कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच शहरात प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे.
पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच शहरात प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील सहा रक्तपेढ्यांमध्ये सोळा बॅग शिल्लक आहेत. परिणामी, रुग्णांचा नातेवाईकांना प्लाझ्मा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याची स्थिती आहे. कोरोनाच्या रुग्णाला कोणती लक्षणे आहेत, त्यावरून उपचार केले जातात.
ज्या रुग्णांना कोरोनाची गंभीर लक्षणे आहेत त्यांना इतर औषध उपचार लागू पडत नाही. अशा रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी केली जाते. विशेषतः वयोवृद्ध नागरीकांना प्लाझ्मा दिला जातो. परंतु, सध्या प्लाझ्मा दाते कमी झाल्याने प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. तुटवडा असल्याने ‘प्लाझ्मा दान करणारा दाता घेऊन या आणि मग प्लाझ्मा घेऊन जा’, असे रक्तपेढीतील कर्मचारी सांगत आहेत. सुरुवातीला प्लाझ्मा दानाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. दान करणाऱ्या दात्यांची संख्या वाढली होती. या थेरपीमुळे अनेक रुग्ण बरे देखील झाले आहेत.
COMMENTS