पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कारवाई… ३१ हजार किलो गोमांस जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कारवाई… ३१ हजार किलो गोमांस जप्त

संगमनेर : प्रतिनिधी  श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि नगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संगमनेर शहरातील भारतनगर, जमजम कॉलनी परिसरातील अव

प्रवासादरम्यान सापडलेली पर्स केली परत
भावाला वाचवायला गेलेल्या बहिणीचा मात्र मृत्यू
शिवांकुर पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. प्रकाश पवार

संगमनेर : प्रतिनिधी 

श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि नगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संगमनेर शहरातील भारतनगर, जमजम कॉलनी परिसरातील अवैध कत्तलखान्यावर शनिवारी रात्री छापे टाकण्यात आले. या कारवाईत ७१ जिवंत जनावरांची सुटका करण्यात आली तर ३१ हजार किलो गोमांस ताब्यात घेण्यात आले. सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संगमनेरातील अवैध कत्तलखाने सर्रासपणे सुरू असून या कत्तलखान्यातील गोमांस राज्याच्या अनेक भागात पाठविले जाते. तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्यानंतर या कत्तलखान्यावर कारवाई करण्याचे धाडस एकाही पोलिस अधिकाऱ्यांने दाखविले नाही. शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणाऱ्या पोलीस निरीक्षकांनी आत्तापर्यंत शेकडो थातूरमातूर कारवाया या कत्तलखाना चालकांवर केल्या मात्र हे कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्याचे धाडस प्रशासन दाखवू शकले नाही.

भिवंडी येथील यतीन जैन यांना संगमनेरात सुरू असलेल्या कत्तलखान्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनीदेखील तात्काळ श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना याची माहिती देत पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व विजय करे यांच्यासह नगर, श्रीरामपूर, संगमनेरचे पोलीस पथक मदतीला देत कारवाईचे आदेश दिले. मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी रात्री सुरू केलेली कारवाई रविवारी सकाळपर्यंत सुरू होती. 

पोलिसांनी कारवाई दरम्यान ७१ जिवंत गोवंश जनावरांची सुटका केली तर सुमारे ३१ हजार किलो गोमांस हस्तगत केले. या ठिकाणी जनावरांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. कारवाई दरम्यान कत्तलखाने चालकांनी तेथून पळ काढला. तर पोलिसांचे लक्ष विचलीत करण्यासाठी दगड मारत पथदिवे देखील फोडण्यात आले होते. कारवाई दरम्यान पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले. रविवारी दुपारपर्यंत मुद्देमालाची मोजदाद सुरू असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला होता. कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे चार लाख रुपयांची रोकडदेखील हस्तगत केल्याची माहिती मिळाली.

बजरंग दलाच्या मदतीने राज्यातील सर्वात मोठी कारवाई

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आलेली संगमनेरमधील कारवाई ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात असुन या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांचे अपयश समोर आले आहे. स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेला हा सर्व प्रकार श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक मिटके आणि प्राणीमित्र जैन यांनी समोर आणला. दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. यापूर्वी वारंवार माहिती देऊन देखील स्थानिक पोलिस कारवाईस टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी म्हटले. प्रशासनाने हे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. गोवंश हत्या रोखण्यासाठी बजरंग दलाच्या वतीने रविवारी सायंकाळी एका बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS