विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या स्फोटक भरलेल्या गाडीपासून राज्य सरकारची मोठी कोंडी केली आहे.
मुंबई/प्रतिनिधीः विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या स्फोटक भरलेल्या गाडीपासून राज्य सरकारची मोठी कोंडी केली आहे. गृहमंत्रालय हाताशी असूनही जे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जमले नाही, ते फडणवीस यांनी करून दाखविले आहे.
शेरलॉक होम्ससारखे त्यांचे हे काम असून आता त्यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या डेटाबाँबमध्ये काय दडले आहे, याची उत्सुकता लागली आहे. फडणवीस यांनी मिळविलेले कॉल डिटेल्स, अनिल देशमुख यांची वाझे यांच्याशी घेतलेली बैठक, शंभर कोटी रुपयांच्या टार्गेटचे तपशील, पोलिस अधिका-यांच्या बदल्यात झालेली तोडपाणी, गृहमंत्र्यांनी केलेल्या बदल्या रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, नेत्यांच्या फोनचे झालेले टॅपिंग आदींचा तपशील, तसेच पोलिस अधिका-यांच्या बदल्यातील अर्थकारण आणि त्याचा मंत्रालयापर्यंत पोचविला जात असलेला वाटा याचे तपशील या डेटा बाँबमध्ये असण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांनी बदल्यांतील आर्थिक घोटाळ्यांचा दिलेला अहवाल, त्यावर सीताराम कुंटे यांनी दिलेली टिप्पणी आणि मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांनी केलेले दुर्लक्ष याची माहिती ही या डेटामध्ये असण्याची शक्यता आहे. पाच ते 27 फेब्रुवारीपर्यंत कोरोनावरील उपचारासाठी देशमुख यांचे रुग्णालयात असणे, त्यानंतरचे त्यांचे गृहविलगीकरण आणि त्यावर आधारित शरद पवार यांची पत्रकार परिषद यावरही फडणवीस यांच्या डेटाबाँबमध्ये माहिती असण्याची शक्यता आहे. देशमुख 15 तारखेपासून मुंबईत होते. त्यांनी त्या काळात सचिन वाझे आणि संजय पाटील यांना भेटल्याचे नाकारले असले, तरी फडणवीस ज्या आत्मविश्वासाने त्याबाबत बोलतात ते पाहिले, की त्यांच्याकडे भेटीचे व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर पोलिस दलात बदल्यांसाठी सुरू असलेल्या रॅकेटचा तपशील मांडला. गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही सगळी माहिती पोलीस महासंचालकांना दिली होती. त्यानंतर ही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली; मात्र त्यावर कारवाई होणे तर सोडाच; पण उलट रश्मी शुक्ला यांची बढती रोखण्यात आली, असा फडणवीस यांनी केला. ही माहिती खूपच संवेदनशील असल्याने मी ती प्रसारमाध्यमांना देऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी ही माहिती केंद्रीय गृहखात्याच्या सचिवांना दिली. या माहितीच्याआधारे पोलिस दलातील बदल्यांच्या रॅकेटची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलिस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकार्यांशी बोलणी सुरू होती. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिस महासंचालकांना ही माहिती दिली. पोलिस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून या सर्व लोकांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली. ही परवानगी मिळाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय लोकांची नावं समोर आली. शुक्ला यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी ही माहिती पोलिस महासंचालकांना दिली. 26 तारखेला पोलिस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. या सगळ्या प्रकाराची सीआयडीकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे पोलिस महासंचालकांनी आपल्या अहवालात म्हटले होते. ठाकरे यांना याविषयी समजल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली; मात्र यावर कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृहमंत्रालयाकडे पाठवला. ही माहिती बघितल्यानंतर गृहमंत्रालयाने कारवाई करणे सोडाच; पण गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्तांनाच शिक्षा केली. त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही. त्यानंतर गुप्तचर विभागाच्या डेटामध्ये नमूद केल्याप्रमाणेच पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या, असे फडणवीस यांचे म्हणणे आहे. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी एक रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. हा 6.3 जीबीचा डेटा आहे. त्यात सर्व कॉल रेकॉर्ड आहे. त्यात काही पोलिस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे अनेक विस्फोटक संवाद समोर येऊ लागले. हे पाहिल्यानंतर त्यातून खूप मोठे रॅकेट झाल्याचे फडणवीस म्हणतात. हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला. 8 ऑगस्ट 2020मध्ये हा अहवाल देण्यात आला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी हे सर्व ऐकून घेतले; मात्र त्यावर काहीच कारवाई केली नाही.
चौकशी करणार्यांना शिक्षा, चुका करणार्यांना बक्षिसी
ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले त्या सीओआय यांना अडगळीच्या ठिकाणी प्रमोशन देण्यात आले. प्रमोशन दिल्याचे भासवण्यात आले, तर ज्यांचा या प्रकरणात हात होता त्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात आली. त्यामुळे सुबोधकुमार जैस्वाल यांनी या पोस्टिंगला विरोध केला. तेव्हा दबावात हे सर्व होते, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी डेप्युटेशन मागून घेतले, असा दावा फडणवीस यांनी केला. त्याचे पुरावेही या डेटाबाँबमध्ये असण्याची शक्यता आहे.
COMMENTS