बाळ त्या काळात रेल्वे फलाटावर फिरत होता ; पोलिस तपासात नवी माहिती निष्पन्न, पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळ त्या काळात रेल्वे फलाटावर फिरत होता ; पोलिस तपासात नवी माहिती निष्पन्न, पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सकाळचा कार्यकारी संपादक व पत्रकार बाळ ज.

चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण
सख्ख्या बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार l LokNews24
विवाहितेचा छळ करून खून, नातेवाईकांचा ठिय्या | LOKNews24

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सकाळचा कार्यकारी संपादक व पत्रकार बाळ ज. बोठे हा 3 ते 10 डिसेंबर 2020दरम्यान नगरलाच होता व या काळात तो नगरच्या रेल्वे स्थानकावरच फिरत होता व राहात होता, अशी नवी माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. दरम्यान, बोठेच्या पोलिस कोठडीत पारनेर न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. त्याला आता 25 रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 

 रेखा जरे यांची हत्या 30 नोव्हेंबर 2020 रोजी झाल्यानंतर पोलिसांनी पहिल्या दोनच दिवसात पाच आरोपी पकडले होते व त्यांच्याकडील चौकशीत या खुनाचा सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे निष्पन्न झाल्यावर 3 डिसेंबरला पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तसे पत्रकार परिषदेत जाहीरही केले होते. या दिवसापासून बोठे गायब झाला होता व 102 दिवसांनी हैदराबादला सापडला. त्याला पकडल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. त्यावेळी त्याने 3 डिसेंबरपासून 10 डिसेंबर 2020 या दरम्यान नगरच्या रेल्वे स्थानकावरच राहिल्याचे व दिवसभर तेथेच फिरत होतो, असे सांगितल्याचे पोलिस सूत्रांकडून समजले. त्याने दिलेल्या या नव्या माहितीची खातरजमा पोलिसांकडून आता केली जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून 3 ते 10 डिसेंबरदरम्यानचे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज मागवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या काळात तो नगरमध्येच होता तर त्या वेळेला त्याला कोणी कोणी मदत केली, हा विषयही आता पुढे येणार आहे. त्यामुळे पोलिसांना आता त्यादृष्टीनेही तपास करावा लागणार आहे.

पोलिस कोठडीत वाढ

जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीत दोन दिवस म्हणजे 25 मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश पारनेरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी मंगळवारी दिले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बोठे यास न्यायालयापुढे उभे करण्यात आले. रेखा जरे हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी करताना तपासी अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. घटनेनंतर हैदराबादला फरार होण्यापूर्वी बोठे नगरमध्ये कोठे राहात होता, या काळात त्याला कोणी आर्थिक मदत केली, कोणी आश्रय दिला, नगरमध्ये असताना बोठे कोणाच्या संपर्कात होता या बाबींचा तपास करणे बाकी असल्याने बोठेच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी पाटील यांनी न्यायालयात केली. रेखा जरे यांच्या हत्येसाठी 12 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असले तरी या पैशांंव्यतिरिक्त आणखी काही आमिष बोठेने इतर आरोपींना दाखवले होते का, याची चौकशी आरोपी बोठेकडे करणे बाकी आहे. बोठे हैदराबादला कसा व कोणत्या मार्गाने गेला याची माहिती अद्याप बोठेने दिलेली नाही. त्याबाबत तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी बोठेला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती तपासी अधिकारी पाटील यांनी न्यायालयात केली. या प्रकरणातील हैदराबाद येथील आरोपी पी.अनंतलक्ष्मी व्यंकटाचारी सुब्बाचारी ही महिला अद्याप फरार आहे. या महिला आरोपीने बोठेला काय मदत केली याची माहिती घेणे तपासाच्यादृष्टीने आवश्यक आहे. सागर भिंगारदिवे याच्यासह इतर आरोपींनी बोठेला नेमक्या कशा पद्धतीने मदत केली याची माहिती बोठेकडून घेणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने बोठेला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी पाटील यांनी न्यायालयात केली. सरकरी वकील अ‍ॅड. मनीषा डुबे यांनी तपासात झालेल्या प्रगतीची माहिती न्यायालयात दिली.

बोठेच्या वकिलांचा आक्षेप

आरोपी बोठेच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करताना वकील अ‍ॅड. महेश तवले यांनी बोठेच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवण्यास विरोध केला. आरोपी बोठे बारा दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. या कालावधीत बोठेने पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. त्यामुळेच तपासात प्रगती होऊ शकली. इतर आरोपींनी बोठेला काय मदत केली याची माहितीही त्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. हैदराबाद येथील फरार आरोपी पी.अनंतलक्ष्मी व्यंकटाचारी सुब्बाराव हिने आरोपीला नेमकी काय मदत केली याची माहिती ती स्वत: देऊ शकेल. त्यासाठी बोठेच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे बोठेची रवानगी  न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी वकील अ‍ॅड. तवले यांनी केली. त्यांना अ‍ॅड. संजय दुशिंग यांनी सहकाय्र केले. दोनही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश बोर्‍हाडे यांनी आरोपी बोठेला दोन दिवस म्हणजे 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

कोतवाली पोलीसही न्यायालयात हजर

नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर मोठ्या फौजफाट्यासह न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. बोठे याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून बोठे त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कोतवाली पोलिसांच्यावतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर बोठे याचा ताबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS