यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याने पत्रकारितेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप जरे यांचा मुलगा रुणाल यांनी केला आहे.
अहमदनगर/प्रतिनिधीः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याने पत्रकारितेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप जरे यांचा मुलगा रुणाल यांनी केला आहे. बोठेने त्याचे लष्करी सेवेतील मेव्हणे हे त्यांच्या सहकारी जवानाच्या गोळीबारात मरण पावले असताना, ते अतिरेक्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झाल्याचे दाख़वून त्याआधारे राज्य सरकारकडून पाच लाखांचे सानुग्रह अनुदान, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप व इतर अनेक लाभ मिळविले, असा आरोप रुणाल यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात रुणाल यांनी म्हटले आहे, की 21ऑक्टोबर 2006 ला जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या चौकीत सहकारी जवानाने केलेल्या गोळीबारात ठार झालेले जवान विठ्ठल भालसिंग यांना बोठे याने जाणीवपूर्वक अतिरेकी हल्ल्यात ठार झाल्याचे दर्शवून शासनाचा लाभ घेतला. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई केली जावी.
21 ऑक्टोबर 2006 रोजी जम्मू-काश्मीर राज्यातील राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या चौकीतील एक जवान सिग्नल विभागात कार्यरत होता. त्याने स्वत:जवळील रायफलमधून आपल्या सहका-यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात तीन जवान ठार झाले व इतर दोन जवान जखमी झाले. या दरम्यान गोळीबार करणा-या जवानाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या संदर्भात संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल डी.के. बडोला यांनी त्या वेळी माहिती दिली होती. या घटनेबाबत राजोरी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात जी फिर्याद दाखल आहे, त्यानुसार 21/10/2006 ला पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान एका जवानाने सहकारी जवानांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जवान मृत्युमुखी पडल्याची नोंद असून या तीनपैकी एक जवान विठ्ठल चंद्रभान भालसिंग हे होते, असे नमूद असल्याचे निदर्शनास आणून रुणाल यांनी म्हटले आहे, की विठ्ठल भालसिंग यांचा मेहुणा असलेला बाळ बोठे हा पत्रकार होता व तो दैनिक सकाळमध्ये मुख्य बातमीदार होता. त्याने त्याला असलेल्या अधिकाराचा गैरवापर करत त्यावेळी वृत्तपत्र (दैनिक सकाळ)मध्ये बातमी छापली, की अतिरेक्यांशी झालेल्या चकामकीत वाळकीचे जवान विठ्ठल भालसिंग हुतात्मा झाले; मात्र प्रत्यक्षात विठ्ठल भालसिंग हे सहकारी जवानाच्या गोळीबारात मयत झालेले असून त्या वेळी तेथे अतिरेक्यांशी चकमक झालेली नव्हती. बोठे याने त्याच्या पदाचा गैरवापर करत विठ्ठल भालसिंग हुतात्मा असल्याचा बनाव केला. तो काम करत असलेल्या वृत्तपत्रात सतत हुतात्मा झाल्याच्या बातम्या छापून, त्या दबावतंत्राचे आधारे राज्य सरकारकडून पाच लाखांचे सानुग्रह अनुदान, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप व इतर अनेक लाभ मिळविले आहेत. ही शासनाची शुद्ध फसवणूक आहे. बोठे याने तो पत्रकार, बातमीदार, संपादक असलेल्या बाबीचा गैरफायदा घेऊन सतत खोट्या बातम्या छापून अनेकांना त्रास दिला. यानुसार तो पत्रकार असल्याने त्या बाबीचा गैरफायदा घेत सहका-याच्या गोळीबारात ठार झालेला जवान हुतात्मा ठरविला. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. राज्य सरकार व देशाची फसवणूक केल्याप्रकरणी व पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी बोठेवर कायदेशीर कारवाई करावी, गुन्हे दाखल करावे तसेच सदर प्रकरणी चौकशी करून जेशासनाचे लाभ दिलेले आहेत, ते परत घ्यावेत व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रुणाल यांनी या पत्रात केली आहे.या पत्रासोबत त्याने काही कागदपत्रे जोडली असून, त्यात राजौरी येथील पोलिस ठाण्यातील घटनेचा गुन्हा, राजौरी येथील पोलिस अधिका-याचे सदर घटनेबाबतचे पत्र व दै.सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा समावेश आहे. या पत्राच्या प्रती त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनाही पाठवल्या आहेत.
पत्रकारितेच्या गैरफायद्याचे उदाहरण
रुणाल जरे यांनी बोठे याने पत्रकारितेचा गैरफायदा घेतल्याचे आणखी एक उदाहरण या पत्रात नमूद केले आहे. त्यात म्हटले आहे, की बोठे हा पत्रकार होता व तो सतत त्याच्या पत्रकार असल्याचा गैरवापर करत असायचा. याबाबत अलिकडील काळातील एक उदाहरण म्हणजे मंगल भुजबळ या जिल्हा क्षयरोग केंद्र येथे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्या कार्यकाळात त्यांनी नगर महापालिकेची निवडणूक लढवली असता, बोठे याने काही लोकांना हाताशी धरुन त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करावयास लावली व मग वरिष्ठांना दबाव आणून भुजबळ यांना बडतर्फ करावयास लावले; मात्र भुजबळ या औरंगाबाद उच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी गेल्या असता औरंगाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात स्पष्ट केले, की भुजबळ यांची बडतर्फी अयोग्य आहे.’’ मात्र, तरीदेखील बोठेने दैनिक सकाळ या वर्तमानपत्रात बातमी छापली की, ’मंगल भुजबळ यांची बडतर्फी हायकोर्टातही कायम’’ हे उदाहरण अलिकडील असून मुद्दाम याचा उल्लेख केला आहे, असे त्याने या पत्रात स्पष्ट केले आहे.
बोठेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात बोठेला मंगळवारी न्यायालयीन कोठडी मिळाली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तोफखाना पोलिसांनी त्यास न्यायालयासमोर हजर केले होते. पोलिसांनी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली; मात्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले
COMMENTS