालावर जाऊन तेथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम रविवारी करण्यात आला. तेथील महिलांनी आलेल्या ग्रामस्थांना औक्षण करून राख्या बांधल्या. तेथे असणार्या सर्व चिमुकल्यांना मिठाई व खाऊ वाटण्यात आला. त्यावेळी सर्वांचे चेहरे आनंदाने उजाळून निघाले व त्यांनी रक्षाबंधनाच्या सणाचा आनंद घेतला. आपल्या घरापासून दूर असलो तरी येथील ग्रामस्थांनी आपुलकीने व ममतेने सर्व महिलांकडून राखी बांधून घेतल्याचा आनंद येथील सर्वांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता. ग्रामस्थांनी पालावर जाऊन वंचितांसोबत केलेले रक्षाबंधनही यामुळे चर्चेत आले. यावेळी कातोरे व ठोकळ यांच्यासह माजी मुख्याध्यापक सुदाम ठोकळ, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धांत आंधळे, ग्रामपंचायत सदस्य अॅड.प्रशांत साठे,संदीप ढवळे,अशोक कातोरे, अरविंद ठोकळ, विष्णु लष्करे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. रविारी सगळीकडे रक्षाबंधनाचा सण आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.परंतु कोसोदूर असलेल्या भावाला आपल्या बहिणीकडून राखी बांधण्याची ओढ लागते तसेच सासुरवाशिणीला माहेरी जाण्याची ओढ लागते. असे असले तरी समाजातील कष्टकरी, कामकरी वर्गाला कसले रक्षाबंधन व कसला सण, याची जाणीव नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना दूरपर्यंत भटकंती करावी लागते.गावाबाहेर शेतातून काम करून आल्यावर चार बांबूवर प्लास्टिकचा कागद अंथरूण केलेल्या खोपटीत त्यांना मुला-बाळांसोबत राहावे लागते. कायमच भटकंती करावी लागल्याने मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर कामरगावच्या शेतमजुरांच्या पालावर रविवारी झालेले आगळेवेगळे रक्षाबंधन कौतुकास्पद ठरले आहे
बाराही महिने आम्हाला शेतमजूर म्हणून काम करावे लागते. सणवार कधी येतो, हे माहीत होत नाही. पण आज रक्षाबंधनाची आठवण झाली होती. मात्र, माझे भाऊ खूप दूर आहेत, पण गावकरी आले व त्यांनी आमच्याकडून राखी बांधून घेतली. त्यामुळे आज येथे भावांना आठवून या नव्या भावांना रक्षाबंधन केले.
गयाबाई शिंदे, साडेगाव, ता.अंबड, जिल्हा जालना
COMMENTS