येथे विविध ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे घालणार्या तालुक्यातील नागरिकांच्या खेपा आता वाचणार आहेत.
पाटण / प्रतिनिधी : येथे विविध ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे घालणार्या तालुक्यातील नागरिकांच्या खेपा आता वाचणार आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण तहसीलदार कार्यालय परिसरात तालुक्यातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारत उभी करण्यात येत आहे. या बहुद्देशीय कामासाठी राज्य शासनाकडून 15 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
पाटण येथे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक, वन विभाग आदींच्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांत जनतेचा दररोजच राबता असतो. जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी ही कार्यालये पाटण येथे विविध ठिकाणी विखुरलेली आहेत. एकाच वेळी काम होत नसल्याने जनतेला हेलपाटे घालावे लागत असल्याने तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी ही सर्व प्रशासकीय कार्यालये एका छताखाली असावी, असा मानस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा आहे.
पाटण तहसील कार्यालयाची जुनी वास्तू पाडून त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत होणार आहे. नवीन प्रशासकीय इमारतीत तहसील कार्यालय, प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक, पोलिस स्टेशन, भूमीअभिलेख, उपकोषागार कार्यालय, तालुका उपनिबंधक, कृषी अधिकारी, होमगार्ड अशी नऊ कार्यालये होणार आहेत. ना. देसाई यांच्या मागणीवरून शासनाने ही प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी 15 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.
COMMENTS