फोटोसेशनऐवजी मनपाकडून काम करून घ्या ; काँग्रेसच्या काळेंची आ. जगतापांवर टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फोटोसेशनऐवजी मनपाकडून काम करून घ्या ; काँग्रेसच्या काळेंची आ. जगतापांवर टीका

नगर शहराचे आमदार हे केवळ फोटोसेशनमध्ये व्यस्त आहेत. ते कोणताही रिझल्ट देऊ शकलेले नाहीत.

जनार्दन स्वामींवरील दीर्घकाव्याच्या मुखपृष्ठाचे अनावरण
नवे जिल्हाधिकारी कार्यालय राहिले दिमाखात उभे
साईपालखी रस्त्यावर स्वच्छतेसाठी कचरापेटी

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहराचे आमदार हे केवळ फोटोसेशनमध्ये व्यस्त आहेत. ते कोणताही रिझल्ट देऊ शकलेले नाहीत. त्यांनी जिल्हा प्रशासनावर संतापण्याऐवजी मनपा प्रशासनाकडून काम करून घेण्यासाठी पुढे यावे, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आ. जगतापांचे नाव न घेता शनिवारी केली. आमदार व मनपा सत्ताधार्‍यांच्या नियोजनशून्यतेमुळे नगर शहरातील हजारो लोकांना आज आरोग्य आणीबाणीला सामोरे जावे लागत असून यांच्यामुळेच शहर व्हेंटिलेटरवर गेल्याचा आरोपही त्यांनी केला. मनपाद्वारे नगर शहरात स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची मागणीही त्यांनी केली. 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये नगर शहरासाठी 1000 बेडचे जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभे करण्याची मागणी काळे यांनी केली आहे. त्यानंतर थोरात यांनी मनपा आयुक्तांना याबाबत तातडीने चाचपणी करण्याच्या सूचना याच बैठकीत दिल्या. या बैठकीनंतर काळे यांनी आमदारांवर व मनपातील सत्ताधारी भाजपवर तसेच प्रशासनावर टीका केली. काळे म्हणाले की, विद्यमान आमदारांंच्या नेतृत्वाखाली मनपामध्ये भाजप-राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण त्यांची नागरिकांप्रती असणारी अनास्था व असंवेदनशीलतेमुळे मनपाने जबाबदारी पूर्णतः झटकली असून ही महामारी एक वर्षापासून सुरू असून देखील शहरामध्ये कोणतीही आरोग्यविषयक यंत्रणा ते उभी करू शकलेले नाहीत. शहरातील नागरिक कर भरतात. परंतु त्या बदल्यात नागरिकांना आरोग्य सुविधा देणारे मनपाचे एकही सुसज्ज रुग्णालय नाही. राज्यातील इतर महापालिकांची स्वतःची अद्ययावत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असून हॉस्पिटल्स अद्ययावत आहेत, पण नगरला असे काही नाही, असे सांगून काळे म्हणाले, नागरिकांना दिलासा मिळण्याची दृष्टीने काँग्रेस मनपाला सर्वतोपरी सहकार्य करेल.

ते पुढे म्हणाले की, एका रुग्णाला खासगी रुग्णालयामध्ये सरासरी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च येतो. एका कुटुंबात चार सदस्य आहेत असे गृहीत धरले तर नव्या स्ट्रेनप्रमाणे एका व्यक्तीस बाधा झाल्यास घरातील सर्व व्यक्तींना बाधा होते, असे निरीक्षणात आले आहे. त्यामुळे एका कुटुंबाचा खासगी रुग्णालयातील खर्च हा साधारणतः सहा ते आठ लाख रुपयांच्या घरात जातो आहे. लॉकडाऊन मुळे रोजगार बंद असताना सर्वसामान्य नागरिक, गोरगरीबांना हा खर्च कोणत्याही परिस्थितीमध्ये परवडणारा नाही. प्रत्येक नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये एवढा मोठा खर्च करून आरोग्य सुविधा मिळवू शकत नाही. त्यामुळे महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय गरीबांना आधार ठरेल. पण त्याचा कोणताही विचार मागील वर्षभरापासून मनपाने, तेथील सत्ताधार्‍यांनी व आमदारांनी केला नाही, हे दुर्दैव आहे, अशी खंतही काळेंनी व्यक्त केली.

चौकट

मनपाने नियंत्रण कक्ष करावा

मंत्री थोरात यांच्या बैठकीत किरण काळे यांनी मनपाकडून विविध अपेक्षा व्यक्त केल्या. जिल्हा प्रशासनाच्या धर्तीवर नगर शहरातील नागरिकांसाठी मनपाचा स्वतंत्र कोरोना मदत व नियंत्रण कक्ष तातडीने स्थापन करण्यात यावा. हा कक्ष 24 तास कार्यान्वित असावा. या कक्षात विविध विभागांची निर्मिती करून त्या विभागांसाठी स्वतंत्र अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी. हे अधिकारी आणि या कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक नागरिकांसाठी तातडीने जाहीर करण्यात यावे, अशी मागणी काळे यांनी बैठकीत केली. भविष्यातील वाढणार्‍या रुग्ण संख्येचा विचार करता व ऑक्सिजन बेडचा तुटवडा लक्षात घेता नगर शहरामध्ये 1000 ऑक्सिजन बेडची क्षमता असणार्‍या जम्बो कोविड सेंटरची तातडीने उभारणी करण्यात यावी. अत्यवस्थ होणार्‍या कोरोना रुग्णांसाठी या सेंटरमध्ये किमान 200 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात यावी. रेमेडीसेवर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. या ठिकाणच्या सर्व सुविधा नागरिकांसाठी विनामूल्य करण्यात याव्यात तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सातत्यपूर्ण राहील यासाठी मनपाने देखील स्वतःचा स्वतंत्र ऑक्सीजन प्लान्ट याठिकाणी उभा करावा अशी मागणी काळे यांनी केली. सरकारी आरोग्य यंत्रणा म्हणून नगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना, गोरगरिबांना जिल्हा शासकीय रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. पण, ही व्यवस्था ग्रामीण जिल्ह्यासाठी निर्माण केलेली आहे. शहरासाठी मनपा ही स्थानिक स्वराज्य संस्था असून त्यांची शहरातील नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा उभी करण्याची प्राथमिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS