पिंपरीत भाजपच्या नगरसेवकाला अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरीत भाजपच्या नगरसेवकाला अटक

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे तयार करून विकल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपचे नगरसेवक राजेंद्र लांडगे आणि एकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

एकाच रात्री 25 गाड्यांची तोडफोड.
मेथक्युलोन अमली पदार्थ  विक्रीस आणणाऱ्या चौघांना एपीएमसी पोलिसांनी केले गजाआड
‘लॉकडाऊन’ जनावरांचे

पुणे/प्रतिनिधः पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे तयार करून विकल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपचे नगरसेवक राजेंद्र लांडगे आणि एकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. भोसरी येथे 20 मे 2021 रोजी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

राजेंद्र किसन लांडगे (वय 42), मनोज महिंद्र शर्मा (वय 38, दोघेही रा. भोसरी), अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह रविकांत सुरेंद्र ठाकूर (वय 40, रा. भोसरी) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अभियंता तथा क्षेत्रीय अधिकारी एस. एस. भुजबळ (वय 37) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची भोसरी येथील सर्व्हे नं. 22 ही प्राधिकरणाची जागा विकत असल्याचे दाखवले. त्यातील 936 चौरस फूट जागा स्वतः मालक नसताना विक्री केली. खोटे नोटराईज, बनावट कागदपत्र, कुलमुखत्यारपत्र, संमतीपत्र, ताबा पावती, ताबा साठेखत बनवून लांडगे यांनी ती जागा शर्मा व ठाकूर यांना विक्री करून त्यापोटी 15 लाख 80 हजार रुपये घेतले. लांडगे हा मूळ मालक नसून ती जागा प्राधिकरणाची आहे, असे माहिती असतानाही शर्मा व ठाकूर यांनी ती जागा विकत घेतली. तसेच त्यावर अनधिकृत एक हजार 872 चौरस फूट बांधकाम केले. त्यानंतर बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मिळकत कर पावती बनवून घेतली. बनावट कागदपत्रे देत वीजजोडदेखील घेऊन शासनाची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम तपास करीत आहेत. लांडगे हे भाजपचे नगरसेवक आहेत. तसेच महापालिकेच्या स्थायी समितीचे ते माजी सदस्य आहेत. महापालिकेच्या ’क’ प्रभाग समितीचे ते विद्यमान सभापती आहेत. फसवणूक प्रकरणी त्यांना अटक झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

COMMENTS