पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेससह विविध संस्थांद्वारे अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अहमदनगर/प्रतिनिधी-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेससह विविध संस्थांद्वारे अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांच्यासह बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, विजय गव्हाळे, लंकेश चितळकर,गणेश बोरुडे, लहू कराळे,दीपक होले उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रा. विधाते म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आजच्या युवापिढीला प्रेरणा देणारे आहेत. त्यांनी समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी मोठे योगदान दिले तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्याकाळी वृक्षारोपण व त्यांच्या संवर्धनाची गरज ओळखून त्यांनी पावले उचलली होती, असे सांगून ते पुढे म्हणाले, अहिल्यादेवींकडे दुरदृष्टी होती. त्यांनी शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकर्यांना जाचक करामधून मुक्त केले होते. भारतातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे त्यांनी केली. त्याकाळात त्यांनी पाण्याचे महत्व जाणून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविली. आजच्या आपत्तीच्या काळामध्येही अहिल्यादेवींनी केलेल्या पाणी व्यवस्थापनाची व त्यांच्या उपाययोजनांची प्रेरणा समाजासमोर आहे, असे विधाते म्हणाले.
निमगाव वाघामध्ये अभिवादन
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साध्या पध्दतीने घरातच साजरी करण्यात आली. दरवर्षी संस्थेच्या वतीने जयंती निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती उत्सवाचे कार्यक्रम रद्द करुन साध्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात आली. सोमवारी सकाळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे, संतोष कदम, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, युवा मंडळाच्या सचिव प्रतिभा डोंगरे, अक्षरा येवले आदी उपस्थित होते. समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी व परंपरेला छेद देत अहिल्यादेवी होळकर यांनी जागृती केली, असे प्रतिपादन यावेळी डोंगरे यांनी केले. कोरोनाच्या संकटकाळात जनतेसाठी असलेले त्यांचे कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
नारी सन्मान योजना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती निमित्त कर्जत तालुक्यातील तरडगाव ग्रामपंचायतीच्यावतीने नारी सन्मान योजनची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती तरडगावच्या सरपंच संगीता केसकर यांनी दिली. त्यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच बारकाबाई देवमुंडे, वैजीनाथ केसकर, तरडगावचे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल बरबडे, ग्रामपंचायत सदस्य दराबाई केसकर, पिंटू देवमुंडे, मोहन केसकर, भरत देवमुंडे, भागवत केसकर, शरद देवकाते, नाना केसकर, युवराज केसकर, अप्पा खटके, बबन हजारे, अभिमान शेंडकर, चंद्रकांत केसकर उपस्थित होते. तरडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये दि. 31 मे पासून जन्माला येणार्या मुलींच्या नावे तरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 5 हजार रुपयांची रक्कम टाकण्यात येणार आहे. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्या भविष्यातील शैक्षणिक व इतर खर्चासाठी ही रक्कम उपयोगी पडेल, अशी ही कल्याणकारी योजना आहे. त्यामुळे मुलगी वाचली तर गाव वाचेल अशी प्रतिज्ञा करून स्त्री भ्रूण हत्या टाळण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे सरपंच संगीता केसकर यांनी सांगितले.
COMMENTS