बैठक भाजपविरोधकांची नाही ; यशवंत सिन्हा, मेमन यांचे स्पष्टीकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैठक भाजपविरोधकांची नाही ; यशवंत सिन्हा, मेमन यांचे स्पष्टीकरण

भाजपविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी राष्ट्र मंचची बैठक शरद पवार यांनी बोलवली ही चुकीची माहिती आहे. ही राष्ट्र मंचची बैठक होती, असे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केले.

सायन येथील निवासी डॉक्टरांचा मृत्यू
कोयना धरणग्रस्तांच्या भूखंड गैरव्यवहार; शासनाच्या नोटीसीने खळबळ
Yeola : आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक भविष्य मानधनाचा विचार करणार

नवीदिल्लीः भाजपविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी राष्ट्र मंचची बैठक शरद पवार यांनी बोलवली ही चुकीची माहिती आहे. ही राष्ट्र मंचची बैठक होती, असे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. तिसर्‍या आघाडीच्या स्थापनेचाही विषय नव्हता, असे सांगण्यात आले. शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी राष्ट्रमंचची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते आणि काही पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर सिन्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्ष एकत्र येत तिसरी आघाडी उघडणार का, हा प्रश्‍न या बैठकीच्या आधी उपस्थित केला जात होता; मात्र सिन्हा आणि मेमन यांनी ही शक्यता फेटाळली. 

    या बैठकीला काँग्रेसकडून कोणी उपस्थित नसल्याने काँग्रेसला वगळून तिसर्‍या आघाडीचा पर्याय अवलंबला जात आहे का, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण काँग्रेसला निमंत्रण दिले होते. त्यांच्यावर बहिष्कार नव्हता असेही बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले. भाजपतून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले यशवंत सिन्हा, माकपचे खासदार बिनॉय विश्‍वम, काँग्रेसमधून निलंबन झालेले संजय झा, अरुण कुमार, घनश्याम तिवारी, माजिद मेमन, वंदना चव्हाण, नितीश कुमार यांचे माजी सल्लागार आणि राज्यसभेचे माजी खासदार पवन वर्मा, ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे छत्तीसगडमधून राज्यसभेचे खासदार के.टी.एस तुलसी, आपचे खासदार सुशील गुप्ता उपस्थित होते. याशिवाय प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, इराणमध्ये भारताचे निवृत्त राजदूत के.सी.सिंह, सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि मानवी हक्क लॉ नेटवर्क संस्थेचे संस्थाचालक कॉलिन गोन्साल्विस, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी, कवी, चित्रकार, पत्रकार आणि 1998 शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेले प्रितीश नंदी, रविंदर मनचंदा, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, सीपीएमचे माजी खासदार निलोलपल बासू, निवृत्त न्यायमूर्ती एपी शहा उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याही बैठकीमध्ये होत्या. सोमवारी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली. त्यानंतर आजच्या राष्ट्र मंचच्या बैठकीचा आणि प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेण्याबाबत खलबते सुरू झाली. या दोन्ही बैठकींचा परस्परांशी संबंध नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मराठीला दिली. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेलांनी ही माहिती दिली. या बैठकीपूर्वी प्रशांत किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. गेल्या दहा दिवसांत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दोन वेळा चर्चा झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

देशाला व्हिजन देण्यासाठी बैठक

भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याचा आणि या बैठकीचा काहीच संबंध नव्हता. देशात अनेक मुद्दे आहेत. पण व्हिजन नाही. देशाला व्हिजन देण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आम्ही देशाला व्हिजन देऊ, असा दावा राष्ट्रमंचच्या नेत्यांनी केला आहे. पवार तिसरी आघाडी करत असून काँग्रेसला एकटे पाडले जात आहे, अशी चर्चा आहे. तीही चुकीची आहे. या बैठकीला काँग्रेसच्या पाच खासदारांना आमंत्रण दिले होते. कपिल सिब्बल, शत्रुघ्न सिन्हा आणि अभिषेक मनू सिंघवी यांनाही बोलावण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेसने बहिष्कार टाकला किंवा काँग्रेसला एकटे पाडले या वृत्तात काही तथ्य नाही, असे सांगतानाच देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावरही चर्चा झाली. ही राजकीय बैठक नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अल्टरनेट व्हिजन तयार करणार

आजच्या बैठकीत अल्टरनेट व्हिजन तयार करण्यावर चर्चा झाली. सिन्हा हे टीम स्थापन करून प्रत्येक मुद्द्यावर देशाला मजबूत व्हिजन देतील. तरुणांमध्ये व्हिजनचा अभाव असून नये, यासाठी हा प्रयत्न असणार आहे. अर्थकारण, बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ आदींबाबत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील टीम देशाला व्हिजन देणार असल्याचे घनश्याम तिवारी यांनी स्पष्ट केले.

पवारांनी पत्रकार परिषद टाळली?

पवारांच्या निवासस्थानी अडीच तास बैठक झाली. तोपर्यंत माध्यमांचे प्रतिनिधी पवारांच्या घराबाहेर उभे होते. या बैठकीनंतर पवार मीडियासमोर येतील असे वाटत होते; मात्र पवारांनी मीडियासमोर येणे टाळले, तर सिन्हा यांनी पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक करून अधिक बोलण्यास नकार देऊन पत्रकार परिषदेतून अंग काढून घेतले. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पवार मीडियाला सामोरे गेले असते तर त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब आणि प्रशांत किशोर यांच्यासोबत दोन वेळा झालेली बैठक आदी प्रश्‍न विचारले गेले असते; मात्र त्यांनी मीडियासमोर येणे टाळले. या प्रश्‍नांची उत्तरे टाळण्यासाठीच पवारांनी मीडियासमोर येणे टाळले का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे

COMMENTS