तरूणींना पोलिसांनी घेतले ताब्यात, पाच जणांविरूद्ध गुन्हापुणे :पुणे शहरात अनैतिक व्यवसायाविरोधातील पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होत असून, कात्रज-मंत

तरूणींना पोलिसांनी घेतले ताब्यात, पाच जणांविरूद्ध गुन्हा
पुणे :पुणे शहरात अनैतिक व्यवसायाविरोधातील पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होत असून, कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील एका लॉजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय फुरसुंगी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत या अनैतिक धंद्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत देहविक्रय करणार्या तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, एका महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय म्हस्के, अक्षय, सुधाकर, पवन सोनपारखे आणि बिंदा नावाच्या महिलेविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तेहसीन बेग यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील ‘क्रिस्टल लॉज’मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, शहरात मसाज पार्लरच्या आडून तसेच लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. याच धर्तीवर दोन दिवसांपूर्वी बाणेर परिसरातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला होता. त्या कारवाईत लॉज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून, तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. बाणेर, बालेवाडी आणि कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागांमध्ये अशा प्रकारांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरेगाव पार्क परिसरातील एका मसाज पार्लरमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायही पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ‘सिल्व्हर सोल स्पा’ या मसाज पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी तरुणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मसाज पार्लरचा व्यवस्थापक फैजल अजिहूर रेहमान अहमद उर्फ समीर (वय 38, रा. कोणार्क व्ह्यू सोसायटी, केशवनगर, मुंढवा) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वणवे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोके पुढील तपास करत आहेत.

COMMENTS