पुणे शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे; रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी औषधाच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पुणे : पुणे शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे; रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी औषधाच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धडपड सुरू आहे. ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी रुग्णांना घेऊन रुग्णालयाच्या दारात प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्यामुळे आता जगायचे की मरायचे? असा प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहिला आहे.
एकंदरीतच पुण्यातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असून, परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज पाच ते सहा हजार कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 46 हजारांवर पोहोचली आहे. 13 फेबु्रवारी रोजी ही संख्या 1250 पर्यंत खाली आली होती. मात्र, अवघ्या 50 दिवसांमध्ये 46 हजारांवर गेली?आहे. त्यापैकी 39 हजार रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर, 6 हजार 500 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. काल 10 ते 12 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ 2 हजार रेमडेसिवीरचा साठा आला. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यासाठी सकाळपासूनच औषध दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या?होत्या. या इंजेक्शनसाठी बाहेरगावाहून आलेले नागरिकदेखील पाहायला मिळाले. एकंदरीतच, महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. दुसरीकडे, लशीचा देखील तुटवडा जाणवत आहे. काल शहरातील अनेक लशीकरण केंद्र बंद होते. त्यामुळे नागरिकांना लशीविनाच माघारी फिरावे लागले. राज्य सरकारकडून आतापर्यंत 6 लाख डोस मिळाले आहेत. त्यापैकी, 5 लाख 8 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून, सध्या 25 हजार डोस शिल्लक असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
COMMENTS